माझं बालपण
-- विनीत सांखे
आईच्या पोटातले नऊ महिन्यांचे सुखैनव जीवन घालवताना आपल्याला तशी कसलीच काळजी नसते. सुखाच्या सागरात तरंगत आईच्या वाटचे चमचमित जेवण हादाडत आरामात पहुडणे ह्याला तोड नाही. पुढल्या आयुष्यातले दुर्दैवाचे दशावतार आपल्या ध्यानीमनीही नसतात. पण भाड्याचं घर कित्तीही छान असलं तरी भाडेकरूचं नसतं तसंच ह्या घरातही आपली व्यवस्था देव नामक एजण्टने फक्त ९ महिन्यांपुरताच केलेली असते. काही जास्त महिने एक्स्टेंशन द्यावे म्हणून अर्ज करावा तर देवाच्या हातात ब्रह्मदेवाचं निसर्गनियमांचं ऍफिडेविट. मग एके दिवशी आपण लाथ मारून बाहेर काढले जातो. तिथून मग खऱ्या दिव्व्याला सुरूवात होते. ते दिव्य म्हणजेच बालपण.
बालपण म्हणजे त्रास हा वाद मी वादंगभगिनी मोमता बॅनर्जीच्या समोर घालू शकतो कारण त्याला माझा १२ वर्षांचा तृणमूल बालानुभव गाठीशी आहे. ह्याची सुरूवात होतेच शैशवाशी.
आईच्या पोटातून बाहेर आल्यावर जरी रडायला येत नसतं तरी लोकं पायाला टीचक्या मारून मारून रडवतात. रडत रडत डोळे किलकिले करून बघावं तर आजूबाजूला सगळे दात काढून हसत असतात. अरे मी काय जोकर आहे काय हसायला? असं डोक्याचं दही होतं सांगू. आजूबाजूला बघायला लोकांचा एवढा गल्ला जमतो की जीव नुसता त्यांच्या गलबल्याने हैराण होऊन जातो. त्या मासळी बाजारात मग शेवटी एका ऊबदार ओंजळीत आपल्याला ठेवतात. तिथे कुणीतरी आपल्याशी बोबडं बोलत असतं. हा स्पर्श, हा आवाज ओळखीचा असतो. हा तर आपला जुना घरमालक!! म्हणजे आईच ती!! तिच्याकडे असताना बरं वाटतं. वाटतं कदाचित पुन्हा पोटात घालेल आणि म्हणूनच त्या आशेवर आपण तिच्याकडे जास्त रडत नाही. पण ते सगळं खोटं असतं हो. म्हणजे शेवटी ह्याची जाणिव व्ह्ययला काही दिवस जावे लागतातच. ते शहाणपण पहिल्या दिवशी येत नाही. आता उघड्यावरच आपला संसार असतो.
मग घरी आणल्यावर जो तो मुलगा की मुलगी म्हणून आपली लंगोटी सारून पाहून आपल्या सार्वजनिक विनयभंगाचा हक्क सांगणारा। अस्सा राग येतो सांगू. पाहणाऱ्याच्या तोंडावर मूत्रधारेची अचूक पिचकारी मारावीशी वाटते. त्यात जो सर्वात वात्रट त्याला तर ह्या "तीर्था"सोबत "प्रसाद" ही द्यायचा असतो. बाळ ज्याच्यावर प्रथम मुततं तो बाळाला न आवडलेला पहिला माणूस होय. स्वानुभवाने सांगतोय.
मग आपल्याला पाळण्यात ठेवतात. हे ठिकाण म्हणजे झ्झाक्क हा! एकदम बेस्स. छताला टांगलेला पंखा तेव्हा माझ्याशी लपंडाव खेळत असतो आणि प्रत्येक झोक्यासोबत येत जात असतो. हा पंखा माझ्या बालपणातला माझा पहिला मित्र होय.
पण पंखा आणि आई ह्या मित्रांची यादी इथेच संपते. आईच्या व्यतिरिक्त बाकी सगळे नुसताच त्रास. मालिश करणारी म्हातारी म्हणा की धुरी देणारी आजी म्हणा. त्यांत एक बाबा नावाचा माणूस असतो. नुसताच आईच्या आणि आपल्या कामात लुडबुड करत असतो. माझ्या हाती असतं तर मी माझ्या पाळण्यात "बाबा फ्री झोन" डिक्लेयर केला असता. त्यात मिशीवाला बाबा म्हणजे अजूनच कटकट. आईचा मुका म्हणजे गुलाबस्पर्श पण मिशीवाल्या बाबाचा मुका म्हणजे काटेरी निवडुंग. त्यात माझा तर बॅडलक अजून खराब. माझ्या घरातला बाबा तर दाढीवालाही निघाला!
वळणे, मान उचलणे, रांगणे आणि मग महतप्रयासाने उभे राहून चालणे हे सगळं आपणहून करायचं असतं। मनासारखं खेळावं, जरा घरातला कचरा चाटवा, मातीसारखा टेष्टी खाऊ खावा तर सगळे गर्दी करून येणार, आपल्या तोंडात त्यांची बोटं घुसडून तोंड साफ करणार आणि डोळे वटारणार. हे नेहेमीचंच. तरी आपण कधी कधी त्यांचा डोळा चुकवून पायपुसणी, चपला अन झाडू चाटून घेतोच. हे म्हणजे पुढे आईच्या नकळत डब्यातल्या गोळ्या, चॉकलेट, आईस्कीम खाता येण्याची प्रॅक्टीस म्हणा की.
"काका", हा माझा पहिला सुसंबद्ध शब्द. ह्याचा अर्थ काय देव जाणे! पण त्यानंतर मी आजी, वॉचमन आणि बाबाला ही काकाच म्हणायचो. "काका" (वरील सगळी मंडळी), बालपणातले दोस्त "चिऊ"-"काऊ" (दोस्त! साफ खोटंय ते! हे दोघे सदानकदा माझ्या जेवणावर टपून बसलेले. आई त्यांच्या नावाने सतत मला भिवयायाची. पण खरं सांगू त्यांना मी कधीही माझं खिमट खाताना प्रत्यक्ष पाहिलं नाहिये. कदाचित त्यांच्याकडे माझा मिकी माऊस चमचा नसावा. असो), "कबू" (पोपट आणि कबूतर दोघांना चालते), "मामा" (हे इंग्रजीत आई आणि मराठीत तिचा भाऊ असे दोघांना संबोधित) असे अनेक शब्द आपण बोलायला शिकतो. पण ते शिकल्यावर पुन्हा पुन्हा "काका" बोल, "मामा" बोल, "कबू" बोल अशा फर्माइशी चहू बाजूने येऊ लागतात. त्यात शेवटी "आई कुठे आहे दाखव?" असं कुणी विचारता आई दाखववी तर "ती आई" असं म्हणून आपण आपलं कौतुक करवून घेतो. पण त्यापुढे सगळा गोंधळ. पुन्हा फर्माईश, "बाबा कुठे आहेत दाखव?" ह्यावर "तो बाबा" असं म्हटल्यावर सगळे लाडावून रागावतात म्हणतात, "तो नाही ते बाबा म्हण".
मी मात्र गोंधळून "ते" ह्या अनेकवचनी सर्वनामातले "ते" अनेक बाबा घरात शोधत राहतो!!!
ते अनेक बाबा शोधण्यातच माझं शैशव संपतं अन पुढचं शालेय जीवन सुरू होतं.
माझं शालेय जीवन:
शाळा किंवा विद्यार्थी ह्याला ‘विद्यार्थीदशा’ असा चपखल शब्द आहे. कारण खरोखरच ती एक दशा असते. माझं शिक्षण ‘उत्कर्ष मंदिर’ ह्या मराठी शाळेत झालं ते झालंच. माझ्या शाळेत शिकवायला ‘बाई’ आणि ‘सर’ अशी दोन टाईपची लोकं असायची. त्यांच्या सोबतीस मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिपाई, कारकून आणि पी.टी. टीचर अशी फडतूस लोकंही असतात. त्यांना भाव न देणे.
तर माझ्या शाळेत मराठीचा तास सुरू व्हायचा तो राणे बाईंनी. त्या आमच्या वर्गशिक्षिका असत. दिवसाच्या सुरुवातीस त्यांनी प्रेजेंटी घ्यायची तर ती जणू ऍब्सेन्टी वाटत असे. आजचा शालेय दिवस कसा जाईल ह्या विवंचनेत मुलं तर ७० मुलांची नावं तासाच्या ४० मिनिटात कशी उच्चारायची ह्या विवंचनेत राणे बाई असायच्या. त्यामुळे दोघंही ऍब्सेन्ट माईंडेड. राणे बाईंच्या सुदैवाने (व मुलांच्या दुर्दैवाने) प्रेजेन्टी संपली की मग ‘कृष्णामाई’ (हे राणे बाईंचं टोपण नाव) संथ शिकवणी सुरू करीत. अटल बिहारी वाजपेयी अन राणे बाई यांचा दूरचा संबंध वाटत असे. ‘संथ वाहते कृष्णामाई’ हे एकच गाणं आमच्या डोक्यात वळवळत असे. (म्हणूनच ते टोपणनाव). त्यांनी दोन वाक्यात घेतलेल्या वेळाची आम्ही नोंद करून ठेवत असू व ‘मागल्या आठवड्यातली रेकॉर्ड वेळ’ पब्लिश करत असू. सातवीत त्यांनी ‘अरे खोप्यामंधी खोपा‘ ह्या बहिणाबाईंच्या ओव्यात घेतलेल्या तीन मिनिटांच्या पॉज़ला प्रथम क्रमांक मिळाला होता. आमच्या नंतरच्या बॅचच्या मुलांनी त्यात भर घालून पाच मिनिटांची नोंद केलेलीही मला लख्ख आठवतेय.
आता मराठी ही मातृभाषा. ती शिकणे हे अपरिहार्य. पण त्यात गद्य आणि पद्य हे अमराठी राक्षस होते. गद्यात ज्ञानेश्वरीन मराठी धडा असे. ह्यातली भाषा ज्ञानेश्वरालाच ठाऊक. मग संदर्भासहीत स्पष्टीकरण द्या असाही एक प्रश्न असे. ‘नलाची प्रतीक्षातीव करूनी दमयंतीसंगे शुभ्रहंसाने बिजतंतूंशिवाय नीरक्षीरही नाकारले’ ह्याचे स्पष्टीकरण ‘दमयंती ऍण्ड हर स्वान ऑन हंगर ष्ट्राईक!’ असे एका वाक्यात आटपे. पण नळाची प्रतीक्षा चाळीतल्या बायकांशिवाय दमयंतीही करते इथपासून हंसाने दुधाचे (आणि आमच्या डोक्याचे) दही केल्यापर्यंत वीस ओळी लिहाव्या लागत. पद्यात मोरोपंत नावाचा कवी होता. तो पाच वर्ष सतत आमचा क्लास मेट असे. पाच वर्ष राहूनही त्याची भाषा बोलायची मराठी होती हे आम्हाला शेवटपर्यंत कळले नव्हते.
मराठीच्या पाठोपाठ असायचा गणिताचा तास. त्याच्या शिक्षिका असायच्या दीक्षित बाई. ह्या म्हणजे हिटलर आणि आईन्स्टाईन ह्याचे चुकलेले रासायनिक समीकरण. खरं तर ह्या रासायनिक प्रक्रियेत जमलेला नकोसा रेशेड्यु समजा. तासाच्या सुरुवतीला अस्खलित को.ब्रा. लहजेत ‘संखे मी बघतंय! आता वही उघडायला निमंत्रण द्यायचं की ह्या वॉटरबॅगवाल्या जोशीभटजींकडून मुहूर्त शोधू?‘ अशी जळकी कुजकी बोलून त्या मुलांना जेरीस आणत. अगदीच कधी कधी मग ‘पट्टी मारो बालक सुधारो’ चळवळ असायची. त्यात बॅकबेन्चर ‘आयरे’ आणि ‘घावरे‘ हे नेहेमीचे सक्रिय कार्यकर्ते असायचे. त्यांनी पाच वर्षं हे समस्त वर्गातर्फे पट्टी खायचं कार्य अगदी लीलया सांभाळलेलं. त्यासाठी दहावीत ‘थँक्सगिवींग’ म्हणून आम्ही त्या दोघांना दीक्षित बाईंचा फोटो छापलेली पट्टी भेट दिली होती. एरवी पट्टी खाताना कधी न रडलेला ‘घावरे’ तेव्हा भावूक होऊन मुळूमुळू रडलेला. हे सांगताना माझ्याही डोळ्यात पाणी आलेय.
बरं तर दीक्षित बाई शिकवायच्या बीजगणित व भूमिती, ‘सेमीइंग्लिश’ भाषेत, अल्जेब्रा आणि ज्योमेट्री. दीक्षित बाईंचा अल्जेब्रा आम्हा मुलांत एवढा टेरर आणायचा की मला हा अल्जेब्रा, अल-कायदा किंवा अल-जझिरा नावशी साम्य असलेल्य अल-ज़ेब्रा नावाच्या कुण्या टेररीस्ट ग्रुपनी दीक्षित बाईंशी संधान बांधून बनवला असावा असेल वाटे. त्यातली अगम्य प्रमेये जणू ‘प्रश्न विचारशील तर मुंडकं उडवीन’ असे ठणकावून म्हणायची. त्यात ज्योमेट्री हे कधी न कळलेलं रेषांतले गणितही असे. साईन, कोसाइन आणि टॅन ह्या त्रिकोणी तिकडमांनी आमचे आयुष्य दणाणून टाकले होते. एवढं त्रिकोणी आयुष्य असूनही असूनही गणिताच्या पेपरात मात्र दीक्षित बाईंनी आखलेली लाल वर्तुळंच आमच्या सोबतीस येत.
त्यात असायची कॅमल कंपास पेटी. पु.लं. च्या व्याख्यानुसार ही शालेय जीवनातली एक छत्रीलायक निरुपयोगी अन हरवण्यालयक वस्तू. त्यातला तो कंपास. आखताना सुरूवातीस सगळं ठिक. पण परत पोहोचेस्तोवर वर्तुळाचं कडबोळं होणं निश्चीत. त्यात पुन्हा दोन टोकांचा डिव्ह्याडर. हा कुणाच्या बापाने तरी कधी शाळेत वापरला आहे का? उलट त्याला बघताच मला धडकी भरायची. वाटायचे की कॅमल कंपनीने ह्याला नक्कीच दीक्षित बाई आणि अलजेब्रा-ग्रुपशी कॉन्ट्रॅक्ट करून अखिल विद्यार्थी विश्वात टेररीज़मची पाळेमुळे रुजवण्यात वापरण्याचे शस्त्र म्हणून अंतर्भूत केले असावे. हा दरारा एवढा होता की मला तर दीक्षित बाई डिव्ह्याडर हाती घेऊन त्याच्या टोकांच्या धाकाने माझ्याकडून अल-जेब्रातली त्यांनी शिकवलेली सगळी प्रमेयं फळ्यावर उतरवून घेत आहे असं स्वप्नही सातवीत पडलं होतं.
खोटं वाटतंय? ज्या कुण्या बायकांचे नवरे उत्कर्ष मंदिरात दीक्षित बाईंकडे गणित शिकलेत त्यांनी त्यांच्या नवऱ्याना विचारावं. आई जशी न झोपणाऱ्या बाळाला पलंगाखालील बुवाचा धाक दाखवते तसं दीक्षित बाईंचं नाव काढताच कसे शिस्तीत वागतील बघा !
गणित निभावला तर पुढच्या वाटेवर भूगोलाच्या काचा. त्यात देवांग सरांचा ४० मिनीटांचा ज्ञानोपदेश. इन्सोम्नियावर जालीम उपाय. त्यांच्या तासात लवंदे आडनावाचा माझा वर्गमित्र कधीकधी त्या तासात झोपा काढी. एकदा त्याला देवांग सरांनी "मतलई वारे कधी वाहतात सांग बघू?" असे विचारताच "
मॉन्सून मध्ये" असे खडबडून जागे होणाऱ्या लवंद्याने म्हटलेले. आता तुम्ही म्हणाल, ’मराठीच्या तासात झोपला नाहीत ते!’
मराठीच्या तासात आमच्यात कोण एक्झॅक्ट वेळ नोंद करतोय ह्याची स्पर्धा चालायची. त्यामुळे झोप यायची नाही. शिवाय पहिल्याच तासाला झोपून कसं चालेल? झोपा काढायचेही विशिष्ट तास असतात.
इंग्रजी म्हटलं की आमचा वर्ग गार्डन-गार्डन होई (आनंदाने नव्हे.) ‘ती फुलराणी’ ऊर्फ वढवेकर बाई आम्हाला इंग्लिश शिकवत. त्यांना फुलराणी म्हणायचे एकच कारण की त्या रोज आंबाड्यात विविध फुलं सजवून येत. गुलाब, मोगरा, जाई किंवा अस्टर ह्या डोमेस्टीक फुलांचं तर सोडाच पण गुलमोहोर, जास्वंद किंवा क्वचितच केवड्यासारख्या अपरिचित फुलांचा बुकेट डोक्यावर दिसे. कधी कधी तर फक्त पानंच दिसायची. आता फुलराणी तास सुरू करायच्या त्या ‘कीड्स!’ ह्या संबोधनाने. आता सांगा सातवीतली मुलं टीनेजर असतात. त्यांना कीड्स म्हणून कसं चालेल? त्यात पुन्हा स्पेलिंग म्हणजे बालमनाची कत्तल. एकदाच अशा कुणी कमनशीबी मुलाने डिफीकल्टी शब्दाची स्पेलिंग चुकीची लिहिली म्हणून कींडरगार्डनच्या मुलांना ऎकवतात तसे त्यांनी आम्हाला एक ऱ्हाईम ऎकवले, "सेवन लिट्टल वूमन ऑलवेज से हाय! मिसेस डी, मिसेस आय, मिसेस एफ.एफ.आय, मिसेस सी, मिसेस यु, मिसेस एल.टी.वाय!". आम्ही मात्र किंडरगार्डन मध्ये पाठवल्यागत अवघडलेला चेहेरा करून हे बोबडगीत गिरवले. आता ह्या सात बायकांना ‘हाय’ बोल्ण्याशिवाय कुठलं काम नाहीये का किंवा त्या सगळ्याच मॅरीड का? ह्याचे आकलन आमच्या कीडीश मनाच्या पलिकडचे होते. एवढं इंग्रजी शिकूनही ‘माझ्या आईच्या हातच्या मसूरीच्या आमटीची अन खमंग बांगड्याच्या रश्श्याची चव कश्शा कश्शाला नाही’ ह्याचे भाषांतर मी अजून करू शकलेलो नाही.
त्यानंतर असायचा इतिहास. आता हा विषय म्हणजे मेलेल्या माणसांच्या कर्माची फळं आम्ही भोगत होतो असं समजा. ते शिकवायच्या ‘डंके’ बाई. केस भरपूर पिकलेले, एक दोन दात गायब, वेहेऱ्यावर सुरकुत्या, गळ्यात कधी कधी स्पॉंडिलायसिसचा पट्टा असं इसविसनापूर्वीचं ऎतिहासिक वय आणि नेपथ्य त्यांना लाभलेलं होतं. म्हणून इतिहास शिकवायचं काम त्याना मिळलं असावं. त्यानी आम्हाला दुसरं महायुद्ध शिकवलं होतं. जर्मनीची ब्लिट्स क्रीग तंत्राची लढाई त्या अशा प्रकारे हातवारे करून दाखवत की वाटे आत्ताच अतिश्रमाने गळून पडतील.
इतिहास व सनक्रम वारी हे नशीबातलं नेहेमीचं चुकलेलं गणित. चार मार्काच्या ह्या प्रश्नामुळे पेपर ५० मार्काचा नसून ४६ मार्काचा आहे अशी नाईलाजास्तव समजूत आम्ही शेवटीशेवटी मनाला घातलेली होती. त्याला जोडून २५ मार्काच्या नागरिकशास्त्र ह्या ‘रीन के साथ बाल्टी फ्री !’ असा दीड दमडीचा विषय होता. त्यात तुमच्या विभागातील नगरसेवकाचे नाव व कार्ये लिहा असा प्रश्न आला की पोलिसातल्या यादीतले खरे नाव "तडीपार बाबू ब्रॉयलर" लिहावेसे वाटे, पण अवसान गाळून आम्ही ‘बाबूराव शेट्टी’ असे लिहित असू. अन त्यामागे कार्ये लिहिताना ‘खोटे बोलू नये’ ह्या गांधीवचनाला आम्ही कंपास पेटीत गुंडाळत असू. ती कंपास पेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.
मग इतरही सीजनल विषय असत. जसे संस्कृत. हा विषय जो तीन वर्षे ब्रह्मराक्षसाप्रमाणे मागे पडला तो पडलाच. त्यातही दिवसरात्र "राम: रामौ रामा: प्रथमा" अशी रामची रूपं दिसत. अन दिवसा ‘अहम’ ची रूपं आठवावीत तर आपल्या चांगल्या स्मरणशक्तीचा झालेला मिथ्या अहम गळून पडत असे.
सायन्स किंवा विज्ञान म्हणजे विकृत ज्ञान असावे असे वाटे. कधी कधी जीवाशास्त्रात झुरळ कापून त्याचे पोस्ट मार्टम करताना, शरीराचा कुठलाही हिस्सा, अगदी डोकं काढूनही झुरळ तीन दिवस जगते हे माहित असल्याने, पोस्ट मार्टम केलेलं झुरळ दुसऱ्या दिवशी उठून जिवंत होईल व आपल्या मागे सुडाने पळायला लागेल अशी भीती सतत वाटत असल्याने आम्ही झुरळाचे सगळे पाय कापून ठेवत असू. शौतिक शास्त्रात नेहेमीचे बिनीचे शिलेदार न्यूटन, गॅलिलियो भेटत. एकाच्या डोक्यावर सफरचंद पडूनही ते न खाता त्याने गरुत्त्वाकर्षणाचे सिद्धांत का मांडले व दुसऱ्याने पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे अगदी शेंबड्या पोरालाही ठाऊक असलेले तत्त्वज्ञान पाजळून काय साध्य केले ते आम्हाला कळत नसे. इकडे रसायनशास्त्राने त्याच्या समीकरणांनी आम्हाच्या डोळ्यात एचटुओ आणलेले होतेच.
हिंदी भाषा चांगल्या भारतीय नागरिकासारखी दुकानातल्या वाण्याशी बोलतायेण्याइतपत शिकलो.
ड्रॉईंग मध्ये स्मरणचित्रात नेहेमी अपघाताचे चित्र काढून लाल कलरने रंगवून आम्ही मरणचित्रे साकारत असू. त्यातही एकीकडे माणूस मेलेला असूनही फोटो काढताना माणसं जशी अटेंशन स्माईल देत असतात तशी इतर माणासांची चित्रे आणि एकीकडे अपघाताची तमा न बाळगता फुगे विकणारा फुगेवाला, भाजीवाली असे. आकाशात सूर्य असे, पक्षी असत, पाऊस पडेल की काय इतकी शंका येई इतपत ढग असत. डोंगर असत. एकीकडे मोटार असे. त्यात नेहेमी मारुती ८०० दिसे. रोल्स रोईस किंवा मर्सिडीज ची चित्र काढण्याची सोडा पण त्या सुचण्याचीही आमची लायकी नसे. भरीस भर म्हणून मेलेला माणून रस्त्यावर झोपल्यासारखा असे अन ट्रॅजेडी दाखवायची म्हणून बाजूची लोकं न रडता मेलेल्याच्याच डोळ्यात आम्ही अश्रू दाखवत असू.
पीटीच्या वेळेत पीटीचे सर चित्रकलेच्या बाईंशी गप्पा मारत असत म्हणून तेव्हा आम्ही हवा गेलेले फुटबॉल पॅण्ट खराब होऊ नये म्हणून पसरून त्यावर बसत असू.
तर अशी गेली ती विद्यार्थीअवस्था. उत्कर्षमधली. ही शाळा नावाची पार्टटाईम जेल सोसल्यावर आपलं रूपांतर एव्हाना राकट गुंडात झालेलं असतं. त्यात दहावी नावाची सक्त मजुरीची शिक्षा असते. ती एकदा सोसली की आपल्याला राज्य करण्यासाठी कॉलेज नावाचा इतर गुंडांचा इलाका मिळतोच. पण काहीही म्हणा तिकडे अन पुढच्या आयुष्यातल्या संकटांशी राडा करण्यासाठी हे शाळेतलं शिक्षणच मग कामी येतं.
क्या बीडू लोग. सही बोला ना?
1 comment:
khupach chaan ahe.
I think he Pu La che ahe na.
Post a Comment