आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, February 15, 2008

कालच आमच्या कमावत्या पोरानं मोबाइल घेतला मला
म्हणला घ्या बाबा, मोबाइल व्हा
चार दिवस कौतुक केलं मी, घेउन सगळीकडे फिरलो
बागेत फिरताना हीला फोन करून ह्या वयात बायकोशी बराच वेळ बोललो !
मित्रांनाही येता जाता फ़ोन, येताय ना म्हणून आणि जाताय ना म्हणून
मग हळू हळू कंटाळा आला तेच तेच बोलून
फोनवर होतच्चे बोलणं म्हणून पहाटफेरी जरा कमी झाली
सरळ मोबाइलच करणारयांची मग खालनं हाक येइनाशी झाली
होता होता एक दिवस खरं काय ते कळलं
मोबाइल हातात देऊन पोरांनी मला इम्मोबाइल केलं
काय रे मोबाइल पिढीतल्या पोरांनो, भेटता ना तुम्ही अधून मधून
का दोस्तांबरोबर हुंडारणंही होतं तुमचं त्या मोबाइलच्या बटणांतून?

-- चिन्मय कानिटकर..

Wednesday, February 13, 2008

सहज जमते त्याला घरासमोर... येऊन ऐटीत उभे ठाकणे...
कपडे निकालके रखो मेमसाब... मै आ रहा हू असे म्हणणे
असलं हे अचाट साहसी कृत्य... फक्त धोबीच करू शकतो...
काही काही प्रोफेशन्स ला बघा काही आळाच नसतो!

दाताड गुल होईल त्याचं... जर पाहीलं वळून तिला कोणी...
सहज तो हात धरतो तिचा... नी हसून पाहती भाऊ दोन्ही
असलं हे अचाट साहसी कृत्य... फक्त कासारंच करू शकतो...
काही काही प्रोफेशन्स ला बघा काही आळाच नसतो

आम्ही एक थाप मारली... तर कुटुंबाने वाळीत टाकलं...
ते थापांचा कहर करतात... आणि साऱ्यांनी त्यांना पुजलं
असलं हे अचाट साहसी कृत्य... ढोंगीबाबाच करू शकतो...
काही काही प्रोफेशन्स ला बघा काही आळाच नसतो

एका पोरीसोबत कॉफी घेतली... तर हिने बदडून काढलं...
तो पन्नास पोरींसोबत असतो... ज्याचं पोस्टर रूममध्ये लावलं
असलं हे अचाट साहसी कृत्य... फक्त सिनेनटच करू शकतो...
काही काही प्रोफेशन्स ला बघा काही आळाच नसतो!

व्यथा कोणा कशी सांगू... मला काही कळेनासंच झालं...
आणि मग हे एक नवं काव्य... आपोआपंच जन्माला आलं
हे रिकामटेकडं कृत्य... मझ्यासारखा ऍनलिस्टंच करू शकतो...
काही काही प्रोफेशन्स ला बघा काही आळाच नसतो!

-- चंद्रजीत अ कांचन

कशास दाखवु जखमा कुणाला?
विझवले मी डोळ्यात आसु
ओलांडली थेंबांनी वेस कधीच
वाट तीच फ़क्त ओठात हासु

कशाला देतेस तुही साक्ष खोटी?
मी कधी तुझा नाकारला गुन्हा?
हा जुनाच दरवळतो ग सुवास
गंध तो न मी उधळला पुन्हा

बेरंग न करता तुझ्या मैफ़ीलीचा
बहराचे गीत मी गात राहीलो
कानी सा-यांच्या सुर गोठला
फ़क्त मीच अंतरात रंगलेलो

ईथे ’आपला’ कुणा म्हणु मी
श्वास माझाच मला परका झाला
उसण्याच माझ्या या जगण्याला
फ़ुटक्या क्षणांचा ग काय हवाला?

पथातले सारे यात्री भागले
चांदण्यात मी उरलो एकटाच
ईशारा नियतीचा जाणिला मी
शेवटचा माझा मुक्काम हाच....
शेवटचा माझा मुक्काम हाच....

--सचिन काकडे
पसायदान

आतां विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||||

जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||||

दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||||

वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||||

चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||||

चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||||

किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||||

येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||||


** व्हॅलेंटाइन्स डे ने अस्सं माझं गाढव केलंय **


काय सांगू दोस्तांनो ?

व्हॅलेंटाइन्स डे आला म्हणून जग नाचतंय
पण,मन माझं मात्र एका कोप-यात बसलंय..

होती माझी पण एक प्रेयसी देखणी
व्हॅलेंटाइन्स डे ला तिला मी घातली मागणी..

हातातल्या गुलाबाची लाली आली, तिच्या गाली
अन ’ मी तुझीच रे ’ अस्सं मला बिलगून बोलली..

मला वाटलं,माझ्या प्रेमकहाणीचा सुखांत होणार
कल्पना नव्हती,संसारात अडकून माझं वाटोळं होणार..

आम्हां प्रियकर प्रेयसीच्या डोक्यावर तांदूळ पडले
अन तत्क्षणी ’ नवरा बायको ’ जन्मास आले..

९ ते ६ ऑफिस झालं की
उरलेल्या वेळात श्वास घेतोय
अर्थमंत्री कुणीही येवो
संसाररथ महागाईतून रेटतोय..

खर्च कोण जास्त करतं ?
पसारा कोण आवरणार ?
पोरांचा अभ्यास कोण घेणार ?
तो तुझा ’ फक्त ’ मित्रच आहे ?
ती माझी ’ फक्त ’ मैत्रिण असू शकत नाही का ?
तुझ्या सासरचे चांगले की माझ्या ?

या मुद्द्यांवरुनच भांडतोय..

लाल गुलाब नाही आता
सफेद गुलाबच आणतोय..

व्हॅलेंटाइन्स डे ने अस्सं माझं गाढव केलंय
संसाराचं ओझं माझ्या गळ्यात मारलंय..

पण ,
ज्याच्या कवितेतून तिला मी मनोगत बोललोय
तो माझा मित्र मात्र आजही प्रेमकविता रचतोय..

आजही प्रेमकविता रचतोय..


- स्वप्ना
सकाळी उठावे | सुसाट सुटावे |
ऑफिस गाठावे | कैसेतरी ||

इच्छा गं छाटाव्या | पोळ्या अन् लाटाव्या |
वेळाही गाठाव्या | सगळ्यांच्या ||

चढावे बशीत | गर्दीत घुशीत |
रोज या मुशीत | कुटताना ||

धक्के ते मुद्दाम | नजरा उद्दाम |
गाठण्या मुक्काम | सोस बये! ||

उशीर अटल | चुकता लोकल |
जीवही विकल | संभ्रमित ||

लागते टोचणी | भिजते पापणी |
जावे का याक्षणी | तान्ह्याकडे? ||

मस्टर धोक्यात | छकुला डोक्यात |
आयुष्य ठेक्यात | बसेचिना ||

रोजची टुकार | कामे ती भिकार |
बंड तू पुकार | बुद्धी म्हणे ||

एक तो 'वीकांत' | एरव्ही आकांत |
समय निवांत | मिळेचिना ||

तेव्हाही आराम | असतो हराम |
कामे ती तमाम | उरकावी ||

लावून झापड | शिवावे कापड |
तळावे पापड | निगुतीने ||

कामसू सचिव | सखीही रेखीव |
गृहिणी आजीव | प्रियशिष्या ||

काया रे शिणते | मनही कण्हते |
कुणी का गणते | श्रम माझे? ||

नित्याची कहाणी | मनात विराणी |
जनांत गार्हाणीं | सांगो नये ||

पेचात पडतो | प्रश्नांत बुडतो |
जीव हा कुढतो | वारंवार ||

"अशी का विरक्त? | व्हावे मी उन्मुक्त |
जीव ज्या आसक्त | ते शोधावे ||

प्रपंच सगळा | सोडूनि वेगळा |
एखादा आगळा | ध्यास घेई ||

तारा मी छेडाव्या | निराशा खुडाव्या |
काळज्या उडाव्या | दिगंतरी ||"

अंगाला टेकत | लेकरु भेकत |
आणते खेचत | भुईवर ||

उशीर जाहला | जीव हा गुंतला |
प्रपंची वेढला | चहूबाजूं ||

कल्पना सारुन | मनाला मारून |
वास्तव दारुण | स्वीकारते ||

बंधने झेलावी | चाकोरी पेलावी |
वाट ती चालावी| 'रुळ'लेली ||

विसर विचार | रोजचे आचार |
होऊनि लाचार | उरकावे ||

काही मागणे | केवळ भोगणे |
रोजचे जगणे | विनाशल्य ||

हा जन्म बिकट | गेलासे फुकट |
हाकण्या शकट | संसाराचा ||

तरीही अखंड | आशा ही अभंग |
मनी अनिर्बंध | तेवतसे ||

ठेवा तो सुखाचा | निर्व्याज स्मिताचा |
विसर जगाचा | पाडी झणीं ||

जातील दिवस | निराश निरस |
झडेल विरस | आयुष्याचा ||

खरी की आभासी | आशा ही जिवासी |
बळ अविनाशी | देई खरे ||

पुनश्च हासून | पदर खोचून |
देई ती झोकून | हुरुपाने ||

-- नंदन होडावडेकर
http://marathisahitya.blogspot.com/