चूक
एक सुंदरी सलूनमधल्या खुर्चीवरती भल्या दुपारी
येउन बसली अगदी अलगद, सोडून केस तिचे सोनेरी
मिटून चष्मा काळा बसली पायावरती पाय चढवुनी
वेध घेतला भोवतालचा एक दोनदा मान वळवुनी
नजर झुकवुनी पदर सारखा करून झाला मग हाताने
जणू पंखाची पिसे सारखी करावी कोण्या पक्षाने
केस कापले अनेकदा पण समाधान काही लाभेना
आरशामध्ये बघून झाले पण जीवाला चैन पडेना
म्हणतील सख्या किती कापले केस अता मी कैसे जावे -
काय करावे आता याचे बाईंना कैसे उमजावे?
तोच चलाखी करून न्हावी चूक लपवी लावे गंगावन
रूप नवे पाहून स्वतःचे अन सुंदरी झाली पावन
अधीरतेने हर्षभराने स्पर्धेला अवतरली यक्षिणी
आणि तिच्या केसात अचानक चुकून घुसली एक पक्षिणी
महिला मंडळा मधली जेव्हा संपली स्पर्धा नटण्याची
चिमणीची चिंता कायमची होती मिटलेली घरट्याची
-केशवसुमार
No comments:
Post a Comment