आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Saturday, July 25, 2009

एल्गार


इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.

     ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही
     मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.

गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते.

     मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी
     मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते.

     याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
     मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते.

घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते

     मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
     मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते.

-:    एल्गार     :-
- सुरेश भट 

Tuesday, July 21, 2009

तुका म्हणे


आज वाचनात आलेल्या या छान ओळी...

अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ l त्याचे गळा माळ असो नसो ll
आत्माअनुभवी चोखाळिल्या वाटा l त्याचे माथा जटा असो नसो ll
परस्त्रीचे ठायी जो का नपुंसक l त्याचे अंगा राख असो नसो ll
परद्रव्या अंध निंदेसी जो मुका l तोची संत देखा तुका म्हणे ll


आई


आई !' म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई


शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा 'शुभं करोति'

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । 'आम्हास नाहि आई'
सांगे तसे मुलीना । 'आम्हास नाहि आई'
ते बोल येति कानी । 'आम्हास नाहि आई'

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

.. गीत - यशवंत

स्त्रोत : विरोप