आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, August 29, 2007

क्लिक!

शनिवार संध्याकाळ्- ७ वाजत अलेले.. सुनिता लेकीची वाट पहात होती.. इतक्यातच श्वेता आली, चेहरा उतरलेला, वैतागलेला होता..सुनिताने दार उघडले आणि श्वेताला काही विचारायच्या आतच ती तरातरा आत आली आणि धपकन सोफ़्यावर बसली..
"काय गं, कसा वाटला?"
"आई, नाही गं! तसा ठीक होता, कॉफी प्यायली, गप्पा मारल्या, पण क्लिक नाही झालं गं काही.. असं कसं होतं गं आई.. म्हणजे तसं बोट दाखवू शकत नाही मी, पण नाहीच! प्लीज.. जाऊदे"
श्वेता थोडी मरगळून खोलीत गेली आणि सुनिता विचारात पडली..

श्वेता तिची सुविद्य, तरूण मुलगी.. engineer होऊन एका आघाडीच्या IT कंपनीत नोकरीला होती.. आता जगरहाटीनुसार तिच्या लग्नाचे पहायला नुकती सुरुवात
केली होती..तिला खरतर कॉलेज आणि नोकरीच्या ठिकाणी इतके मित्र होते की ही वेळ यावर येऊ नये अशी इच्छा सुनिताचीच होती. लेकीवर विश्वास होता, त्यामुळे तिने एखाद्या मित्रालाच जोडीदार म्हणून समोर उभा केला असता तरी त्यांनी positively विचार केला असता..पण.. श्वेताचे 'तसे' काही कोणाशी जुळल्यासारखे दिसले नाही.. त्यांनी तिला विचारलेही होते विवाह मंडळात नाव नोंदवण्यापूर्वी. पण तिने सांगीतले की 'आई तसे काही असते तर तुला सांगीतले नसते का मी'. असं म्हणल्यावर गप्पच बसले ते आणि एक्-दोन नावाजलेल्या वधू-वर सूचक मंडळात नाव घालून आले मुलीचं. तसच hitech जमाना म्हणून online विवाहमंडळात पण श्वेतानी नाव घातले होते स्वत्:च. सुनिताला स्वत्:लाही ही 'दाखवून घेणे' कार्यक्रम मनापासून आवडत नव्हते, त्यामुळे शक्यतो जितके कमी प्रोग्रॅम होतील तितके बरे असे वाटून तिनेही श्वेताला online नाव नोंदणी साठी प्रोत्साहन दिले होते. ही मुलं ईमेलवरच बरीच माहिती करून घ्यायची आणि मग आधी आपापली भेटायची. तिथे अनुकूल मत झालं तरच पुढे घरी भेटायचं असा संकेत होता. श्वेता अश्या प्रत्येक स्थळाची माहिती, ईमेल हे सुनिता-सुरेशला दाखवायची आणि त्यांनाही ओके वाटलं तरच भेटायची वेळ नक्की करायची.. हे असं कोणाला भेटाची तिची तिसरी वेळ. तिन्ही वेळा ईमेलवर भेटलेली मुल प्रत्यक्ष भेटीत पसंत पडली नव्हती. पहिल्या दोन वेळा तिने फ़ारस मनावर घेतल नव्हत, पण नक्की कुठे, काय आणि कोणाच चुकतय याचा अंदाज लेकीच्या उतरलेल्या तोंडाकडे पाहून आता घ्यायची वेळ आली होती..

सुनिता श्वेताच्या खोलीत गेली.. श्वेता पलंगावर नुसतीच बसली होती विचार करत. सुनिताला एकदम भरून आले. श्वेताच्या शेजारी बसली ती आणि तिचा हात हातात घेतला..
"काय झालं गं? अशी का बसलीस? काय विचार करतेस?"
"काही नाही गं आई.. असं का झालं असा विचार करत होते.. analyse करत होते की नक्की माझं काही चुकतय का? अगं मेल मधे जी काही info सांगतात ना त्यामुळे एक image तयार झालेली असते आणि तश्या image मधे तो मुलगा बसला नाही की एकदम अपेक्षाभंग होतो गं! आई आमची पध्दत चुकतीये का गं? तुमची ती 'कांदापोहे' पध्दतच बरी होती का?"
"छे गं.. तुला वाटतय, पण ते अगदी क्लेशकारक असतं गं.. चार लोक आपल्याला बघत आहेत, प्रश्नं विचारत आहेत आणि त्यावरून एक आयुष्यभराचा निर्णय घ्यायचाय आपल्याला.. आमच्यावेळी गोष्टी वेगळ्या होत्या.. साधारणपणे माणसं एकाच पध्दतीने विचार करायची, माहितीतली स्थळं असायची आणि आमच्या अपेक्षाही साधारणच होत्या.. आता सगळच इतकं बदललं आहे.. तुम्ही इतक्या
शिकलेल्या, एवढाले पगार तुमचे, सुखवस्तू राहणी, स्वत्:च्या व्यक्तिमत्वाची जाणीव.. त्यामुळे गोष्टी साध्या राहिल्या नाहीत.."
"आई मग यावर काहीच उपाय नाही का गं? "
"अगं वेडाबाई अशी एकदम उदास होऊ नकोस. सांग ना मला आज काय झालं नक्की? आपण ठरवू की कोणाच काय चुकलं ते.."
"आई खरं तर काहीच झालं नाही.. आम्ही भेटलो ठरल्याप्रमाणे.. गप्पा मारल्या छान, ईमेल मधे लिहिलेले टॉपिक्स पुढे बोललो, ऑफिसच discussion , कामावर गप्पा, family background बद्दल, general अपेक्षांबद्दल.. सगळं normal च..पण बाहेर पडल्यावर मी स्वत्:ला हा प्रश्नं विचारला की याच्याबरोबर आपण आख्खं आयुष्य काढू शकू का, ज्याला संसार म्हणतात असा करू का, तेव्हा का कोणास ठाऊक माझं gut feeling म्हणालं 'नाही'! हा 'क्लिक' नाही झाला अजिबातच त्या दृष्टीनी.. आणि मीच अस्वस्थ झाले..त्यामुळे confuse झालेय थोडी..
आई तुम्ही कसं ठरवलत गं की तुला बाबांशीच लग्न करायचय? आणि त्यांनी की तुझ्याशीच लग्न करायचय ते?" श्वेता जरा लाडात आली..

सुनिता तिच्या प्रश्नानी जरा लाजलीच!
"चल! काहीतरीच विचारतेस!"
"आई सांग ना पण.. आपण या विषयावर कधीच नाही बोललो.. तुझा experience share की माझ्याशी.. आपण friends ना? "
"अगं असं क्लिक बिक होणं नव्हतं गं आमच्यावेळी.. ओळखी ओळखीतून बाबांचं स्थळ तुझ्या आजोबांना कळलं.. चौकशी केली थोडी.. कुटुंब इथलच होतं, आमच्यासारखच होतं, फ़ार मोठी उडी नव्हती, म्हणजे मानपान करता आला असता, म्हणून दादांनी पत्रिका नेऊन दिली.. ती जुळली म्हणून बघण्याचा कार्यक्रम झाला.. तेव्हा मला बाबा आवडले, म्हणजे नाव ठेवण्यासारखं काही नव्हत, त्यांनाही तसच वाटलं असणार.. कारण त्यांचाच निरोप आला २ दिवसांनी पसंतीचा आणि मग काय, याद्या आणि लग्न!"
" my God! it was so simple ! आई काय मज्जा ना.. तुम्ही एकटे भेटलाच नाहीत का गं? आणि तसच लग्न ठरवायला संमतीही दिलीत! सहीच ना! पण तुला बाबांमधलं काहीतरी आवडलं असणार ना, काहीतरी क्लिक झालं असणारच की, उगाच कशी हो म्हणशील तू!"
"नाही गं बाई.. सांगीतलं की.. पसंतीचा निरोप आल्यावर दादांनी मला विचारलं की असा निरोप आलाय, पुढे जाऊया ना? म्हणजे त्यांना पुढे जायचं होतच.. मलाही नाही म्हणण्यासारखं काही नव्हतं.. झालं लग्न! इतका विचार करत कुठे होतो आम्ही वेडाबाई.. दादा करतील ते योग्यच असेल असा आंधळा आणि सार्थ विश्वास होताच, त्यामुळे शंकाही आली नाही मनात!"
"आई तुमचं बरय, पण आई, असा कोणी 'क्लिक' झाल्याशिवाय मी नाही उचलणार पुढचं पाऊल, चालेल ना तुम्हाला?"
"बघू आपण..तू इतक्या ठाम निर्णयावर येऊ नकोस.. कधीकधी आडाखे चुकूही शकतात गं, असे सरळसोट rule करू नकोस..मी बाबांशीही बोलते.. आपण सगळ्या बाजूनी विचार करून ठरवू.. हे तुमचं 'क्लिक' प्रकरण नवंच आहे आम्हाला.. चल, मी स्वयंपाकाचं बघते.. बाबा आणि अक्षु येतीलच इतक्यात.."'

आई गेलेल्या दिशेकडे श्वेता बघत राहिली.. आईला खरच कधीतरी कळेल का हे पटकन कोणी क्लिक होणं.. कसे कहीतरीच होते आधीचे दोघे.. काय कपडे, काय बोलायची पद्धत.. आणि आजचा अश्विन! कसे प्रश्नं विचारत होता.. अरे असशील तू तुझ्या कंपनीत सीनियर, पण म्हणून माझा job interview च घेत होता.. वाटलं होतं की आपले platforms एकच आहेत, तर थोडं interesting बोलणं होईल, पण साहेब जणू दाखवायच्या मूड मधे होते की मला 'तुझ्यापेक्षा' कसं जास्त कळत.! असे बेसिक मधे राडे असतील तर कसले संसार करणार! हे सगळं कळेल का आई बाबांना? नुसतं on paper सगळं ठीक असेल तरी....

प्रत्यक्षात
कुठेतरी काहीतरी क्लिक व्हायला हवं ना.. आपली DTPH ची माधुरी तर होत नाहीये ना? श्वेताही उलट्-सुलट विचारात अडकली..

सुनिता स्वयंपाकाला लागली, पण मनात अनेक विचार येत होते.. खरच हे 'क्लिक' होणं इतकं महत्त्वाचं आहे का? आपला आणि आपल्यासारख्या अनेकांचा संसार झालाच ना.. आपल्याला कुठे काही क्लिक झालं होतं?

या विचारावर अचानक सुनिता थबकली.. नव्हतं का झालं काहीच क्लिक? तिला ते दिवस आठवले.. आधी हिची पत्रिका जुळत नाही म्हणून बरेच नकार आले, मग आलं होतं ते अशोक साठेचं स्थळ.. त्याला पाहून का कोणास ठाऊक वाटलं होतं की याने होकार देऊ नये.. कारण होकार आला असता तर आपल्याकडे 'नाही' म्हणायला काहीच नव्हतं.. त्याचं ते आपल्याकडे बघणं, प्रश्नं विचारायची पद्धत, काहीसा व्यवहारी वाटला होता स्वभाव आणि वाटलं होतं की याच्याशी नको लग्न करायला.. आणि बरं झालं बाई की तेच 'नाही' म्हणले ते.. आणि ते सुहास कुलकर्णीचं स्थळ- तो तसा माहित होता.. कॉलेजमधे २ वर्ष पुढे होता आणि त्याचं वागणं-बोलणं माहित होतं.. तोही 'नवरा' म्हणून पसंत नव्हता पडला.. आणि 'हे' आले बघायला तेव्हा तसं क्लिकबिक झालं नव्हतं, पण थोडं आश्वस्त वाटलं होतं खरं यांच्याकडे पाहून..त्यांचे डोळेच पसंती सांगून गेले होते, आणि ते स्मितहास्य, नम्रतेनी दादा-आईशी बोलणं.. मत कुठेतरी आपलंही अनुकूल झालं होतच की..
अगंबाई म्हणजे हेच का ते क्लिक होणं!

सुनिताला हसूच आलं एकदम आणि श्वेताचं मतही खूपच पटलं! अगदी
पूर्णं जरी नाही, तरी विचार करण्यासारखं तरी नक्कीच होतं ते..

एवढ्यात सुरेश आणि अक्षय आलेच..
"आई या शनिवारी बोलवू का गं मित्रांना? project पूर्णं करतोय गं आणि काही महत्त्वाच्या गोष्टी discuss करून final करायच्या आहेत.."
"झालच म्हणजे आई.. हे घोडे नुसते धुमाकूळ घालतील रात्रभर.. यांचा अभ्यास शून्य आणि टीपीच जास्ती.. आणि आपल्याला रात्रभर त्रास.." श्वेता आलीच चिडवायला..
"ए गपे! माहिते तुम्ही किती sincere होतात ते.. जरा मी दोन मित्र घरी आणले की झालाच हिला त्रास.. आणि तू आणि तुझ्या टुकार मैत्रिणी.. तुम्ही काय खुसुरफ़ुसुर करत असता.. बोर नुसत.."
"तू येतोसच कशाला पण आमच्यात? चोंबडा.."
"ए तू जा की आता लग्न करून इथून म्हणजे मला सगळी खोली मिळेल.. मग आम्ही आत कितीही कल्ला केला तरी तुम्हाला त्रास होणार नाही.. पण तुला कोण पसंत करणार?" अक्षयनेही चिडवायला सुरुवात केली..

"आई, बघ ना गं".. चिडवणं normal च होतं, पण श्वेताला आज लागलं थोडं ते..
"अक्षू, नको रे तिला त्रास देऊस. बोलाव तुझे मित्र.. जा आता हातपाय धुवून ये जेवायला आणि बाबांनाही सांग.. आत्ता ती आहे म्हणून इतका बोलयतोयेस, पण एक क्लिकचा अवकाश आहे.. पटकन इथून गेली की कळेल तुला.."
श्वेता आईकडे पहातच राहिली.. आईनी चक्क 'क्लिक' शब्द वापरला.. सो तिलाही थोडं थोडं कळतय आपल्या मनातलं.. आपल्याला कुणी क्लिक न का होइना अजून, पण आईला आपले विचार नक्किच क्लिक झालेत..

"आई!" म्हणत श्वेताने सुनिताला मीठी मारली.. आणि सुनितानेही तिच्या पाठीवर आश्वासक थोपटलं.


समाप्त.
[मायबोली।कॉम च्या सौजन्याने]
योगदान : गौरी

No comments: