तुटले
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बाकी सारे आकार, उकार, होकार, नकार...
मागे पडत चाललेल्या स्टेशनांसारखे
मागे मागे जात जात पुसटत चालले आहेत...
पुसत जावेत ढगांचे आकार
आणि उरावं एकसंध आभाळ, तसा भूतकाळ
त्याच्या छातीवर गवताची हिरवीगार कुरणं,
भरून आलेली गाफील गाणी, काळेसावळे ढग
आणि पश्चिमेच्या वक्षाकडे रोखलेले बाणाकृतीतील बगळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
बंध रेशमी तुझ्यासवे जे जुळले
अन् क्षितिजावर रंग नवे अवतरले
घन दाटताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले...तुटले....
विसरत चाललोय... नावेतून उतरताना आधारासाठी धरलेले हात
विसरत चाललोय होडीची मनोगते, सरोवराचे बहाणे,
वा नावेला नेमका धक्का देणारी ती अज्ञात लाट
ती लाट तर तेव्हाच पुसली... मनातल्या इच्छेसारखी
सरोवर मात्र अजूनही तिथेच...
पण त्याच्याही पाण्याची वाफ किमान चारदा तरी आभाळाला भिडून आलेली
आता तर लाटा नव्हे, पाणी सुद्धा नवंय कदाचित
पण तरीही जुन्याच नावाने सरोवराला ओळखतायत सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
क्षण दरवळत्या भेटींचे, अन् हातातील हातांचे
ते खरेच होते सारे..वा मृगजळ हे भासांचे
सुटलेच हात आता मनात हे प्रश्न फक्त अवघडले...तुटले...
तुझ्याकडे माझी सही नसलेली एक कविता...मीही हट्टी...
माझ्याकडे तुझ्या बोटांचे ठसे असलेली काचेची पट्टी
चाचपडत बसलेले काही संकेत, काही बोभाटे...अजूनही...
थोडेसे शब्द, बरंचसं मौन...अजूनही...
बाकी अनोळखी होऊन गेलो आहोत...
तुझा स्पर्श झालेला मी, माझा स्पर्श झालेली तू...
आणि आपले स्पर्श झालेले हे सगळे...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
मज वाटायाचे तेव्हा हे क्षितिजच आले हाती
नव्हताच दिशांचा दोष, अंतरेच फसवी होती...
फसवेच ध्यास फसवे प्रयास आकाश कुणा सापडले...तुटले...
उत्तरे चुकू शकतात, गणित चुकत नाही...
पावले थकू शकतात, अंतरे थकत नाहीत...
वाळूवरची अक्षरं पुसट होत जातात..
डोळ्यांचे रंग फिकट होत जातात..
तीव्रतेचे उग्र गंध विरळ होत जातात..
शेपटीच्या टोकावरचे हट्ट सरळ होत जातात..
विसरण्याचा छंदच जडलाय आताशा मला..
या कवितांना, शहरभर पसरलेल्या संकेतस्थळांना...
विसरत चालल्या आहेत..पत्ता न ठेवता निघून गेलेल्या वाटा..
विसरत चालले आहे तळ्यावर बसलेले पश्चिमरंगी आभाळ..
अन् विसरत चालले आहे...
आभाळही गोंदायला विसरणारे हिरवेगर्द तळे
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
मी स्मरणाच्या वाटांनी वेड्यागत अजून फिरतो
सुकलेली वेचीत सुमने, भिजणारे डोळे पुसतो...
सरताच स्वप्न अंतास सत्य हे आसवांत ओघळले...तुटले...
आता आठवतायत ते फक्त काळेभोर डोळे...
-- संदीप खरे
No comments:
Post a Comment