आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Thursday, April 03, 2008

पत्र


सध्याचा जमाना खरचं किती बदलला आहे ना...
पूर्वी लोक स्वतःच्या हाताने पत्र लिहून सर्व काही शेअर करायचे..
आणि आता ई-मेल आले...एसेमेस आले...
पण खरं तर हाताने लिहिलेल्या पत्रातून प्रत्यक्षात भेटल्याचा आनंद कसा मिळतो,
ते वाचा इंदिरा संत यांच्या या कवितेतून...


पत्र लिही पण नको पाठवू
शाईमधूनी काजळ गहिरे
लिपीरेषांच्या जाळीमधूनी
नको पाठवू हसू लाजरे

चढण लाडकी भुवई मधली
नको पाठवू वेलांटीतून
नको पाठवू तीळ गालीचा
पूर्णविरामांच्या बिंदूतून

नको पाठवू अक्षरांतूनी
शब्दामधले अधिरे स्पंदन
कागदातूनी नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण

नको पाठवू वीज सुवासिक
उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा
सांगितले मी;तू हट्टी पण..

पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमधेच मिळते
पत्रच पुढचे त्यानंतर पण
वाचायचे जाते राहून...

कवयित्री - इंदिरा संत


स्त्रोत : -पत्र

Wednesday, April 02, 2008

निर्सग- ग दि मा यांच्या नजरेतुन

एकापाठोपाठ दिवस येतात, जातात, तसेच मोसम येतात मोसम जातात...
तसाच एक पावसाळा...पण या पावसाळा कधी कसा येतो...एका वेगळ्या नजरेतून...
निर्सग सुद्धा एका कुटुंबासारखा आहे...आणि त्यातही नाती-गोती आहेतच
असा विचार करुन कवी ग.दि. माडगुळकरांनी एक सुंदर कल्पना मांडली आहे...

नदी सागरा मिळता,पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्याची म्हण,नाही नदीला माहेर

काय सांगू बाप्पारे,तुम्ही आंधळ्याचे चेले
नदी माहेराला जाते,म्हणूनच जग चाले

सारे जीवन नदीचे,घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो,जन्म दिलेला डोंगर

डोंगराच्या मायेसाठी,रूप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते,पंख वा~याचे लेवून

पुन्हा होऊन लेकरु,नदी वाजवते वाळा
पान्हा फुटतो डोंगरा,तेव्हा येतो पावसाळा...!

कवी -गदिमा
स्त्रोत : ई-पत्र

सुविचार

~:~ सुविचार ~:~

* भिती दार ठोठावेल, तेंव्हा धाडसाला ते उघडायला पाठवा. त्या दारातुन यश आत येईल.

* धंद्यात यशस्वी व्हायचे असेल,तर गि~हाइकाचे नाव लक्षात ठेवायला शिका. नावाने ओळखले जाणे सर्वाना आवडते.

* तुमच्याकडे जे आहे,त्यावर संपत्तीचे मोजमाप करु नका.
ज्याबदली तुम्ही पैसा घेणार नाही,अशा गोष्टिंमध्ये तिचे मोजमाप करा.

* कोणाही माणसाकडे असणारी सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे त्याचा प्रामाणिकपण.

* जगातील सर्वात प्रभावी संवाद म्हणजे प्रार्थना.

* समजत नाही, तो पर्यन्त कोणाची निंदा करु नये आणि समजल्यावर तर बिलकूल करु नये.
निंदा करण्याने फ़क्त पापाचे दनी होता येते.म्हणुन कुणी निंदा केली की साधकानी आनंदि व्हावे. निंदा करणा~याचे पुण्य दुस~याला मिळते आणि निन्दा करणा~याच्या पापात तेवढी वाढ होते. स्वस्थ राहावे,जग पहावे,हेच खरे !

Tuesday, April 01, 2008

आलीस तू सामोरी अन् काही शोधयाचे राहून गेले
तुझयात गुंतताना जग आठवायचे राहून गेले !!

जाणलेस नजरेतुनी तू गे हृदय हे माझे
ठरवलेले बरेचकाही मग बोलायचे राहून गेले !!

तुझ्या ओलाव्याने गहीवरला वैशाख माझा
गेलो हम्सुन की हळवे रडायचे राहून गेले !!

सोबतीने तुझ्या भासले चांदणे भर उन्हातही
स्वप्न त्या दवाचे धुक्यात पहायचे राहून गेले !!

तू झालीस सावली अगदी कोरडया रात्रीही
तुझ्या बेरकी वीरहात झुरयाचे राहून गेले !!

छेडलेस तू असे तरंग आले सूरत जगणे
उगाच तेच ते बेसुरे गीत गायचे राहून गेले !!

कळले तुला सारे मर्मबंध हे भावनांचे
तू दीलेस सढळ जरी काही मागायचे राहून गेले !!

सहज उधळलेस तू रंग या बेरंगी जगण्यात
रंग मग ते इंद्रधनुचे मोजयाचे राहून गेले !!

कवी: प्रशांत शिरगावकर

वीज


पावसाळ्यात गरजणारे ढग आणि कडकडणारी वीज हे दृश्य
आपल्या चांगल्या परिचयाचे आहे.. पण तुम्हाला माहित आहे का नक्की हे सगळे कसे होते...

नाही तर हे पाहा वाचून...

कोण म्हणतं आभाळात मेघ गडगडले?
ते तर तुफानाचे काळीज धडधडले !

कोणी आळवली पावसाची चीज
ओलिचंब भिजून झाली वीज !

तुफानाचा तोल मग गेला सुटून
वीजेला घेतले बाहूत वेढून !

लाजली गरजली कडकडली वीज
निसटून अलगद तडतडली वीज..!

कवी -अपरिचित
स्त्रोत: ई-पत्र

मन


जगात सर्वात चंचल,वेगवान काय असं कोणी विचारलं तर उत्तर येईल...
माणसाचं मन...
आपलं मन खरचं किती विचित्र असतं ना...
आता इथे तर,क्षणात कुठे जाउन पोचलेलं असतं..
त्याला ना कशाचे बंध,ना कशाचे पाश... एखाद्या पाखरापेक्षाही जास्त स्वच्छंदी...
खरं तर ते असं असतं....

मन म्हणजे मन म्हणजे मन असतं
तुमचं आमचं कधीच सेम नसतं..!

मन कधी चंचल असतं,
कधी अस्थिर असतं
पण दुसराच्या मनात काय असतं
हे कधीच कळत नसतं..

काहि जिंकायला कमी पडले तर,
जिंकण्याचं साधनही मनच असतं
आणि काहि मिळवायचे राहिलेच
तर सांत्वनालाही मनच असतं..

मन मोठ्ठं असतं,मन अरुंदही असतं
मोठया मनात बरचं काही मावतं
अरुंद मनात मन असं कधीच नसतं
तिथे फक्त अरुंद वाटेवरून चालायच असतं

काहि गोष्टी ज्यावर बिंबतात तेही मनच असतं
तर बरेच गोष्टी सोडून देणारही मनच असतं

संस्कार ज्यावर होतात तेही मनच असतं
पर्यायाने माणसाला घडविण्याचं साधनही मनच असतं

दिलखुलास हसविणारही मनच असतं
तर डोळ्यातून अश्रू आणणारही मनच असतं

बरेच गोष्टी मनात असतात
पण सर्वच बोलायचं नसतं
बोलता येत नसतं,पण म्हणून
मनातल्या मनात कधीच रडायचं नसतं

मन व डोकं यात बरचं अंतर असतं
मनाच्या निर्णयात डोकं लावलं
की ते वेगळचं वळण घेतं

म्हणून मनातल्या गोष्टीत
डोकं जरा जपूनच वापरायचं असतं
मात्र मन अयोग्य वाटेवर नेण्यास भाग पाडू शकतं
या बाबतीत मात्र डोकं चांगलचं वापरायचं असतं

असं हे मन म्हणजे मन असतं
तुमच आमचं कधीच सेम नसतं

परंतु दोघांच मन जेव्हा जुळतं
तेव्हा मात्र ते प्रेम असतं
आणि या बाबतीत मात्र
ते तुमचं आणि आमचं अगदिच सेम असतं...

कवी -अनामिक
स्त्रोत : ई-पत्र

बाकी आहे - by अभिजीत दाते

सरला प्याला झिंग जराशी बाकी आहे
अजून थोडे दुःख उराशी बाकी आहे

दिसतो जो मी केवळ वरचा तरंग आहे
माझे ‘मी’पण खोल तळाशी बाकी आहे

तुम्ही हव्या तर सुखे आठवा श्रावनधारा
हिशेब माझा जुना उन्हाशी बाकी आहे

नैवेद्याचा परवा होता गाजावाजा
काल ऐकले देव उपाशी बाकी आहे

हवी नको ती सुखे तुझ्यास्तव मागून झाली
अता मागणे काय नभाशी बाकी आहे ?

नको भास्करा किरणांसाठी तुझी मुजोरी
दीप येथला स्वयंप्रकाशी बाकी आहे

– अभिजीत दाते
http://dilkhulas.wordpress.com

म्हणे आनंदातही डोळ्यांतून कोसळतो वसंत


हलवायचं कोणाला, सारेच निवांत
मी वाचतो प्रेतांचे, अंतकरण जिवंत

स्मशानात राहतो मी, मृतात वाहतो मी
अवषेशांचे ढिगारे, नि गळका आसमंत

आठवायचे ठरवतो, मी विश्वास फिरणारे
सडतात रात्रीला, स्वप्नांचे दिवस का अनंत

कोणास याद येते, लुकलुकत्या तारकांची
तुटताच नजर वळते, साऱ्यांची आसमंत

मी थांबलो कुठे, धावतोय जन्मा पासून हा
मृत्यूच्या कुशीतही, हालचालींना येई ना अंत

रडावू मला पाहतात, आनंदाचे हळवे क्षण
म्हणे आनंदातही डोळ्यांतून कोसळतो वसंत

@ सनिल पांगे

Monday, March 31, 2008

काय हो तुम्हाला सुख हवं का सुख...?

नमस्कार मित्रहो…
काय हो तुम्हाला सुख हवं का सुख...?
आता तुम्ही सगळे मला मूर्ख म्हणाल की
काय विचारतेय ही? सुख कधी कोणाला नको असतं का?...
बरोबर आहे तुमचं…पण तुम्हाला हे सुख मिळवायचा सोप्पा मार्ग माहित आहे का?
नसेल तर मी सांगते…
पण या एका छोट्याश्या गोष्टीमधून…
वाचा तर हा सुखाचा
महामंत्र…

एका वटव्रृक्षाखाली,बसुनिया दोन श्वान
एकमेकांना सांगती,अनुभव आणि ज्ञान
एक वये वाढलेले,एक पिलू चिमुकले
वृद्ध बालकात होते, काहि भाषण चालले.

"कोणाठायी सापडले तुला जीवनात सुख?"
वृद्ध बालका विचारी,त्याचे चाटुनिया मुख

"मला वाटते आजोबा,सुख माझ्या शेपटात
सदाचाच झटतो मी,त्यास धराया मुखात
माझ्या जवळी असून,नाही मज गवसत
उगाचच राहतो मी,माझ्या भोवती फिरत"

अजाण त्या बालकाची,सौख्य कल्पना ऐकून
क्षणभरी वॄद्ध श्वान,बसे लोचन मिटुन..

"कोणाठायी आढळले,तुम्हा जीवनात सुख?
तुम्ही वयाने वडिल,श्वान संघाचे नायक!"

बाल श्वानाच्या प्रश्नाला देई जाणता उत्तर-
"तुझे बोलणे बालका,बिनचूक बरोबर
परि शहाण्या श्वानाने,लागू नये सुखापाठी
आत्मप्रदक्षिणा येते,त्याचे कपाळी शेवटी.
घास तुकडा शोधावा,वास घेते जागोजाग
पुढे पुढे चालताना पुच्छ येते मागोमाग...!"

कवयत्री : सखी
स्त्रोत: ई-पत्र