आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Friday, June 29, 2007

सुट्टीचा दिवस, सकाळची वेळ, एकंदरीत सगळं काही "निवांत" असतं. मी उशीरा उठुन चहा पिऊन बाहेरच्या खोलीत येतो. तिथे माझा भाऊपेपर वाचत बसलेला असतो. मी थोडा वेळ टंगळमंगळ करतो, शेवटी न राहवुन बोलतो
मी- काय वाचतो आहेस एवढा वेळ?
तो- तुला काय करायचं आहे? (पुण्याला येउन १० वर्ष झाली आहेत तशी त्याला, प्रश्नाचं उत्तर प्रश्नानेच
द्यायला शिकला आहे तो)
मी- मला पेपर वाचायचा आहे. ("काही" लोकांचा विश्वास असो अथवा नसो, मी रोज पेपर वाचतो हे
त्रिकालाबाधित सत्य आहे)
तो- (माझ्या या वाक्यावर तो नुसतंच विकट का काय ते म्हणतात तसं हसतो)
मी- दात काढायला काय झालं रे !! घशात घालू का सगळे?
तो- सकाळी सकाळी कोणी दुसरं मिळालं नाही का रे कावळ्या, म्हणे पेपर वाचायचा आहे, तुझ्या चोचीला
सेलाटेप लावतो, म्हणजे तुझी बडबड बंद होइल.
(स्वयंपाकघरातुन ओट्यावर भांडी आपटल्याचा आवाज येतो. पण मी त्याकडे दुर्लक्ष करतो. "कावळा" हा शब्द उच्चारला गेला असतो. शिंग फुंकलं गेलं असतं. आता रणभूमीतुन माघार घेणं माझ्या "मानी" स्वभावाला "मानवत" नाही.)
मी- कावळा कोणाला म्हणतो रे घुबडा? तुझी मान पिळुन दोर्याने बांधुन ठेवीन.
तो- ए वटवाघळा, पंख्याला उलटा टांगु का तुला.
(पक्षीसृष्टी अपुरी पडायला लागल्यामुळे मी जलचरांकडे धाव घेतो)
मी- अरे जा रे, पाणगेंडा कुठला, तुझ्या त्या मोठ्या नाकपुड्यांना भोंगे लावुन ठेवीन, म्हणजे तू घोरायला
लागलास ना की ते वाजतील.
(पाणगेंडा हा जलचर नसतो एवढा विज्ञानाचा भाग वगळला तर पाणगेंड्याच्या नाकपुड्यांना भोंगे लावण्याची माझी कल्पना तुम्हाला कशी वाटली? माझ्या भावाला ही कल्पना ऐकुन उत्स्फुर्तपणे आलेलं हसु दाबण्यासाठी त्याचा चालू असलेला प्रयत्न आणि माझ्या या जोरदार वाराला प्रत्युत्तर देण्यासाठी त्याची उडालेली धांदल माझ्या चाणाक्ष नजरेतुन सुटत नाही. तो पेपर खाली ठेवतो. त्याचं पक्षीसृष्टीचं ज्ञानही माझ्याइतकंच दिव्य असल्याने तो पण उभयचरांवर उतरतो.)
तो- ए बेडका, जास्त छाती फुगवू नको, तुझे बाहेर आलेले डोळे एकमेकांकडे वळवुन तुला zoo मधे ठेवीन,
मग चकणा बेडुक कसा दिसतो ते बघायला लोक येतील तिथे।
(माझ्या वाराला तोडीस तोड प्रत्युत्तराची अपेक्षा नसल्याने मी थोडा बावचळतो. स्वयंपाकघरातला आवाज थोडा वाढल्यासारखं वाटतं. भांड्यांच्या आवाजाबरोबरच काही मंत्रोच्चार पुटपुटल्यासारखा आवाजही येत असतो पण आमचं तिकडे लक्ष नसतं. आता भूचर विशेषणांचा वापर करण्याशिवाय पर्याय नाही हे कळतं, आणि जास्त वजन पडावं म्हणुम एकाच वंळी अनेक भूचर विशेषणांचा वापर करायला सुद्धा मी मागेपुढे बघत नाही. अशावेळी माझ्याकडचे प्राणी आधी "संपण्याची" शक्यता असते. पण तेवढी calculated risk मी घेतो.)

मी- तू हत्तीचं पोट आणि उंदराचं डोकं असलेला रानगवा आहेस. कोणीपण दिसलं की मारायला धावतोस.
चाबकाचे फटके लावले पाहिजेत तुला, त्याशिवाय ऐकणार नाहीस तू! (टाळ्या)
तो- तू उंटाची मान आणि शहामृगाचे पाय असलेलं लाल तोंडाचं माक़ड आहेस, तुला माणसांच्या जवळ
फिरकु द्यायला नको, उलटं टांगुन मिरच्यांची धुरी दिली पाहिजे.

(माझ्या भावाला सारखं मला उलटं टांगायची ईच्छा का होत होती काय माहीत। स्वयंपाकघरातुन येणार्या मंत्रोच्चार जोर वाढला असतो, भांड्यांचा आवाज असतोच. त्यातुन आमचा आवाजही नकळत वाढलेला असतो. त्यातुन निर्माण झालेला सामुहीक आवाज हा शेअरमार्केट मधल्या गोंगाटाला लाजवेल असा असतो. आता हातघाईची लढाई सुरू झाली असते, "ठेवणीतली" खास शस्त्र वापरायती वेळ आली असते, आता नस्त लांबण लावायचं नसतं, फक्त एकेक ईरसाल भूचर विशेषणाचा बाण भात्यातुन काढायचा आणि फेकायचा असतो.)

मी- बैल!
तो- घोडा!
मी- एकशिंगी गेंडा!
तो- गाढव!
मी- डुक्कर!!!!!!!!!!!!!!!!

हा शब्द उच्चालल्यावर जादुची कांडा फिरवल्यासारखी सगळीकडे एकदम शांतता पसरते, सगळे आवाज बंद झालेले असतात, खोलीच्या दारात आई उभी असते। तिच्या चेहर्याकडे पाहुन तिच्या मनात आमच्या बाबतित काय विध्वंसक विचार येताहेत ते स्वच्छ दिसत असतं. या डुकराने काय घोडं मारलं आहे कुणास ठाउक (हाहाहा!) पण आमच्यापैकी कोणीही हे संबोधन वापरलं की तिचा पारा चढतो. आईच्या चेहर्याकडे पाहुन तिच्या मनातले आपण वाचलेले विचार बरोबर आहेत का नाही याची परीक्षा घेण्याइतके आम्ही नतद्रष्ट नाही. क्षणाचाही विलंब न लावता भाऊ परत पेपरात डोकं घालुन "आजचं भविष्य" वाचायला लागतो. मी देखील पापणी लवायच्य़ा आत त्या खोलीतुन नाहीसा होतो. मगाजचे मंत्रोच्चार परत सुरू होतात. आता बाकी सगळं शांत असल्याने ते नीट ऐकू येत असतात. "एवढी वयं वाढली तरी अकला येत नाहीत, एकतर सारखं लोळत पडायचं TV समोर नाहीतर मुर्खासारखे वाद घालुन मला त्रास द्यायचा. घरात एक काडी इकडची तिकडे करायची नाही...." असं परिचयाचंच स्तोत्र कानावर पडतं. हा आख्खा अध्याय मला पाठ असल्याने पुढचं मी ऐकत नाही. "पुन्हा अशी वेळ आली तर?" या विचाराने मी नवीन प्राणीविशेषण शस्त्रांना धार लावायला सुरुवात करतो. माझा आणि माझ्या भावाचा (वि)संवाद नेहेमीप्रमाणेच सुरू झालेला असतो आणि नेहेमीप्रमाणेच संपतो.

-- अमोल पळशीकर

No comments: