ती दहाची नोट तेवढीच त्याची संपत्ती
दप्तराचा कप्पा
कप्प्यातली कंपास
कंपासमधलं कोनमापक
आणि कोनमापकाच्या खाली बंदोबस्तात घडी करून ठेवलेली दहाची नोट
शाळेला उशीर झालाच होता
घिसाडघाईत जेवण झालं
अर्धमुर्ध भरलं पोट
बॅगेत भरली दहाची नोट
प्रार्थना सुरू असतांना
धापा टाकत आला
मान खाली प्रश्नाला
आज उशीर का झाला?
अंदाज होताच त्याला कदाचित होईल आज शिक्षा
उर फुटेस्तोर धावत आला पण केली नाही रिक्षा
शिक्षा पूर्ण झाल्यावर
बसला जाऊन बाकावर
ना अपराधी वाटलं त्याला
ना राग होता नाकावर
पाठ चांगलीच दुखत होती ओणवं उभं राहून
कंपासमधली नोट तेवढ्यात हळूच घेतली पाहून
यांत्रिकतेने फळ्यावरचं वहीत उतरलं थोडं
मनात मात्र दौडत होतं दहा रुपयाचं घोडं
एका मागून एक तास सरत गेले
मधली सुट्टी झाली
नोटेपुढे भूकही विसरून गेली स्वारी
बाकाबाकावर दिसू लागले नानारंगी डबे
फेरीवाले, आईसफ्रूटवाले शाळेबाहेर उभे
पैसे होते खाऊचे लागेल ते घ्यायला
पण शेवटी शाळेतल्या नळाचंच थंड पाणी प्याला
भुकेलेल्या पोटात त्याच्या थंड पाण्याचा घोट
पण अजून शाबूत होती त्याची दहाची नोट
बाबांनीच सकाळी खाऊसाठी दिलेली
पाठोपाठ आईसुद्धा ऑफीसला गेलेली
कार्टून पाहून झालं आणि गृहपाठही झाला
नोट घट्ट मूठीत ठेवून तो झोपी गेला
इवल्याश्या पेंगुळलेल्या डोळ्यांनी पाहिलं घड्याळाला
उडाली झोप, गडबड झाली शाळेला उशीर झाला
धांदलीतच त्याचं मग आटोपलं सारं
तरीही काळजीपूर्वक त्याने लावून घेतली खिडक्यादारं
आठवणीने ठेवून चावी शेजारी आला
आणि धावतपळत धडपडत शाळेला निघता झाला
अशाप्रकारे आज
शिक्षा भोगली
भूक सोसली
बरेच काढले हाल
काय करणार अखेर सारा दहाच्या नोटेचा सवाल
मधली सुट्टी संपली पुन्हा तास झाले सुरू
चिमण्यांनी भरून गेले वर्गरूपी तरू
चिमण्याच त्या दिवसभर निरागस चिवचिवणार्या
कापसाच्या घरट्यातून अचानक आभाळात भिरभिरणार्या
त्याच्याही डोक्यात होताच की विचारांचा चिवचिवाट
तासाशेवटी लिहून दिला हातभर गृहपाठ
वर्गात मुलांचे आळोखेपिळोखे सुरू झाले
शेवटचे रटाळ तास संपल्याचे टोल आले
संपली एकदाची
वारूळ फुटलं
जणू माश्या उठल्या
पोळं फुटलं
मुलांचा गलका
पालकांची गडबड
हसरे चेहरे
छोट्यांची बडबड
कुणी शाळेच्या भिंतीवर चढलेला
कुणाला मोठ्या दादांनी घेरलेला
कुणी मधल्या सुट्टीतली शिलकीतली लिमलेट गुपचूप घेतली खाऊन
कुणी चिंतातूर दमलेला आईची वाट पाहून
या गडबडीत मित्रांना चुकवून हा भरभर चालत सुटला
मित्र म्हणले असतील कदाचित "भावखाऊ कुठला"
नेहमीचा रस्ता
सवयीचा रस्ता
मंदिर आलं
दवाखाना आला
ते मैदानही मागे पडलं
वडापावच्या गाडीजवळून उजवीकडे वळला
पण ही नवी वाट
नजरेत शोधाशोध
बहुतेक वाट चुकला
बसस्टॉपवरती पाहिलं
आणि मनाशीच हसला
थोडं चालत पुढे गेला
त्याच्या ओळखीचा चेहरा
नावं नव्हतं माहित
म्हणून हाका मारली "ए मुला"
दिसतोस तू मला पैसे मागतांना
रोज लोकांकडून ओरडा खातांना
काल बाजारात त्या काकांनी तुला बेदम मारलं
मी बघत होतो उभा
आईने मला ओढत घरी आणलं
माझ्याकडे तेव्हा पैसे असते
तर तुला पक्का दिले असते
ए मला सांग तू पैसे का मागतोस?
तुला घरातून खाऊसाठी कोणी पैसे देतं का?
तुला सुट्टीच्या दिवशी बागेत फिरायला कोणी नेतं का?
पण सुट्टी ... तुला .. अं ..
बाबांना सांगून तू नवे कपडे का नाही घेत?
आमच्यासारखा तू शाळेत का नाही येत?
रडू नकोस
रडतोस का असा?
आजही कुणी मारलं का रे?
आईला नाव सांग त्यांचं .. ती ओरडेल
आईला सगळं सांगत जा रे ....
आई बाबा शाळा कपडे याची बडबड होती सुरू
रस्त्यावरचा तो भणंग भटका
ढोरासारखा लागला रडू
याला काही कळेना पण चेहरा पडला
वाटलं आपल्याच हातून काही मोठा गुन्हा घडला
रडू नकोस एक गंमत आणलीय मी
अरे बघ तरी
दप्तर उघडलं
कप्पा उघडला
कंपास उघडली
कोनमापक उचलला
बंदोबस्तातली दहाची नोट हलकेच बाहेर काढली
हे ठेव खाऊला
आज तुला कुणी मारणार नाही
हस आता तरी
चल चल उशिर झालाय जायला हवं घरी
आजच्यापुरतीची त्याची सारी संपत्ती देऊन तो गर्दीत शिरला
पुढल्याच क्षणी त्याच्या संपत्तीत एक कृतज्ञ अश्रू जिरला
-साद
http://churapaav.blogspot.com/2009/12/blog-post_26.html
- प्रसाद साळुंखे
(कवीची पुर्वपरवानगी न घेता आवडले म्हणून पोस्ट करत आहे , क्षमस्व )