चला पावसात, चला पावसात
आज थोडे हरवूया
घर तर नेहमीचेच
जरा , आज रस्ता विसरु या..
चला पावसात , चला पावसात
आज थोडे खेळूया
मोठेपण तर नेहमीचेच
जरा , आज लहान होऊ या..
चला पावसात , चला पावसात
आज थोडे रडूया
सुखाचे नाटक तर नेहमीचेच
जरा , आज चेह-याचा रंग उतरवू या..
चला पावसात , चला पावसात
आज थोडे हसूया
मुखवटे तर नेहमीचेच
जरा , आज स्वत:ला भेटू या..
चला पावसात , चला पावसात
आज थोडे नाचूया
सरळ चालणे तर नेहमीचेच
जरा , आज बेधुंद डोलू या..
चला पावसात , चला पावसात
आज थोडे भिजूया
खारट पाणी तर नेहमीचेच
जरा , आज मदिरा नभीची चाखू या..
चला पावसात , चला पावसात , चला..
- स्वप्ना
No comments:
Post a Comment