आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, September 18, 2007

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठवर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन।।।

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना।।।

-- संदीप खरे

Monday, September 17, 2007

त्या गलबतास किनार्‍याची ओढ वाटली होती
किनार्‍याच्याही डोळ्यांत दोन आसवं दाटली होती

शीड फ़डफ़डले गलबताचे.... वारा भरला त्यात
सोडुन किनार्‍यास गलबत निघाले अथांग सागरात

अनंत मैलाच्या प्रवासास गलबताने सुरुवात केली
वाटेत शिदोरी म्हणुन किनार्‍याची आठवण साथ नेली

किनारा रडला खुप खुप.. आसवं त्याची ढळाली
सागरालाही त्या आसवांनी किंचीतसी भरती आली

गलबताचा प्रवास सुरु झाला मैल दर मैल
वाटतं होता प्रवास हा सहज संपुन जाईल

किनार्‍याची ओढ गलबताला छळु लागली
अन आठवण त्याची दिवसेंदिवस जाळु लागली

मला मिळालेला किनारा मी का सोडला?
'अजुन मला काय हवं होत?' असा प्रश्न त्याला पडला

पण आता खुप उशीर होत होता परतायला
अन वेळही लागला होता हातातुन रेतीसारखा सरकायला

दिवसामागुन दिवस सरत चालले होते
दोघंही एकमेकांपासुन झुरत दूर चालले होते

प्रचंड त्या लाटांत श्वास गलबताचे अडखळू लागले
किनार्‍याच्या भेटीस प्राण त्याचे तळमळू लागले

घोर काळरात्री खुप दाटुन गेल्या
जखमा काळजावर दोघांच्याही वठवुन गेल्या

खुप दिवस झाले....प्रवासास निघालेले गलबत परत नाही आले
कुणीतरी बोललं काल..त्या किनार्‍याचे कण कण वाहून गेले

कदाचित एखादं प्रचंड वादळ गलबतास घेऊन गेलं असेल
कदाचित एखाद्या महाकाय लाटेनं त्या किनार्‍यास वाहुन नेलं असेल.....कदाचित ....

-- संदीप सुराले
तुझ्या खट्याळ डोळ्यात
स्वप्ने श्रावणी श्रावणी
भुलवीत दूर नेती
रानफ़ुलांची रे गाणी

तुझ्या नेत्रकटाक्षाने
आत उमलते काही
बोल मधाळ बोलसी
कसे सावरावे बाई

तुझे मोकळेसे हसु
उरी चालवते सुरी
गंधभारल्या स्पर्शाने
तनू होई रे बावरी

-- मनीषा जोशी.