देवा, घे एकदा अवतार!!
देव देव्हाऱ्यात राहतो
दुनियेची त्यास काय कल्पना
इथे मनुष्याचे राज्य
मंदिरही त्याचीच एक रचना
फ़क्त पाप धुवायचे काम देवाकडे
लडिवाळ ते अभिषेकादी साकडे
परत निघतसे नवीन पाप कर्मण्या
संपता पुण्याचे इंधन, येई मग हवना
दानपेटीस मिळते लाच दहा रुपयांची
बाहेर उभ्या देवाची सोय नाही खायची
रोज भजन असे भिकाऱ्याच्या श्रवणा
एवढे पुण्य असुन का ती वंचना
नुसतीच गीता वाचून कसा मिळनार स्वर्ग
चाललात का कधी परोपकाराचा मार्ग
तहानलेल्याची भागवलीत का कधी तृष्णा
ढोंगी उपासाच्या कसल्या हो वल्गना
देवळात असे भक्तांची वर्गवारी
भक्त तोच महान ज्याचा खिसा भारी
मोठी मजेशीर असे ही संरचना
दुकानदार पुजारी,भक्तीचा भाव उणा
म्हणुन देवा, घे एकदा अवतार
थांबव ही भक्तिची उसनवार
पाप पुण्याचा होऊ दे सरळ सामना
माणुसकी जागव रे प्रत्येक मना
-- अभिजित गलगलीकर
No comments:
Post a Comment