आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, December 11, 2007

चिखलफेक

हसून हसून तिची पुरेवाट झाली होती. चिखलात पडलेल्या अरविंदाची अवस्था पाहून ते स्वाभाविकही होते.
खरी गम्मत त्या दोघांना पाहणाऱ्यांची झाली होती. लोकांना दिसत होते दोन काळया कुट्ट चिखलाने
माखलेल्या आकृत्या. निशाचे हसणे अजुनही थांबलेले नव्हते. खरे तर ती काय कमी माखलेली नव्हती.

कॉलेजच्या पहिल्या तासापासून अरविंद निशाला पाहून पहिल्या बघण्यातच खल्लास झाला होता. मग कोणतीही
निशाशी बोलण्याची संधी त्याने सोडली नाही. निशा आता त्यांच्या गटातली झाली होती. केमेस्ट्री प्रॅक्टीकल्स,
छोटे मोटे ट्रेक्स, कधी कधी एखादे सुट्सुटीत हॉटेल अशे त्यांच्या गटाचे सांस्कृतिक कार्यक्रम मजेत पार पडत
होते. निशा सगळ्यांशीच छान वागत असे. पण अरविंदच्या मनातले विषेश तिला काय ठाऊक नव्हते.

अनिकेतला जेव्हा सांगितले तेव्हा तो उडालाच. म्हणाला अरविंद "काय सांगतोस काय? खरंच की काय?"
"नाही मी चित्रपट काढायला घेतलाय आणि तुला नवा प्लाट ऐकवत होतो", अरविंद चिडून म्हणाला.
"अरे रागावतोस काय! चेष्टा केली रे मी", अनिकेत बोलू लागला, "तुला काय वाटले, मांजर डोळे बंद
करून दूध प्यायली म्हणजे कुणाला कळत नाही, अरे तुझे तोंड ती दिसली की जे उघडते आ वासून ते ती
दृष्टीआड होईतो बंदच होत नाही माहित आहे".


"ए ते तोंड वगैरे अतिरंजित वर्णन आहे बर", आता अरविंद मारायच्या पावित्र्यात अनिकेत कडे सरसावत
होता, आणि तो अनिकेतला एक गुद्दा घालणार तेव्हड्यात अनिकेत निसटला आणि पळता पळता म्हणतो काय
"एक जरी गुद्दा बसला ना विंद्या तर कालेजच्या कॅन्टीन मध्ये जाऊन डरकाळी फोडेन की ऐका हो ऐका,
अरविंद शेट यांना प्रेमरोग जडला असून...", अनिकेत पुढे काही म्हणणार इतक्यात त्याला अरविंदाचे
आर्जवी डोळ्यांनी, अगतिक चेहऱ्याने आणि दोन्ही हातांनी नमस्कार मुद्रा करून त्याच्या कडे बघणे दिसले आणि
त्याचे शब्द मधेच अडकले.
"अरे अरे, काय यार आता काय रडणार आहेस की काय?", प्रेमात पडल्यावर माणूस हळवा होत हे ऐकले
होते पण पाहवत नाही रे गड्या.
"मग काय, इथे माझे प्राण जायची वेळ आलीय, तिला कसे सांगावे काय कळत नाहीये आणि तुला चेष्टा
सुचतेय", अरविंद एव्हडूसं तोंड करून म्हणाला.
"ए, तुला राजेश ठाऊक आहे", अनिकेत ला काहितरी नविन आठवल्यासारखे अरविंदाकडे बघून त्याने
विचारले.
"तो, प्रणिताला गटवणारा, तो उंचसा राजेश", अरविंदाला आठवणे फार कठिण नव्हते, कारण प्रणिता
कॉलेजची तारका होती.
"हो रे तोच, माझ्याशी बोललाय एक दोनदा. प्रेमाच्या बाबतीत बाप माणूस आहे बेटा. अरे
व.पु.काळेंच्या पुस्तकातले उतारे घडाघडा म्हणतो रे बोलता बोलता. एकदा त्याला विचारू की सल्ला काय
करता येईल ते. बघ आज संध्याकाळीच भेटू तू म्हणशील तर", या एका वाक्यात अनिकेतने मिटींग
मनातच निश्चित देखील करून टाकली होती आणि अरविंद मानेने हो देऊन मोकळा पण झाला कारण त्याच्या
हृदयाची जखम खोल होत चालली होती.

कॉलेजमध्ये प्रवेश करतांना आज अरविंदाची स्वारी जाम खुश्शीत होती. आज राजेश ला भेटायचे होते ना
संध्याकाळी. नेहमीप्रमाणे अरविंद, निशा, अनिकेत, पायल, सुधा सगळे स्कुटर स्टॅन्ड वर भेटून एकत्र
कॉलेजात प्रवेश करत होते. थट्टा मस्करी नेहेमी प्रमाणे चाललेली होतीच. पण अनिकेतच्या डोळ्यात
मिश्किल भाव होते. तो सारखा सारखा अरविंदा कडे पाहून हसत होता. अरविंदला सगळे कळत होते, तो
डोळ्यानेच जमेल तेव्हढे त्यांना मोठ्ठे करून त्याला दटावत होता, आणि तेव्हढ्तात कोणत्यातरी दगडाने तोल
जाऊन एकदम निशा समोरच्या चिखलात ढाडकन पडली.

दोन मिनिटे काय झालेय हे कळायलाच लागले सगळ्यांना. आजुबाजुला हशा पिकलेला पाहून काय झालेय याची
आता थोडी थोडी कल्पना गटाला यायला लागली. निशाला हात देऊन उठवण्याच्या नादात खरी गम्मत झाली
ते अरविंद ची. निशा हात धर म्हणता म्हणता साहेब तिच्याहून अधिक सपाट्याने चिखलात लोळण घेते झाले
आणि प्रक्षकांना आता फुकटात डबल मजा देते झाले.

चिखलात माखून रडवेली झालेली निशा सुद्धा अरविंदचा तो मदत प्रकल्प पाहून खो खो हसू लागली. गट
आणि तमाम प्रेक्षकवर्ग आता दोन चिखलात माखलेले गोळे एकमेकांकडे पाहून कसे घमासान हसतात, हे
पाहत होते.

"काय वेंधळा आहेस रे विंद्या", निशा हसता हसताच म्हणत होती, "कसली मदत रे तुझी?", आता ती
चिखलात रूळली होती.
"मदत नाही निशा", अरविंद अचानक शांत झाला, "तू अचानक पडलीस आणि सगळे तुझ्याकडे पाहून हसू
लागले, मला नाही आवडलं, नाही आवडलं मला. मग मी काय करणार तुला हात देऊन उभे केले तरीही
चिखलात माखलेलं सत्य काय मला बदलता येणार नव्हतं. मग माझ्याजवळ एकच उपाय होता."
आता निशाच्या अवाक होण्याची पाळी होती, "म्हणजे तू, तू, चिखलात..", आता निशाचा चेहरा आ वासून
अरविंदाकडे बघत होता.
"निशा, मला तू खूप आवडतेस, आयुष्याचा प्रवास एकत्र माझ्याबरोबर आखायला तुला आवडेल?", अरविंद
बोलून गेला आणि नंतर त्याला कळले की आपण बोलून गेलो आहे, आणि आता त्याची परिक्षेचा निकाल
लागण्याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यासारखी स्तिती झाली.

निशाने एकदा चिखलाकडे पाहिले, पुन्हा अरविन्दाकडे पाहून ती "तू, मुद्दाम..." असे काहीतरी पुटपुटली,
आणि एकदम चिखलाचा एक गोळा उचलून तिने तो अरविंदाकडे फेकला. आणि हसत हसत ती कॉलेज कडे
धावली. मधेच थांबून तिने मागे पाहिले आणि अरविंदाला लाहान मुलीसारखी जीभ दाखवून ती पुन्हा हसत
हसत कॉलेज च्या नळाकडे धावत गेली.

अरविंदाला तो चिखलाचा गोळा हृदयावर लागला. तो तसाच एका हाताने धरून तो अनिकेत कडे पाहत
होता. अनिकेत ने हुश्श केले आणि नळाकडे बोट दाखवून म्हणाला "चला, चिखल साजरा करूया"

-- तुषार जोशी, नागपूर

No comments: