आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, December 18, 2009

सार्थ हिंदु नृसिंहा...........

सावरकरांची एक कविता आणि तिचा अर्थ...

हे हिंदु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री - सौभाग्य-भूतिच्या साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

=========================

हे हिंदु शक्ति-संभूत-दीप्ततम-तेजा

:- हे हिंदु शक्तिद्वारा उत्पन्न झालेल्या धगधगीत तेजस्वी पुरूषा !

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

:- हे हिंदुंनी अविरत केलेल्या तपस्येतून निर्माण झालेल्या ईश्वराच्या तेजस्वी अंशा !

हे हिंदुश्री - सौभाग्य-भूतिच्या साजा

:- हे हिंदुंच्या लक्ष्मी व सौभाग्य ऐश्वर्याच्या अलंकारा !

हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा !

:- हे हिंदुंसाठी कलियुगात अवतार धारण करणार्‍या नरसिंहरूप शिवराया !

(ज्या प्रमाणे नरसिंहाने हिरण्यकश्यपू राक्षसाला फाडले त्याच प्रमाणे शिवरायांनी अफजल खान रूपी राक्षसाला फाडले हा एक अर्थ आणि सिंहा समान शूर असणारा राजा म्हणून नरसिंह असाही एक अर्थ)
 
करि हिंदुराष्ट्र हें तूतें ! वंदना
करि अंतःकरण तुज अभि-नंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना
गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

===================================

करि हिंदुराष्ट्र हें तूतें ! वंदना

:- हे हिंदुराष्ट्र तुजला वंदन करीत आहे.

करि अंतःकरण तुज अभि-नंदना

:- (हे हिंदुराष्ट्र) तुझी अंतःकरणापासून भलावण करीत आहे.


तव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदना

:-(हे हिंदुराष्ट्र) तुझ्या पावलांना भक्तिभावाने चंदन लेपत आहे.

गूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, माझ्या काही अत्यंत गुप्त अशा महत्वाकांक्षा आहेत, त्या तुम्ही पूर्ण करा. त्या गुप्त महत्वाकांक्षा पूर्ण करा, ज्या मी प्रगटपणे (पारतंत्र्यात असल्यामुळे) कथन करू शकत नाही.
 
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा भग्न आज जयदुर्ग आंसवामाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे ! भंगले
जाहली राजधान्यांची ! जंगले
परदास्य-पराभवि सारीं ! मंगले
या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

==========================

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

:- गड कोटांचे तट आज भग्नावस्थेस पोहचलेले आहेत.

हा भग्न आज जयदुर्ग आंसवामाजी

:- एके काळी विजयोत्सव साजरे करणारे दुर्ग आज आश्रू ढांळत आहेत.

ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा

:- एकेकाळी प्रतक्ष भवानी देवी ज्या तरवारींमध्ये संचार करीत होती, त्या तरवारींची पाती आता (अहिंसा व्रताचरणाने) न वापरली गेल्या मुळे गंजून गेलेली आहेत.

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

:-आमच्या शस्त्रांस्त्रांची आम्हीच आशी आबाळ केल्यामुळे, एके काळी
आमच्या शस्त्रांमध्ये वास्तव्य करणारी ही भवानी आज कुणाला आधार देईनाशी झाली आहे.

गड कोट जंजिरे सारे ! भंगले

:-गिरीदुर्ग आणि जलदुर्ग आज पूर्णपणे भंगलेले आहेत. (आमचा इतिहास आम्ही पूर्ण विसरून गेलो आहोत व आमच्या स्फुर्तीस्थानांना आज अवकळा प्राप्त झालेली आहे.)

जाहली राजधान्यांची ! जंगले

:- एके काळी सप्त गंगांच्या साक्षीने जिथे राज्याभिषेक झाले, अशा आमच्या राजधान्यांची आज जंगले झालेली आहेत. (आम्ही एके काळी 'पृथ्वी वल्लभ' होतो हेच मुळात आम्ही विसरून गेलेलो आहोत.)

परदास्य-पराभवि सारीं ! मंगले

:- पारतंत्र्यात जगताण्यात व पराभूत जिणे जगण्यातच आज आम्ही धन्यता मानीत आहोत.

या जगतिं जगू ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, हे असले लाजीरवाणे जीवन कंठावे लागत असल्यामुळे या जगात जगतांना लाज वाटत आहे.
 
जी शुद्धी हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धी पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कुटनीतीत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतुचि कर्मी ! राहु दे
ती बुद्धी भाबड्या जींवा ! लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी ! वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

===============================

जी शुद्धी हृदाची रामदासशिर डुलवी

:- (तुझे) निर्मळ व शुद्ध अंतःकरण असे आहे की जे पाहून प्रत्यक्ष रामदास स्वामींनी अत्यानंदाने मान डोलवली.

जी बुद्धी पांच शाहींस शत्रुच्या झुलवी

:- (तुझी) अफलातुन बुद्धी अशी होती की जीने पांच पातशाह्यांना पराभवाच्या तारेवर झुलवत ठेवले.

जी युक्ति कुटनीतीत खलांसी बुडवी

:- (तुझी) युक्ति कुटनितीत (श्रीकृष्ण व चाणक्याने दाखवून दिलेली निती) इतकी प्रगल्भ होती की जीने कित्येक दुष्ट शत्रुंना रसातळाला पोहोचवले.

जी शक्ति बलोन्मत्तास पदतली तुडवी

:- (तुझी) शक्ति अशी अफाट होती की जीने बळाने उन्मत्त झालेल्या कित्येक राक्षसांना पायदळी चिरडून टाकले.

ती शुद्धी हेतुचि कर्मी ! राहु दे

:-आम्ही आमची कर्मे करीत असताना व हेतू साध्यता करीत असताना, ते तुझ्या सारखे निर्मळ व शुद्ध अंत:करण आमचेही राहू देत. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

ती बुद्धी भाबड्या जींवा ! लाहु दे

:- पांच पातशाह्यांना झुलवत ठेवणारी ती अफाट बुद्धीमत्ता या परम सहिष्णू भाबड्या हिंदुंनाही जरा लाभु देत. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

ती शक्ती शोणितामाजी ! वाहु दे

:-बळाने उन्मत्त झालेल्या राक्षसांना पायतळी तुडवणारी तुझी ती शक्ति आम्हालाही रणांगणात युद्ध करताना अंगात संचारू देत व त्या शक्तीने शत्रुच्या चिंधड्या उडवताना आम्हांस रक्तस्नान घडू देत.

दे पुन्हा मंत्र तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

:- हे हिंदु नरसिंहा शिवाजी राजा, समर्थ रामदास स्वामींनी तुला जो स्वातंत्र्याचा मंत्र दिलेला होता तो तू पुन्हा आमच्यात संक्रमीत कर. (एवढीच गूढाशा/ गुप्त महत्वाकांक्षा)

कवी - स्वातंत्र्यवीर सावरकर
स्त्रोत : विरोप

Thursday, December 17, 2009

मराठी भाषेची ताकद

मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?

केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये 'कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे


परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.


पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला.


पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.


पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले.


पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.


पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली.


पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.


पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले. प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.


पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या.


पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.


स्त्रोत: विरोप
लेखक : शंतनू भट