तारीख सात :
मी आलो घरी,
अंतर्मुख होउनच..
पण दारात,नेहमीचेच स्वागत !
पगाराच्या दिवशी पत्नीच्या चेह-यावरचे सुहास्य भाव,
कदाचित पहिल्या रात्रीही नसतील इतके !
आणला का? चला आधी घरात, देवाजवळ ठेवा ते !
भोळीच ती, म्हणते पैसा टिकतो अशानं……
क्षणभर अभिमान वाटला,
जुन्याच साडया हरतलिकेला अन पाडव्याला नविन म्हणून वापरणा-या बायकोचा.
सौः- लावू उद्यापासून एकेकाचे ! अगदी शेवटचा रुपया शिल्लक असेपर्यंत,
मी :- शिल्लक तिच्या पुढयात, रुपयाच्या वर्तुळासारखा ! !
आई,
चश्म्याइतकीच वाळलेली !
ह्या महिन्यात जमेल का रे फ़्रेम बदलायला ?
टोचते रे ती ! दो-यां नी बांधून नाही राहत दांडया !
श्रावणात काही वाचीन म्हणते देवाधर्माचं !
मी :- वाचक तिच्या डोळ्यातल्या अनेक श्रावणांचा !
वडिल,
असंख्य आभाळं पाठीवर !
डॉक्टर म्हणतात की फिरायला पाहिजे,
वॉकर जमेल का रे या बजेटमद्ये !
कुलकर्ण्यांइतका भारी नको,
पण पाय दुखतात रे म्हणून !
मी :-शांत आणि सरळ वॉकर सारखाच, पण आतून पार वाकलेला !
आंगणातल्या वाळूवर घट्ट पाय रोऊन मी उभा, अविचल स्तब्ध, मनात उठणा-या असंख्य लाटांना थोपवीत……
पप्पा ! पप्पा !,
आणली का नवी स्कुलबॅग !
“खिशात पगाराच्या ऐवजी मिळालेली शेवटची नोटिस,
….सेवेतून कायमचे कमी करण्यात….
या सुटीत जायच ना पप्पा फिरायला,
किनई समुद्र बघायचाय मला,वाळुमद्ये किल्ले बनवायचेत !
टिचर सांगतात समुद्राचं…..
आई नाही म्हणते,पण जायच ना पप्पा आपण!
म्हणुन त्याने
पायाला मारलेली गच्च मीठी !
थरथरत्या हाताने मी त्याला उचलले!
कोनी सांगावं त्याला,
कि माझ्या पायाखालची वाळूच सरकतेय म्हणून !!!
@ अरुण नंदन (20.08.07)