आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, November 23, 2007

तू मला भेटतच नाहीस एकटा
बरोबर असतेच तुझी कविता

तुला नाही वाटत भेटावंसं
वेगवेगळं आम्हा दोघींना ?

वाटतं, तू तिच्यात मला बघतोयस, अन्
माझ्यात शोधतोयस तिला.

तिच्याशी बोलतोस माझ्याकडे पाहात,
आणि मला मात्र वाटत रहातं
की तू मलाच काहीतरी सांगतोयस.

तू माझ्याशी बोलत असताना तुझी
कविताच दिसते मला, तुझ्याकडे बघताना.

डोळे मिटून तू कधी गप्प रहातोस
तेव्हा आम्ही दोघी बघत रहातो
एकमेकींच्या तोंडाकडे, हे न समजून
की तुला आता नक्की कोण
हाक मारणार, हक्कानं ?

तिच्याशिवाय तुला पहायचंय एकदा.
पण तिला तुझ्याशिवाय आहे कोण दुसरं !
मला मात्र तू आहेस... आहेस ना?

हल्ली मात्र येतोय मला संशय.
मी आहे का खरंच आयुष्य तुझं,
का आहे केवळ एक काव्यविषय ?

-- सतिश वाघमारे
प्रेमपत्र पहिले लिहिताना वेळ लागतो
नवीन पक्ष्याला उडताना वेळ लागतो...

'मिठीत' नव्हते, 'मनात' होते शिरायचे मज
अंतर मधले ओळखताना वेळ लागतो...

धागा अथवा नाते जर गाठीत अडकले;
प्रयत्न केले तरी सुटताना वेळ लागतो...

उपाय आता सापडला या जखमांवर पण
घाव खोलवरचे भरताना वेळ लागतो...

-- अजब

इवलिशी कळी
दवांत निजली..
चिंबचिंब भिजली
लाजेत थिजली...

पाहूनी तिजला
भ्रमर सावळा
आळवित जाई
राग आगळा....

प्रेम तिजवर
जडले तयाचे
नियम त्याने
मोडले जगाचे...

रूणझुण त्याची
वेड लावती
गंधित होई
वेडी कळी ती..

लाल गुलाबी
रंग कोठला
केशरी अबोली
अंतरी दाटला...

फुलविण्या तिला
झपाटला तो
सुंदर फूल हे
म्हणतो जो तो...

राजकुमारी..ती.
येई हासत
फुलांस त्या मग
नेई सोबत...

भ्रमराची त्या
मग प्रेमकहाणी
फुला विना त्या
झाली विराणी

बागेमधूनी
शोधित त्या फुला
फिरतो वेडा
भ्रमर एकला.. भ्रमर एकला....

- प्राजु

मनातल्या भावनांना उगच वाट करुन दिली,
कालच आणलेली कोरी वही लेगेचच भरुन गेली,
बघता बघता हा नवा छंद जडला,
शब्दांशी खेळतांना,आय़ुषाचा एक डाव सरला..
मन पाकोळ्यागत हलके होउन उडुनी जाते
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन वादळ वारा
मन पाउस सारा.
मन हवा गुलाबी
मन नशा शराबी.

मन वा-यावरती झुलते तुझ्या भोवती फिरते.
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन उन कोवळे
मन रुप सावळे.
मन अगाध कोडं
मन अनाम ओढ.

मन लेउन पंख दिवाने तुझ्या आकाशी उडते.
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन श्रावणधारा
मन मोर पिसारा.
मन झाड आनंदी
मन फुल सुगंधी.

मन इन्द्रधनू सतरंगी रंगात रंगुनी जाते
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन थरथरणारे
मन भिरभिरणारे.
मन दीस सुगीचा
मन चांद नभीचा.

मन पाउसवेडे चकोर तुझ्या चांदणी न्हाते.
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

मन रेशीम धागे
मन अखंड जागे.
मन धुंद तराणे
मन वेडे शहाणे.

मन रडतानाही हसते तुझ्याचसाठी झुरते.
मन कोकिळकंठी स्वराने हे गीत प्रीतीचे गाते.

-अरुण नंदन

दोन पाखरं काही वेळ एका फांदीवर बसून चिवचिवली म्हणून काही त्यांची घरटी एक होत नसतात.

केंव्हातरी आपणासोबतचं पाखरू फांदीवरून उडून जातं.
आपल्याला वाटत असतं ते आपल्यासोबतच आहे, कारण
आपली नजर समोरच्या विस्तृत आकाशाकडे असते.

पण तेंव्हाच त्या आकाशात उडताना आपणास पाहणारं
त्या फांदीवरती कोणी नाही हे समजल्यानंतर,

ते आकाशही त्या फांदीपुढे नगण्य वाटू लागतं..
आणि इच्छा होते परतण्याची...


मनात ओळी येतात..

रात्र नाही तुही नाही चंद्र नाही सोबती
तु दिलेल्या मोगर्याचा गंध नाही सोबती
सांग या तारांगणातून मी मला रमवू कसा
तारका न्याहाळण्याचा छंद नाही सोबती..
साला काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली........

काही जिवाभावने जपलेली
तर काही नुस्तीच नावापुरती उरलेली........

काही नितळ प्रेमासाठी जगलेली
तर काही बांन्डगुळासारखी दुस-याच्या जिवावर वाढलेली........

काही बिनधास्त सगळ्यांसमोर मांडलेली
तर काही भितीपोटी गुपितासारखी लपवलेली........

काही मैत्रीच नाव दिलेली
तर काही त्याहीपुढील प्रेमाचा गाव असलेली........

काहि ओझ्यासारखी वाहीलेली
तर काही आठवणींच्या ओलाव्यासारखी जपलेली........

काहि नकळत मनाशी जुळलेली
तर काही स्वत:च अस्तिवच हरवलेली........

काहि नुस्तीच नावपुरती ठेवलेली
तर काही उराशी जिवापाड सांभाळलेली........

काहि मनसोक्त एकमेकांसोबत बागडलेली
तर काही मान-अपमानाच्या ओझ्याखाली दबलेली........

काही मोत्याहुन अनमोल ठरलेली
तर काही भंगारासारखी विकाया काढलेली........

साला काय असतात ना ही नाती
काही मनापासुन जोडलेली
तरं काही सहज तोडलेली........

योगदान: स्वाती नारकर
कवी: अद्न्यात

केव्हा भेटलो काळनुक्रमे लावा
आयुष्याची रिकामी जागा भरा

तुमच्याबरोबर आमच्या जोड्या लावा
आमची विसंगती दूर करा

नकार द्याचा तर संदर्भासाहित स्पष्टीकरण द्या
कोण कोणाला काय महटले ते सांगा

आमचाच पर्याय निवडा
जीवनाचे समीकरण लिहु

एका वाक्यात उत्तर नाही जमले तर
का जमले नाही त्यावर कारणे लिहा

तुम्हीच का आवडता यावर निबंध लिहलय
आमचे म्हणणे चूक की बरोबर सांगा

आयुष्याची उत्तर पत्रिका कोरी
पास की फेल ते सांगून टाका

कुडळ विजय

Thursday, November 22, 2007

नको बारवाल्या, दारू असा पाजू...
तोल हा सर्वथा, जाऊ पाहे!

कमालिचे धाडस, आज हे जाहले...
पिऊन टुन्न झालो, आपण मित्रा!

घरचाही ठाव न, दिसे मम नयनी...
बदडूनि काढती, बाप आणि आई!

उलटूनी आज, जाहलो बेहोश...
घेई या मित्रास, घरामध्ये!!

विडंबन : चंद्रजित
आता काय सांगणार
तुला कसे सांगणार
की बोलायचे आहे ,ते मनातच राहणार

स्वप्नात राहू
कसे मी सहु
की तुला दररोज ,फक्त चोरुनच पाहु

केव्हा तू फसणार
गालात खुदु हसणार
भांडून माझ्याशी,लगेच रुसणार

लाडे कुशीत बसणार
हृदयात चूप घुसणार
वाट पाहशील ,जेव्हा मी नसणार

केव्हा तू येणार
मला होकार देणार
केव्हा तुला ,घरी नेणार

-- विजय कुडळ

Wednesday, November 21, 2007

पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी........
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी........

तू मोहक हसतोस, तेव्हा मी हरखुन जाते;
भोवतालचे जग, अगदी विसरुन जाते;
तुझ्या हास्यासारखेच निर्भेळ प्रेम मला देशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझ्या श्वासाचा गंध, मला मुग्ध करतो;
तुझ्या नजरेतला अवखळ भाव, मला निःशब्द करतो;
तुझ्या या स्वप्नील डोळ्यात, तू मला बद्ध करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझी निरागसता, माझ्या मनाला भावते;
तुझी रसिकता, माझ्या ह्रदयाला भुलावते;
तुझ्या स्वभावासारखेच निर्मळ, आयुष्य माझे करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

तुझ्या मिठीत मला, स्वर्ग सापडतो;
तुझ्या सहवासात, भावनांचा आविष्कार घडतो;
तुझ्या या निर्मय जीवनाची, अर्धांगी मला करशील का?
पुन्हा एकदा, फक्त माझ्यासाठी, पुन्हा एकदा हसशील का?

- निरज कुलकर्णी

सांजवेळी...

समुद्र किनारा,
शांत वारा;
तुझा नि माझा एकांत,
प्रितीच्या धारा.

तुझा हात माझ्या हाती,
अन पाणावलेल्या नेत्रकडा;
लांबलेला क्षणाचा धागा,
थांबलेल्या सर्व वेळा.

दोन शरीरं आपली,
पण आत्म्यांचं मिलन केव्हाच झालेलं;
दोन ह्रदयं आपली,
पण एकच स्पंदन केव्हाच झालेलं.

माझं नि:शब्द प्रेम,
तुझी निखळ निरागसता;
माझी प्रज्वलीत प्रतिभा,
आणि तुझी निरामय निरागसता.

व्याकुळलेली माझी नजर,
ह्रदयाचा ठोका चुकलेला;
बेधुंद होण्याचा क्षण,
अगदी थोडक्यात मुकलेला.

- निरज कुलकर्णी
निरोप

निरोपाच बोलण जरा लांबव..
थोड़ा श्वास घे ..
उछवासही टाक उगाच ..
अन बाकीच डोळयातुनच संपव.. !

विषय वाढवायचाच म्हणुन आठव ....
तो पुनवेचा चंद्र,
अमावस्येचा अंधार
अन् बाकीच आठवणीतच संपव ...!

तसा काही विशेष आठवु नको...
सोबत पाहिलेली स्वप्न ही ,
अन् मनोराज्य ही...
तुटणारां तारा पुन्हा दाखवू नको..!

जमलंच तर राहू दे तसाच...
अंगावरचा शहारा,
अन् स्तब्ध राहिलेला वारा..
डोळयातलं पाणी वाहू दे उगाच...!

विसरून जा ती पाउलवाट
तो भरतिचा चंद्र,
आणि ओहोटीची लाट
वाळुंतली नावे ही पुसून टाक...!

आता इतका करतेच आहेस तर..
पुनॅजन्माच वचन देऊन टाक,
अजुन थोड़ा खोट बोलून टाक
त्या जन्मी तरी "पुन्हा भेटू " म्हणून टाक...!

-- विनायक
सान्ज अबोल्यात ओली
रात्र थरारत गेली;
तुझ्या डोळ्यातील आसु
आता पहाटेच्या गाली.

गुरफ़टलेल्या श्वासान्ना
स्वप्नान्चा आधार;
गुदमरलेल्या ओठातील
शब्द होते निराधार

निरागस पापण्यान्ना
आसवान्चा भार;
मिटलेल्या डोळ्यान्ना
हुन्दक्यान्चे वार.

तुझ्या श्वासात गोन्गावणार वादळ
आज नि:शब्द होत होते;
मला हवे होते शब्द
अन त्याचे नि:शब्दाचे व्रत होते!

--योगेश.
वाटतं कधी कधी मलाही
मन मोकळं करावं
बंधनाचे पाश तोडून
लांब कुठे उडून जावं.......

वाटतं कधी कधी मलाही
खुदकन हसून लाजावं
'How sweet' म्हणून
कुणीतरी मलाही म्हणावं........

वाटतं कधी कधी मलाही
कोणावर प्रेम करावं
समोरच्याला सगळं दे‌ऊन
आपण मात्र रीतं व्हावं..........

वाटतं कधी कधी मलाही
कोणालातरी जिंकावं
लटका राग,गालावर हसू
आणि डोळ्यातच त्या हरवावं........

वाटतं कधी कधी मलाही
कळी सारखं खुलावं
फुलाच्या त्या सुगंधाने
मन कोणाचं मोहरावं.........

वाटतं कधी कधी मलाही
येत्या पावसात भिजावं
थेंबांच्या त्या साक्षीनेच
कुणीतरी आपलं वाटावं.........

- रसिका
http://aamhishabdabhramar.blogspot.com/

पावसाची रात्र नशीली ... आणि हवास तू जवळी
धुंद व्हावे तन मन आपुले ... रिमझिम सरींच्या तालावरी

बेहोश व्हावे भिजूनी चिंब ...भान नसावे दोघांनाही
अलगद ओठांनी टिपावेस तू , थेंब माझ्या गालावरी

मिळता नजरेस नजर... ओठ थोडे थरथरावे ,
हात घेऊनी हातामध्ये, सारे जग विसरावे ...

रेशमी स्पर्शाने तुझ्या ... अंगअंग मोहरूनी यावे,
होऊनी रोमांचित दोघांनी, बाहूपाशात हरवावे ...

तुझ्या ऊबदार मिठीतली ... रात्र कधीच उलटू नये ,
विरहाचं ऊन पसरवणारी ... अशी सकाळ कधी येऊच नये !!!!!!!

-- स्नेहा पोहनकर

Tuesday, November 20, 2007

शब्द मोत्यांसारखे असतात म्हणून कसेही माळायचे नसतात....
शब्दांच्या ओळी होतांना, शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!

खुप
दिवसानंतर आज तुझा आवाज ऐकला,
तो गोड आवाज ऐकुन श्वासही क्षणभर थांबला,
मनातील विचारांचा जमाव थोडासा पांगला,
तुझ्याशी बोलताना वाटले, एकटेपणा संपला!

चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!

प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे,
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे!

प्रेम होतं किंवा केलं जातं
यावर पुर्वी पासुन वाद आहे
पण एक मात्र नक्की,
जो प्रेमात पडला...
तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!

प्रचंड सळसळ करू लागते.. तुझी आठवण !
पाचोळ्यागत भरू लागते.. तुझी आठवण !

घरट्याभवती गोळा होती पाखरे तशी
मनभर भिरभिर फिरू लागते.. तुझी आठवण !

सापडल्यावर कवितांची कधि जुनी वही
पुन्हा नव्याने झरू लागते.. तुझी आठवण !

पापणीतल्या पाण्यावरती कधी अचानक
हलते आणिक विरू लागते.. तुझी आठवण !

चालत चालत दूर दूर मी जातो तरिही
उरी खोलवर उरू लागते.. तुझी आठवण !

विसरायास्तव तुला पुस्तके वाचत बसतो,
'अभंग' बनुनी तरू लागते.. तुझी आठवण !

कधी एकट्या सायंकाळी निवांत बसता
अवघे अंतर चिरू लागते.. तुझी आठवण !

कवी: अद्न्यात
डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि

शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात

कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो

डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात

नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार

जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं

शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती

स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही

अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही

कधी कधी जवळ
कुणीच नसावसं वाटतं
आपलं आपण
अगदी एकट असावसं वाटत....

कोण कहते है भगवान आते नही (२)
मित मिरा के जैसे बुलाते नही ॥

अच्युतम केशवम राम नारायणम
कृष्न दामोदरम गोपिका वल्लभम ॥

कोण कहते है भगवान खाते नही (२)
बेर शबरी के जैसे खिलाते नही ॥

अच्युतम केशवम राम नारायणम
कृष्न दामोदरम गोपिका वल्लभम ॥

कोण कहते है भगवान नाचते नही (२)
गोपियोंकि तरहा तुम नचाते नही ॥

अच्युतम केशवम राम नारायणम
कृष्न दामोदरम गोपिका वल्लभम ॥

कोण कहते है भगवान सोते नही (२)
मा यशोधा कि तरहा सुलते नही ॥

अच्युतम केशवम राम नारायणम
कृष्न दामोदरम गोपिका वल्लभम ॥

छेडिलेत सुर सारे...
तोडल्यात तारका...
सोडून ताल बरसती...
बेधुंद जल, जल-धारका....

चिम्ब चिम्ब भिजलि ती...
धरतीवरील मेनका...
चेह~यावरील थेंब जणू...
सांडल्यात मौक्तिका....

कमनिय तिची काया...
ती मूर्तीमंत शोभिका...
चढे नशाही यौवनी...
हा मद्यप्याला नेत्रिका...

स्पर्शितात केस ओले...
गालावरी ती नक्षीका...
उडालेत होश माझे...
अशी सौंदर्य मोहिका....

मंद मंद तिचे हास्य..
खळी शोभे नाजुका...
भिजलेले ओठ तिचे...
सुटतो हा धीर का...

मी न माझा राहिलो...
स्तब्ध ही झाली घटिका...
कसा विसरु तिला मी...
ती कल्पिलेलि प्रेमिका....

---हर्षल पाटील ( मेघराज )

नशा वादळाची निशा वादळाची
नशीली निशा वादळी वादळाची

छातीस माझ्या तुझे बोट गोरे
ही नांदी म्हणावी नव्या वादळाची

संचारली वीज कल्लोळ झाला
हवा भोवताली खुळ्या वादळाची

कवटाळते घट्ट आकाश मेघा
मुसळधार खुल्ली ही झड पावसाची

सुखावून गेली धरित्री उपाशी
झाडांस "चढली" नशा वादळाची

कुठे 'नाम' नाही निशाणी कुणाची
तुला साथ माझी, मला वादळाची

- सुनिल सामंत

"निर्माल्यं"

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
आहो एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
पूजेचं फूल बनून त्या ईश्वराच्या चरणी अर्पण करायचंय स्वतःला.

येता जाता प्रत्येकजण आता हात जोडेल.(२)
देव्हाऱ्यात मला वाहताना,माझ्याच रुपाने "भक्ती" त्यांची घडेल

पण माझं अस्तित्व तिथे एक दिवसंच असेल(२)
ऊद्या तुम्हाला तिथे नवं फूल दिसेल

एका दिवसांतच आता होईल माझं निर्माल्य.(२)
पण सुकलेल्या फूलाकडे पाहतानाही आठवेल तुम्हाला ते सारं मांगल्य

सुकलेल्या फूलाचीही पाकळी न पाकळी तुम्ही ठेवाल जपून(२)
असंच एके दिवशी मग द्याल मला गंगेमधे झोकून.

पण तिथेही माझ्या नशिबी गंगेचं निर्मळ पाणी असेल(२)
ऊद्या तुम्हाला माझ्या जागी एक नवं फूल दिसेल.

माझं निर्माल्य खऱ्या अर्थानं तेव्हा निर्मळ झालं असेल.(२)
गंगेत न्हायल्यावर कोमेजलेल्या फूलाची पाकळी न पाकळी हसेल

एकंच दिवस का असेना पण तो मी सन्मानाने जगेन.(२)
गंगेमधे मिसळताना तोच मंगलमय दिवस निरंतर मी स्मरेन....
निरंतर मी स्मरेन.......

कुणाल.

Monday, November 19, 2007

दु:ख
खोदुन, वेचून काढले तरी भसकन,
वर तोंड काढणाऱ्या (गवत) हरळीसारखे..!

दु:ख
हुसकवून लावले तरी
सतऱ्यांदा घरात येणाऱ्या "खुडुक" कोंम्बडीसारखं...!

दु:ख
पोत्यात बंद करुन आडरानात सोडले तरी
आपसुक घरी येणाऱ्या मांजरीसारखे...!

दु:ख
कित्येकदा तुटले तरी
अलगद पुर्ववत येणाऱ्या पालीच्या शेपटीसारखे

दु:ख
माणसांनी विसरवण्याचा प्रयत्न केला तरी
ते फ़क्त माणसाशीच
एकरुप झालेलं दुधातील पाण्यासारखं

--प्रा. विनय चौधरी,
तुळजापुर
कळत नाही कधी कधी,
हे असे का होते?
मन कोणासाठी तरी,
एवढे वेडे का होते?

ज्याच्यासाठी हे वेडे होते,
त्याला ते माहितीही नसते,
मग आपल्याच मनाला,
हे असे का होते?

कधी स्वपनांच्या दुनियेत हरवते,
कधी जगाला ही विसरते,
कधी मोहाच्या चार क्षणांसाठी,
हे क्षण क्षण झुरते.

माहिती नाही अजुन हे,
असं किती दिवस चालणार?
स्वपनांच्या दुनियेतून अखेर हे,
माझं मन कधी बाहेर पडणार?

कवी: अद्न्यात
मलाही वाटतं कधि कधि,
आपणही प्रेम करावं..
कोणाच्या तरी गोड हसण्यावर,
मी सुद्धा वेडं व्हावं...

नदी काठी एका सुंदर संध्याकाळी,
आम्ही दोघेच असावं....
पहिल्या पावसात मातीचा गंध घेत,
अम्ही दोघांनीच फिरावं.......

माझं तुझ्यावर प्रेम आहे
अस एकमेकाला सारखच का सांगाव?
दोघांच्याही मनात हे सत्य,
खोलवर कोरलेलं असावं

प्रेम हे कधीही बंधन वाटू नये,
कितीही वर्षं लोटली तरी
त्यातली मजाच संपू नये...

तिनेच प्रत्येक वेळी
का म्हणून स्वतःला बदलाव?
तिच्यासाठी कधि कधि
मी ही आपलं म्हणणं सोडावं....

पण काय करु?
माझं मन जाणणारी मला कोणी भेटतच नाही!
की तुम्हीच सांगा, प्रेम म्हणजे नक्की काय
हे मला कळतचं नाही

कवी : अद्न्यात
डोळ्यात माझ्या धार क, सांगेन मी केव्हा तरी
झालेत वैरी यार का, सांगेन मी केव्हा तरी

आताच माझी ’ती’ कथा नाही बरे छेडायची!
झाले फुलाचे वार का, सांगेन मी केव्हा तरी

पेलीत होतो मी कधी काटेच काटे जीवनी,
आता फुलेही भार का, सांगेन मी केव्हा तरी

होती जरी तेव्हा मनी जग जिंकण्याची शक्यता
ही घेतली माघार का, सांगेन मी केव्हा तरी

नाराज नाही जिवना, मी आज ही, रे तुजवरी
झालो तुला बेजार का, सांगेन मी केव्हा तरी

प्रा. टी. के. जाधव
पंढरपूर.