मेडिकल रिप्रेझेंटिटिव्ह विन्या प्रधान एके रात्री आडगावातल्या एकमेव लॉजच्या रिसेप्शन काऊंटरवर उभा होता. शेवटची एसटी चुकली होती आणि रात्र या बकाल लॉजवर काढण्याला पर्याय नव्हता. त्यात समोरचा कारकून सांगत होता, ''साहेब, एकच बेड शिल्लक आहे पण तो आमच्या घाशीराम घोरणेच्या रूममधला. त्याच्या सातमजली घोरण्यामुळे त्या मजल्यावरचे सगळे कस्टमर कम्प्लेंट करतात. त्याच्या खोलीत तुमची व्यवस्था केली, तर तुमची काय अवस्था होईल?''
'' माझी चिंता करू नका. मस्त आरामात झोपेन मी,'' शिट्टी वाजवत विन्या उत्तरला आणि रूमकडे निघालासुद्धा...
... दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम गाढ झोपून फ्रेश झालेला विन्या चहा प्यायला खाली उतरला, तेव्हा चकित होऊन रिसेप्शन क्लर्कने विचारलं, ''साहेब, झोप लागली तुम्हाला? कशी?''
'' एकदम गाढ झोपलो मी,'' विन्या हसत उत्तरला, ''रूममध्ये गेलो तेव्हा तुमचा तो घाशीराम घोरणे नावाला जागून घोरत होताच. मी जाऊन त्याच्या गालाची एक पप्पी घेतली आणि अगदी नाजूक आवाजात म्हणालो, 'गुडनाइट स्वीटहार्ट, छान गाढ झोप हं!' हा हा हा! रात्रभर बिचाऱ्याचा डोळ्याला डोळा नाही लागला, तर घोरणार कुठून!!!!!''
__________________________________________________________________
संता नवीकोरी गाडी घेऊन निघाला होता. दुर्दैवाने वाटेत त्याला गारपिटीने गाठलं. टणटणीत गारांच्या माराने गाडीच्या सर्वांगाला पोचे आले. संता गाडी गॅरेजमध्ये घेऊन गेला. मेकॅनिकला गाडीचा पत्रा सरळ करून द्यायला सांगितलं. त्याला जरा संताची चेष्टा करण्याची लहर आली. तो म्हणाला, ''ओय प्राजी, मी दुरुस्त करेन, पण त्यात १५ दिवस जातील आणि १० हजार रुपयांचा खर्चही येईल. त्यापेक्षा तुम्ही स्वत:च ही गाडी फुकटात का नाही दुरुस्त करत?''
फुकट म्हटल्यावर संता पाघळला, ''कशी काय?'' मेकॅनिकने संताला उपाय सांगितला. संता आनंदाने गाडी घेऊन घरी आला. दोन तासांनी बंता जेव्हा संताच्या घरी पोहोचला, तेव्हा बंता गाडीच्या मागे एक्झॉस्ट पाइपला तोंड लावून हवा फुंकत असलेला दिसला. बंताने विचारलं, हे काय, तेव्हा संता उत्तरला, ''अरे गाडीचे पोचे काढून पत्रा सरळ करायचा उपाय चाललाय हा.''
'' हरे राम,'' कपाळावर हात मारून बंता म्हणाला, ''असा आयुष्यभर फुंकत राहिलास तरी निघतील का पोचे? गाडीच्या काचा कोण बंद करणार?!!!!!''