संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली
अंबराला नवी किनार देऊन सांज आली
घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली
निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली
गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली
अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली
संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली
उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली
पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली
वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली
तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली
गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली..
- प्राजु
स्त्रोत : http://www.misalpav.com/node/709
No comments:
Post a Comment