गझल : जाहला बराच वेळ...
जाहला बराच वेळ, हात आपले अता सुटायला हवे,
थांबले असेल दु:ख एकटे घरी, मला निघायला हवे..
जाणवेल रे कशी घरास त्याशिवाय पावसातली मजा?
दु:ख कोठलेतरी छतामधून सारखे गळायला हवे...
केवढ्या बधीर होत चालल्यात जाणिवा सुखामुळे अता,
शल्य टोकदार कोणतेतरी कुठेतरी रुतायला हवे..
या घरातही जुन्या घरातली तशीच सोय पाहिजे मला-
मी जिथे बसेल त्यातिथून चांदणे मला दिसायला हवे
अर्थ आजकाल वेगळेच का निघावयास लागले बरे?
शब्द शब्द यापुढे मला जरा जपून वापरायला हवे..
स्नेह केवढा मनात यास फारसे महत्व राहिले कुठे..
'स्नेह केवढा!' असे समोरच्यास फक्त भास व्हायला हवे.
देश चालला किती पुढे ! फुगीर आकडे नकाच दाखवू
फक्त येथल्या चुलीचुलीत अन्न रोजचे शिजायला हवे..
शेवटी गुपीत ते तुझे तसेच राहणार यापुढे सदा,
जे विचारताच तू म्हणायचीस- "तूच ओळखायला हवे"
मी तुला म्हणायचो 'असे करू नको, तसे करू नको' जणू-
घाट बोलतो नदीस, 'पायरी बघून तू वहायला हवे.'
भेट आपली पुन्हा घडेल ना घडेल, ती नकोच काळजी
हे ऋणानुबंध नेहमी तुला असेच आठवायला हवे...
काय साधणार ते कुलूप? या घरामधे रहायचा कवी
आत केवढेतरी भुयारही असेल, ते बुजायला हवे !
No comments:
Post a Comment