मी फसलो म्हणूनी...
संदीप : या कवितेविषयी आधी थोडंसं सांगतो...की हातामधून हात सुटून जातो, पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -
मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी
ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते
आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले
ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली
-- संदीप खरे
1 comment:
Please change the font color it hard to read
Post a Comment