कोण मी?
विचारू कोणास आहे कोण मी?
सत्य की आभास, आहे कोण मी?
भविष्याला काय देऊ उत्तरें?
धुंडतो इतिहास, आहे कोण मी?
निरुत्तर तीही जिने सांभाळले
असे मज नवमास, आहे कोण मी?
निसर्गाने घात केला, जन्मलो
नवस ना सायास, आहे कोण मी?
जुगारी ना मी, न माता कैकयी
का तरी वनवास, आहे कोण मी?
नसे काही फायदा जाणून पण
तरी अट्टाहास, "आहे कोण मी"?
पुसे जाताना शरीरा सोडुनी
अखेरीचा श्वास, "आहे कोण मी"?
रिचव प्याले, प्रेम कर, बेधुंद हो
कशाला पत्रास,"आहे कोण मी"?
कशाला तत्त्वज्ञ, वेड्या, व्हायचे?
उमजले कोणास आहे, "कोण मी"?
'भृंग' तू गुंजारवाचे गीत गा
प्रश्न हा बकवास आहे, "कोण मी"?