आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, September 08, 2009

जाहला बराच वेळ...

गझलाकार: 

गझल : जाहला बराच वेळ...

जाहला  बराच  वेळ, हात आपले  अता  सुटायला  हवे,
थांबले  असेल  दु:ख  एकटे  घरी, मला  निघायला  हवे..

जाणवेल  रे  कशी  घरास  त्याशिवाय  पावसातली  मजा?
दु:ख  कोठलेतरी  छतामधून  सारखे  गळायला  हवे...

केवढ्या  बधीर  होत  चालल्यात  जाणिवा  सुखामुळे  अता,
शल्य टोकदार  कोणतेतरी  कुठेतरी  रुतायला  हवे..

या  घरातही  जुन्या  घरातली  तशीच  सोय  पाहिजे  मला-
मी  जिथे  बसेल  त्यातिथून  चांदणे  मला  दिसायला  हवे

अर्थ  आजकाल  वेगळेच  का  निघावयास  लागले  बरे?
शब्द शब्द  यापुढे  मला  जरा  जपून  वापरायला  हवे..

स्नेह  केवढा  मनात  यास  फारसे  महत्व  राहिले  कुठे..
'स्नेह  केवढा!' असे  समोरच्यास  फक्त  भास  व्हायला  हवे.

देश  चालला  किती  पुढे ! फुगीर  आकडे  नकाच  दाखवू
फक्त  येथल्या  चुलीचुलीत  अन्न  रोजचे  शिजायला  हवे..

शेवटी  गुपीत  ते तुझे  तसेच  राहणार  यापुढे  सदा,
जे  विचारताच  तू  म्हणायचीस- "तूच  ओळखायला  हवे"

मी  तुला  म्हणायचो  'असे  करू  नको, तसे  करू  नको' जणू-
घाट  बोलतो  नदीस, 'पायरी  बघून  तू  वहायला  हवे.'

भेट आपली  पुन्हा  घडेल  ना  घडेल, ती  नकोच  काळजी
हे  ऋणानुबंध  नेहमी  तुला  असेच  आठवायला  हवे...

काय  साधणार  ते  कुलूप? या  घरामधे  रहायचा  कवी
आत  केवढेतरी  भुयारही  असेल, ते  बुजायला  हवे !


Saturday, September 05, 2009

व. पु. प्रेमींसाठी...



व. पु. प्रेमींसाठी...
 
चांदणं चांदणंच असतं. त्याला ग्रेड्स नाहीत. डिग्री नाही. डिग्री नाही म्हणुन अहंकार नाही. म्हणुनच गोंगाट नाही. ते नम्र असतं. उन्हाप्रमाणे चांदण्याजवळ तरतमभाव नाही. ते जितकं प्रखर, तितकं सौम्य. चंद्राइतकं औदार्य माणसांना मिळवता येईल का? अमावस्येला स्वत:चं अस्तित्वही न दर्शवण्याचा निरहंकार फ़क्त चंद्रासारख्या महान ग्रहाजवळच असू शकतो!
माणसं चंद्रासारखी शीतल का होत नाहीत? एकच कारण.
ती चंद्राची उपेक्षा करतात. रात्री झोपा काढतात. एका चतुर्थीत सगळं देणं चुकवतात. त्यातही भक्ती किती? आणी अहंकार किती?
उपवास करणार्यांचा परिवारावर एक अनामिक पगडा असतो. दडपण असतं. चंद्राची शीतलता उचलणं हेच व्रत. त्याच्या शीतलतेचं अनुकरण केलं तर घरात चांदणं पहुडेल.
पण त्या शीतलतेशी घनिष्ठ मैत्री हवी. ती झोपून कशी मिळणार?
त्यासाठी हे असं चांदण्यांशी संधान जुळवलं पाहिजे.
समुद्रासारखा जीवही चंद्र दिसला की झेपावतो. मिठाला जागतो. मग माणसं अशी थंड का? ती शांत असतील तर उत्तम. पण ती थंड म्हणजे निर्विकार असतात. 


Friday, August 21, 2009

सांग माझी आठवण येइल का तुला ?


तू निघुन गेलीस
कळलेच नाही जाताना
जगच बदलेल माझे
कळले नाही तुझ्याकडे बघून हसताना……..

रडू नकोस  उगीच
चांगले नाही ते  जाताना
माझे रडणे राहूनच गेले
तुला सगळे समजावताना………

आभाळं  भरले आहे
अगदी जसे होते तु जाताना
पण आता तेही बरसत नाही
उगीचच कारण नसताना………

अजूनही  जातो त्याच  बागेत
रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते
सकाळी ती कोमेजताना…………

झालेच नाही आपले बोलणे
सगळा एकान्त असताना
आज सगळं सुचत जातय
एकटा कविता करताना………

माहीत  नाही पुन्हा  कधी भेटु
वेगळ्या  रस्त्यावर चलताना
अन जुळतील का आपल्या तारा
वेगळ्या जगात राहताना……

विषय  शोधावे लागतील  आता
संभाषण चालु असताना
सगळे तसेच राहील   का गं
पुन्हा एकत्र असताना………

शुन्यच आहे आयुष्य माझे
उणे तु असताना
धरलास का हात सांग  तु
सोडुनच जायचे असताना……

सोन्यासारखा  संसार करशील
दिल्या घरी नांदताना
सांग माझी आठवण येइल का तुला
ती बागेतली रातराणी फ़ुलताना……….

कवी: अद्न्यात
स्त्रोत : विरोप