आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, June 27, 2007

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा

संसार दु:खमय आहे' याबद्दल समर्थांच्या मनात तिळमात्र संदेह नाही. पण माणसाने जर विवेकपूर्ण जीवनाचे नियोजन केले, तर त्याला याच संसारात ईश्वरप्राप्ती होऊ शकते. म्हणून समर्थ म्हणतात-

नव्हे सार संसार हा घोर आहे। मना सज्जना सत्य शोधूनि पाहें।।

जनीं वीष खातां पुढें सूख कैचें। करी रे मना ध्यान या राघवाचें।।

घनशाम हा राम लावण्यरूपीं। महां धीर गंभीर पूर्ण प्रतापी।।

करी संकटीं सेवकाचा कुढावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा।।

देह नश्वर आहे आणि जग दु:खमय आहे म्हणून निराश व्हायचे कारण नाही. श्रीराम आनंदघन आहेत, शाश्वत आहेत आणि प्रेमस्वरूप आहेत. त्यामुळे त्यांची कास धरल्यास हा संसार तरून जाणे एक खेळ आहे. रामचंदांचे ध्यान करावे हे सांगताना समर्थ ध्यानाची सोपी आणि सुलभ व्याख्या करतात. रामाचे चिंतन करणे म्हणजे रामाचे ध्यान करणे. आपण विषयचिंतन करून दु:खी झालो आहोत. तेव्हा श्रीरामाचे चिंतन करून सुखी होणे शक्य आहे.

प्रभू रामचंद मेघासारखे श्यामल आहेत, असे समर्थ म्हणतात. मेघ अतिशय सुंदर असतात. त्यांच्यात पाणी भरलेले असते. याचा अर्थ, रामराय कोरडे नाहीत. त्यांच्यात प्रेमाचा ओलावा आहे. मेघ उदार आहेत; कारण ते भूतलावर पाण्याचा वर्षाव करतात. रामचंदांचा प्रेमळ स्पर्शही साधकाला नवसंजीवन प्रदान करतो. राम धैर्यवान आहेत. रामाचे चिंतन केल्यास साधकाचे भयदेखील कमी होईल; कारण संकटकाळी मी एकटा नाही. माझ्याबरोबर माझे रामराय आहेत, ही भावना दिलासा देते. राम सागरासारखे गंभीर आहेत. उथळ माणूस साधना करू शकणार नाही. म्हणून रामाचे ध्यान करून साधकाने रामाची खोली प्राप्त करून घ्यावी.

राम कोदंडधारी आहेत. प्रत्यक्ष यमराजही रामाला पाहून घाबरतात. असे राम माझ्या अवती-भोवती असतील, तर मी य:कश्चित मानवाला का घाबरावे? मात्र रामाची कृपा संपादन करण्यासाठी 'विवेके तजावा अनाचार हेवा' अशी महत्त्वाची सूचना समर्थ देतात. मी अनैतिक असेन किंवा कोणाचा द्वेष करीत असेन, तर माझ्या हातून रामाचे चिंतन होऊ शकणार नाही. द्वेषाचे चिंतन फार खोलवर असते. रामाचे चिंतन खोलवर जाण्यासाठी मला द्वेष सोडावा लागेल. माता शारदादेवी म्हणतात- 'तुम्हाला खरेच मनाची शांती हवी आहे काय? तर मग दुसऱ्याचे दोष पाहायचे बंद करा.' रामाचे चिंतन करताना मद आणि आळस हे दोन शत्रूदेखील आड येतात. माणसाला यश, पैसा, सत्ता, नेतृत्व, कार्य या सर्वांनी मद चढतो. असा अहंकारी मनुष्य भगवंताचे चिंतन खोलवर नाही करू शकणार. हे दोष नाहीसे होण्यासाठी साधकाने सतत भगवंताच्या नामात राहण्याचा अभ्यास करावा. मनातल्या मनात भगवंताच्या नानाविध गुणांची सतत आठवण ठेवावी.

भगवंताचे चिंतन करताना माणसाला पैसे भरावे लागत नाहीत. तसेच राम ही दोन्ही अक्षरे इतकी सोपी आहेत की, त्यांच्या उच्चारात लेशमात्र कष्ट नाहीत. एकदा नामावर श्रद्धा ठेवून जीव भगवद्चिंतनात मग्न झाला म्हणजे त्याला भाराभर ग्रंथ वाचण्याची गरज नाही. ईश्वरप्राप्तीचे इतरही अनेक मार्ग आहेत. पण ते खडतर आहेत. भगवंताचे चिंतन करण्यासाठी श्रद्धा हे भांडवल पुरेसे आहे. पण तीर्थयात्रा अथवा दानधर्म करावयाचा असल्यास गाठीला पैसा हवा. नर्मदा प्रदक्षिणा करायची झाल्यास अथवा उपास-तापास केल्यास देहाला खूप कष्ट आहेत. यज्ञ करायचा असल्यास तुम्हाला यज्ञाचा अधिकार असला पाहिजे. मात्र भगवंताचे ध्यान करणे हा सर्व जिवांचा जन्मसिद्ध हक्क आहे. भगवंत दयाळू असल्यामुळे भक्ताचा भाव पाहून तो त्याला साहाय्य करतो. म्हणून समर्थ म्हणतात-

बहूतांपरीं संकटें साधनाचीं। व्रतें दान उद्यापनें तें धनाचीं।।

दिनाचा दयाळू मनीं आठवावा। प्रभाते मनीं राम चिंतीत जावा।।

समर्थांच्या मते भगवद्चिंतनाची ही साधना सर्व साधनांचा राजा आहे. फक्त हे सोपे असल्यामुळे त्याच्या उपयोगितेबद्दल साधकाच्या मनात संदेह असतो. तुकाराम महाराज तर म्हणतात-

वेद अनंत बोलिला। अर्थ इतकाचि साधिला।।

विठोबासी शरण जावे। निजनिष्ठे नाम घ्यावे।।

कलियुगात कर्मकांड, यज्ञयाग, सर्वसंगपरित्याग या गोष्टी जशा व्हायला पाहिजे, तशा शुद्ध स्वरूपात घडणार नाहीत. यज्ञ करणारे पुरोहित जर पैशाचे लोभी असतील किंवा पुजेसाठी वापरलेले साहित्य काटकसरीने कनिष्ठ दर्जाचे वापरले असेल, तर त्याचे योग्य ते फळ मिळणार नाही. पण श्रद्धापूर्वक भगवंताचे ध्यान केल्यास भगवंत धावत भक्ताला भेटायला येतो.

- सुनील चिंचोलकर

No comments: