नगर शहरात नवी पेठ विभागात नवीन मराठी शाळा या नावाची एक शाळा आहे. अलीकडच्या काळात बहुधा या शाळेचे नाव बदललेले आहे. साधारणतः सन १९५४ ची घटना आहे. याच शाळेत घडलेली.
इयत्ता पहिलीच्या वर्गावर नगर शहरातल्या ट्रेनिंग कॉलेजमधील एका विद्यार्थी-शिक्षकाचा एक पाठ चालू झाला होता. बहुधा इतिहासाचा किंवा परिपाठाचा तास असावा. त्याकाळी परिपाठाच्या विषयात पौराणिक कथांचा अंतर्भाव पहिल्या दुसऱ्या इयत्तेसाठी केला जात असावा. रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र, पत्नी सीता, बंधू लक्ष्मण व परमभक्त हनुमानासह प्रवेश करताहेत आणि मिरवणुकीने त्यांचे स्वागत अयोध्या नगरीतील जनता हर्षोत्फुल्ल वातावरणात करत आहे हा पाठाचा विषय होता.
पाठाचाच एक भाग म्हणून पूर्वज्ञानावर आधारित असा सर्व मुलांना उद्देशून एक प्रश्न शिक्षकांनी विचारला-
""तुमच्यापैकी मिरवणूक कोणी पाहिली आहे?''
क्षणभर वर्गात शांतता पसरली. मग काही जणांचे हात वर झाले. तेव्हा एका विद्यार्थ्यास शिक्षकाने विचारले, ""तू सांग बघू, तू कोणती मिरवणूक बघितलीस?'' तो मुलगा म्हणाला, ""मी लग्नाची मिरवणूक बघितली.''
शिक्षकाचा आनंद आणि उत्साह दुणावला. कारण त्यांना अपेक्षित असे उत्तर मिळाले होते. वस्तुतः त्या शिक्षकाने इथेच पाठाचा धागा पकडून मुलांना आपल्या मुख्य पाठ्य भागाकडे नेण्यास हरकत नव्हती. पण त्यांनी उत्साहाच्या भरात एक अनावश्यक प्रश्न त्या मुलाला विचारला-
""अरे वा! पण कुणाच्या लग्नाची मिरवणूक तू बघितलीस?''
त्या मुलाने उत्तर दिले, ""माझ्या वडिलांच्या लग्नाची.'' आणि वर्गात एकच हशा पिकला.
मुलाचा चेहरा निरागस होता. त्यात बनेलपणाची छटा नव्हती. ते एक प्रामाणिक उत्तर होते. पण त्या उत्तरामुळे उसळलेल्या हशात ते नवखे शिक्षक गोंधळून गेले. काय करावे त्यांनाही सुचेना. पाठ भरकटून चालणार नव्हते. पण त्या शिक्षकाने स्वतःला सावरले.
""बरं, बरं, बस खाली...' असं त्या मुलाला म्हणून शिक्षकांनी आपला पाठ सुरू केला आणि त्या मुलाकडे अधूनमधून विचित्र दृष्टिक्षेप टाकत, कपाळावरचा घाम पुसत त्यांनी आपला पाठ कसाबसा संपवला.
पाठ संपल्यावर पाठाचे निरीक्षण करणारे त्या शिक्षकांचे मेथड मास्तर त्यांना म्हणाले-
""सर, तुमचा पाठ चांगला झाला; पण सुरवातीला तुम्ही त्या मुलाला विचारलेला प्रश्न अनावश्यक होता. त्याच्या उत्तरामुळे तुम्ही गडबडलात.
तेव्हा ते शिक्षक म्हणाले, ""मान्य आहे सर, पण त्या मुलाने दिलेले उत्तर...''
त्यांचं बोलणं मध्येच तोडत ते मेथड मास्तर म्हणाले, ""अहो, त्याचं उत्तर शंभर टक्के सत्य होतं. मला तो मुलगा चांगला ठाऊक आहे,'' असं म्हणून ते मेथड मास्तर थबकले. बोलावं की बोलू नये असा क्षणभर विचार करून त्यांनी त्या पाठ शिक्षकाच्या पाठीवर हात ठेवला व त्यांना ते म्हणाले, ""गेल्याच वर्षी त्या मुलाची आई कालवश झाली. त्याला आणखी भावंडे आहेत. त्यांची आबाळ होऊ नये, त्यांचं संगोपन व्यवस्थित व्हावे म्हणून त्या मुलाच्या वडिलांनी दोनच महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला आहे. त्या विवाहाला हा मुलगा व त्याची इतर भावंडं साहजिकच हजर होती. त्याच्या उत्तरातून उसळलेल्या हशामागे त्याच्या वडिलांचं पत्नी वियोगाचं दुःख लपलेलं होतं. तुमचा पाठ चांगलाच झाला. फक्त बालमानसशास्त्र समजून घेत चला.''
तेव्हा ते पाठ शिक्षक म्हणाले, ""सॉरी सर, पण सहज विचारतो हं. त्या मुलाचे वडील कुठे नोकरी करतात?''
त्यावर ते मेथड मास्तर म्हणाले, ""बघा, पुन्हा तुम्ही अनावश्यक प्रश्न विचारलात. आता तुम्ही विचारतच आहात म्हणून सांगतो, माझाच मुलगा आहे तो.'' एवढे बोलून पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा टिपत ते दृष्टिआड झाले. सारेच जण स्तब्ध झाले. अचानकपणे तिथे काही क्षण एक भावुक वातावरण निर्माण झाले.
माझे वडील नगरच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र हे विषय शिकवायचे. सुमारे ५५ वर्षांपूर्वी मी दिलेले वरील उत्तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगायचे...
स्त्रोत: विरोप
1 comment:
हाच लेख "सकाळ" च्या १४ September च्या "मुक्तपीठ" ह्या पुरवणीत प्रकाशित झाला होता.
-- अजय
Post a Comment