ऊशीरा येण्याचे तुजकडे
एकनेक बहाणे असतात
मजकडे मात्र प्रतीक्षेचे
युगन्युग मागल्या क्षणांचे असतात.
लावते पिसे मनाला
ही रम्य मदभरी सांजवेळ
अन बोटांनी बोटांशी केलेला
तो स्पर्शाचा नाजुक खेळ.
प्रयत्नांची शर्थ करावी किती
भाती नजरबाणांची झाली रिती
तिचे कौशल्य नेहेमी जिंकायला पुरेसे
तिथे हरायची सतत मलाच भीती.
थोडं प्रेम करू म्हणतो
तर तुझं नको नको म्हणणं असतं
फुलांवर बागडणाऱ्या भुंग्याचं त्यावर
वाकुल्या करीत हसणं असतं.
ओल्या वाळूवर चालताना एक
लाट तुझ्या पायांशी पोचलेली
तिनं पावलं पुसण्याधी तुझी
मी हळूच ती वाळू चोरलेली.
तुझ्या लावण्याशी स्पर्धा करू म्हणून
चंद्रचांदण्या व वाळू एक झाले
अगणित चांदण्या अन निखर्व वाळूकण
यांना तरी सपशेल अपयश आले.
पूर्वी सूर्य उदास वाटायचा
अथांग सागरात बुडताना
तुझ्या सोबती आज जीव जडतो
त्या संध्येचे वर्ण मोजताना।
No comments:
Post a Comment