आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, April 09, 2008

लोटपोट ...

नयना नटवे नर्स झाली...

तेव्हा तोही पोशाख तिनं अगदी तंग, आकर्षक निवडला होता. रेग्युलर चेकअपसाठी आलेल्या विन्या प्रधानला डॉक्टरांनी तिच्याकडे सोपवलं...

ती खुर्चीत बसलेल्या विन्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याच्या डोक्यावर हात ढेवून म्हणाली आता अठ्ठ्याऐंशी म्हणा... विन्या तिच्या सुगंधान धुंदावला आणि त्याच अवस्थेत म्हणाला अठ्ठ्याऐंशी.
आता हात त्याच्या पाठीवर ठेवून ती म्हणाली, आता अठ्ठ्याऐंशी म्हणा....

अठ्ठ्याऐंशी,

तीच्या जवळकीनं नादावलेला विन्या म्हणाला.
आता नयनान त्याच्या छातीवर हात ठेवला आणि ती म्हणाली, आता अठ्ठ्याऐँशी म्हणा.
विन्या कसाबासा अठ्ठ्याऐंशी म्हणू शकला..

आता त्याच्या पोटावर हात ठेवून नयना म्हणाली, आता अठ्ठ्याऐंशी म्हणा.
विन्यानं यावेळी अठ्ठ्याऐंशी म्हणायला बराच वेळ घेतला.

मग त्याच्या शेजारी बसून आपला मऊसूत हात त्याच्या हाती देऊन नयना डोळे मिचकावत लाजत, म्हणाली, आता अठ्ठ्याऐंशी म्हणा...

विन्या म्हणाला,

एक............. दोन.................. तीन.............

>>

बंडू बावळेनं विन्याकडे पाहिलं आणि तो पाहातच राहिला... विन्याच्या कानात इयरिंग... विन्याच्या कानात? विन्या तसा फॅशनबाज, केसबिस रंगवणा - यातला... पण कानात रिंगा घालण्याइतपत त्याची मजल जाणं शक्यच नव्हतं.

बंडू विन्यापाशी जाऊन म्हणाला, ''विन्या, लेका तू इतका मॉडर्न झाला असशील, याची मला कल्पना नव्हती. काही म्हण, दिसतंय झकास तुझ्या कानात.''

विन्या कसनुशा चेह-यानं पुटपुटला, ''जाऊ दे ना यार! एवढ्याशा इयरिंगने काय फरक पडतो?''

'' पण एकदम इयरिंग? डायरेक्ट इयरिंग?''

विन्याचा चेहरा उत्तरोत्तर पडत चालला होता... ''अरे यार, त्यात काय एवढं? घालावंसं वाटलं, घातलं...''

बंडूने अगदी उत्सुकतेनं विचारलं, ''अच्छा! मिस्टर विनय प्रधान, मग मला एक सांगा... आपण इयरिंग घालावं, असं तुम्हाला नेमकं केव्हापासून वाटू लागलं?''

'' अं... अं...'' चाचरत, अनिच्छेने भरलेल्या सुरात विन्या उत्तरला, ''माझ्या बायकोला ते माझ्या ऑफिसच्या बॅगेत सापडलं, तेव्हापासून!!!!''


हश्या ...

फुटबॉलच्या गोल पोस्टाजवळ उभे राहून खडूस सरांनी विद्यार्थ्यांना विचारलं, ''या गोलपोस्टपेक्षा उंच उडी मारू शकेल, असा कुणी खेळाडू आहे का तुमच्या टीममध्ये.''
नन्याने लगेच हात वर केला. ''अरे इतकासा टिंपुर्डा तू आणि तू गोलपोस्टपेक्षा उंच उडी मारणार? दाखव उडी मारून,'' खडूस सर छद्मी हसून म्हणाले.
नन्याने एक साधी उडी मारली.
'' हा हा हा हा!'' खो खो हसत खडूस सर म्हणाले, ''ही उडी गोलपोस्टपेक्षा उंच काय रे चिचुंद्या?''
'' हो,'' साळसूदपणे नन्या म्हणाला, ''आता गोलपोस्टला सांगा ना उडी मारायला। तो किती उंच मारतो, ते बघू या!!!!!''

>>

'' डॉक्टर, मी चुकून चावी गिळली आहे माझ्या घराच्या कुलुपाची,'' बंता सांगू लागला, ''काढून द्याल ना ती प्लीज.''

'' कधी घडला हा प्रकार?''

'' साधारण तीनेक महिने झाले असतील.''

'' तीन महिने!'' डॉक्टर उडालेच, ''अहो, मग इतके दिवस काय करत होतात?''

' डुप्लिकेट चावी वापरत होतो. आज तीही हरवली!!!!''


>>

विन्या प्रधान भल्या पहाटे उठला. बायकोची झोप मोडणार नाही, अशा बेताने त्याने जॉगिंगचे कपडे-बूट चढवले आणि पार्काकडे निघाला... खरंतर आज हवा फारच खराब होती. रात्रभर पाऊस पडून गेल्यामुळे सगळा चिखलराडा झाला होता. हाडं गारठवणारा गार वारा सुटला होता. पावसाची पिरपिर होतीच. तरीही विन्याला जॉगिंगला जायचंच होतं. कारणही तसंच होतं म्हणा! ऑफिसातली फाकडू सेक्रेटरी रिटा त्याच वेळी जॉगिंगला यायची ना!

बाहेर पडून पुरता भिजल्यावर विन्याला मोबाइलवर रिटाचा फोन आला, ''डार्लिंग! आय वोन्ट बी कमिंग टुडे!'' बेत ओम फस्स झालेला विन्या कुडकुडत घरात शिरला. त्याने पुन्हा कपडे बदलले. दात वाजत असताना तो पुन्हा बिछान्यात शिरला. त्याच्या चाहुलीने बायकोची हालचाल झाल्यामुळे तिच्या अंगावर हात टाकून तो सदीर्ने घोगरट झालेल्या आवाजात कुजबुजला, ''बाहेर हवा फारच वाईट आहे...''

त्याचा हात खेचून घेत बायको कुजबुजली, ''आणि अशा हवेत आमचं बावळट ध्यान जॉगिंग करायला गेलंय पार्कात!!!!''

Tuesday, April 08, 2008

त्रास कुणालाच नाही

इथे मुंबईमध्ये जीवाला आराम कसला तो मूळीच नाही.
ट्रेनच्या रिकाम्या डब्यातून ( स्वप्नातल्या ) संध्याकाळी घरी परतल्यावर थोडा आराम करायचा म्हटला तर शप्पथ. थंड झालेला पचपचित चहा घोटभरच पिहून बिछान्यावर थोडा आडवा होताच कळते की लाईट गेली आहे. 'थंडी हवा का झोका' नावाने प्रसिद्ध कुठलाही पंखा शेवटी लाईट नसेल तर तो तरी बिचारा काय करणार. मुंबईमध्ये विज पुरविणार्‍या बेस्टची पण कमाल आहे. बाकी सर्व कामे आरामात चालतात पण माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने जरा दोन तीन महिने लाईटचे बील नाही तर मेले लगेच विज बंद करतात. अरे मी काय कुठे पळून जाणार होतो, दिले असते महिन्याभराने. इथे घराचे भाडे मी सहा महिन्यानंतर देऊनही घराचे मालक मलच हात जोडतात। आता दोन तीन लाईट बील न भरल्याने यांना काही लाखोंचे नुकसान होणार नव्हते. पण यांना बघवेल तर ना ! लगेच विज कापून टाकली. आता विजच नाही तर टिव्हि तरी कसा बघायचा.
टिव्हि वरुन आठवले. टिव्हिचे सहा महिन्याचे हाप्ते उशिरा दिले तरी त्याचा काही त्रास नाही. इतकेच काय केबलची लाईनपण शेजार्‍यांकडे आलेल्या लाईन वरुन ( चोरुन ) तरी त्या केबल वाल्याचा काही त्रास नाही आणि हे मेले एखाद्या प्रतिष्ठित माणसाला त्रास द्यायला सदैव तत्पर पाण्याची लाईन घरात घेण्यासाठी वर्ष लागणार होते. म्हणून म्युनिसिपालटीच्या पाण्याच्या पाईपमधून गूपचूप एक लाईन माझ्या घरात घेतली.
आता २४ तास पाणी असते. शेजारीपण आमच्याकडेच पाणी भरतात. आता समाजकार्य मी नाही तर आणखी कोण करणार ? आमच्या शेजाऱ्यांचेच उदाहरण सांगतो, पाण्याच्याचे बील भरुनही कधी कधी पाणी येत नाही. पण आमच्याकडे मात्र पाण्याची गंगा म्युनिसिपलटीच्या कृपेने सदैव वाहत असते, ते देखिल एक रुपया न भरता आणि तरीही त्यांना काही प्रॉब्लेम नाही.

स्त्रोत: http://sahajach.com/falatugiri/traas.html
हक्क: सहजच.कॉम

कधी कधी शुल्लक गोष्टिसुद्धा किती मोठ्या वाटू लागतात ना...
जशी कवी कुसुमाग्रज यांच्या या कवितेमधे सांगितलेली हि गोष्ट…

मध्यमवर्गापुढे समस्या
हजार असती
परंतु त्यातिल एक भयानक
फार उग्र ती
पिडीत सारे या प्रश्नाने
धसका जीवा
.
.
चहा कपाने प्यावा अथवा
बशीत घ्यावा !
- कुसुमाग्रज

स्त्रोत: ई-पत्र

घाबरू नकोस
दारावरची अवेळी टकटक ऐकून
बघ दार उघडून...

अनाहूत अंगणात येऊन नाचणारा
मोर असेल कदाचित...किंवा
शेकडो वर्षांपूर्वी उगवता उगवता
जमिनीत गाडल्या गेलेल्या इच्छांमधून
उमललेल्या अनाम फुलांचा गंध असेल..!

किंवा असेल थकून परतलेला पक्षी
आकाश जाणण्याची इच्छा
व्यर्थ वाटायला लागली असेल त्याला
तुझ्या आस-याला आला असेल..!

किंवा असेल सकाळचं कोवळं ऊन
समुद्राच्या लाटांवर नाचून
काही निरोप द्यायला आलं असेल
दुपारच्या उन्हाची दाहक नजर चुकवून
रात्र व्हायच्या आत तुला भेटावं म्हणून आलं असेल..!

गोंधळू नकोस...
परकं कोणी नसेल तिथे...
शाश्वत सुख मिळवण्याच्या भ्रमात
लाख नाकारशील तू
अंतरंगी निनादणारी बासरीची धून
प्रतिध्वनी होऊन, परतत राहील ती पुन्हा पुन्हा
बंद दरवाजावर टकटक करत राहील
तू दार उघडेपर्यंत..!

कवयित्री - आसावरी काकडे
स्त्रोत: ई-पत्र

Monday, April 07, 2008

आनंदक्षण ब्लॉगचा उद्देश

सद्या काही वाचनिय ब्लॉगवर साहित्य चोरी आणि उचलेगिरी यावर चर्चा, वाद-विवाद चालू आहेत आणि या चर्चेत आनंदक्षण ब्लॉगचे नाव घेण्यात येत आहे. याबाबत काही माझ्याकडून...

तसे पाहता ब्लॉगचे नाव यात येणे सहाजिकच आहे, कारण हा ब्लोग म्हणजे एक ई-जालामधील संग्रह आहे.
जेव्हा हा ब्लॉग बनवण्यात आला तेव्हापासुन माझा एकच उद्देश होता, मला आवडलेल्या आणि ई-जालामध्ये ईतरत्र पसरलेल्या मराठी साहित्याचा ( स्त्रोत: मराठी ब्लॉग, संकेतस्थळे); मला ई-पत्राने मिळालेल्या मराठी कविता, लघु कथा, विनोद आणि ईतर मराठी साहित्याचा एक छोटासा संग्रह करणे (उद्देश १).

दुसरे म्हणजे मराठी वाचकवर्गाला ई-जालावर ईतरत्र पसरलेलं मराठी साहित्य एकाच ठिकाणी वाचावयास मिळेल (उद्देश ); त्यावेळेस मराठीब्लॉग.नेट नव्हते किंवा माझ्या माहितीत नव्हते .

ब्लॉगची वैशिष्टे:
ब्लॉगवर जो कुणिहि येईल, काहि वेळापुरते का होईना त्याचे मनोरंजन होईल हेच पाहण्यात आले आहे.
ब्लॉगवर जितके शक्य होईल तितके मराठी भाषेचाच वापर करण्यात आला आहे.
वाचनात आलेली आणि ईतरांना सुध्धा हवी असलेली मराठी संकेतस्थळे, छायाचित्रे, गाणी यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या सगळ्यासाठीच:
मला जसे काही वाचनीय मराठी साहित्य मिळेल तसं मी ते ब्लॉगवर पोस्ट करत गेलो अर्थातच कॉपी-पेस्ट करूनच, पण हे करताना मी त्या लेखकाचे/कविचे नाव (माहित असेल तर) आणि त्याचा स्त्रोत तिथे देतच आलो आहे (काहींच्या भाषेत उचलेगीरी). तसेच ब्लॉगवर लिहिल्याप्रमाणे मी या साहित्याचा कोणताही व्यवहारीक वापर करत नाहि आणि तसे दुस~यानेही करु नये म्हणुन येथिल पोस्ट copy-protected करण्यात आल्या आहेत. या ब्लोगचे feed हि अर्धे करण्यात आले आहे.

माझ्या एका ई-मैत्रिणिच्या आग्रहाखातीर बनवलेला हा ब्लोग मराठी वाचकवर्गालाही आवडला पण काही कारणास्तव तो सध्या वादाच्या भोव~यात पडला आहे.

ही पोस्ट लिहिण्यामागे माझा हेतु हाच की या ब्लोगचा उद्देश सगळ्यांना कळावा आणि जर अझुनही काही शंका असल्यास मला कळवावे, आपल्या प्रतिसादाप्रमाणे योग्य तो निर्णय घेण्यात येईल.

आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत..
च.भू.द्या.घ्या.

-- तुमचा आनंद