भूक
एक कावळी भल्या दुपारी सळसळणाऱ्या झापेवरती
येउन बसली अगदी अलगद, सोडून सोनसळी भटकंती
पंख घेतले मिटून आणि स्थिरावली ती पाय जुळवुनी
वेध घेतला भोवतालचा एक दोनदा मान वळवुनी
पंखांवरची पिसे सारखी करूनही झाली चोचीने
जणू पदर सांभाळून घ्यावा चटकन कोण्या नवयुवतीने
चोच घासली अनेकदा पण समाधान काही लाभेना
झावळ्यांवरी धुसफूस केली तरी जीवाला चैन पडेना
असतील पिल्ले किती भुकेली दोन घास घेऊनच जावे -
याच्याविपरीत दुसरे काही आईला कैसे उमजावे?
तोच खुणावत सोबत आला धूप-फुलांचा सुवास जोवर
दिसे तिला खालीच ठेवले पान कुणीसे मांडुन तोवर
अधीरतेने हर्षभराने खाली झेपावली तत्क्षणी
पिल्लांसाठी दोन घास घेऊन दूर पातली पक्षीणी
घाटावरती संपत आली स्पर्धा आताशा रडण्याची
लोकांना किंचितशी चिंता होती पिंडाला शिवण्याची
-नीलहंस
No comments:
Post a Comment