स्थळ
एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी "स्थळ' या वेगळ्याच अवस्थेत पोचतात, तेव्हा पालकांची लगीनघाई सुरू होते. अशा वेळी मात्र हा पोटचा गोळा विचित्रपणे वागायला लागतो. त्याची उत्तरं पालकांना अधिकाधिक त्रासदायक ठरू लागतात. ........
लग्न न झालेल्यांना "लग्न कर, लग्न कर'...म्हणून मागे लागणारे असंख्य असतात. अगदी जवळची मंडळी सोडाच; पण तोंडओळख असलेली- क्वचित तीही नसलेली- मंडळी गंभीर चेहऱ्यानं..." काय... अपेक्षा काय आहेत तुमच्या? नाही...म्हणजे आमच्या ओळखीत कोणी असेल तर सांगते... सगळं कसं वेळच्या वेळी झालं म्हणजे आपलं बरं असतं.'
आता हे "वेळच्या वेळी' आणि "सगळं' होणं प्रत्येकासाठी निरनिराळं असू शकतं याची त्या "सुचवणाऱ्या व्यक्तीला' कल्पना नसते. समोरचा अविवाहित आहे म्हणजेच त्याला आपल्या मदतीची प्रचंड गरज आहे, असा भाव आपोआप अशा महाभागांच्या चेहऱ्यावर येतो. समोरच्या पार्टीतले "उपवर' निराळ्याच जगात असतात. आपल्याला आता "स्थळं' यायला लागली म्हणजे आपण जगातले एक, किंबहुना एकमेव महत्त्वाचे व्यक्ती झालो असं त्यांना वाटायला लागतं.
या उपवर मंडळींमध्ये विविध प्रकार असतात. काही जण लग्नाचे प्रश्न आल्यावर इकडेतिकडे बघायला लागतात. म्हणजे लग्न करायचं तर असतं; पण त्याबद्दल लोकांशी सोडाच पण स्वतःशीही संवाद झालेला नसतो. काही जण आई-वडिलांची पसंती असेल तर माझाही होकारच, असं बाणेदारपणे सांगतात. अर्थात लग्न नेमकं का करायचं आहे, आणि सहचरी नेमका कसा हवा आहे, आणि त्यासाठी माझ्या पसंतीपेक्षा आई-वडिलांची पसंती महत्त्वाची का, याचा फारसा विचार झालेला असतो असं नाही.
काही जण तर निराळ्या जगात जगत असतात. अशांना त्या जगातून पृथ्वीतलावर आणण्याची कोणाचीच शामत नसते. साधारणतः ठरवून केलेल्या लग्नात नवरा-बायको एकमेकांना "अनुरूप' मिळावे अशी अपेक्षा असते. म्हणजे दिसणं, आर्थिक परिस्थिती, उंची, घरदार, जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या ठरतातच; पण एकीकडे चित्रपट बघताना, प्रेमविवाहाची संधी घेता आलेली नसताना, ठरवून केलेल्या लग्नात कोणीतरी अप्सराच किंवा हीरोच मिळणार आपल्याला... ही इच्छा - हट्ट धरून जगणारे, मुलं-मुली बघणारे कितीतरी वर्ष सहचरी शोधत राहतात.
विवाहविषयक घडामोडींमध्ये येणारे प्रसंग विशेष विनोदी असतात असं त्याबद्दल नंतर विचार करताना किंवा बऱ्याचदा त्या प्रसंगातून जात असतानाही अत्यंत विचित्र वाटून मनातून हसू यायला लागतं.
पालकांची परिस्थिती तर अडचणीचीच... पोटच्या गोळ्याला कितीतरी कष्टबिष्ट करून मोठं केलेलं असतं. आता आयुष्यातला हा महत्त्वाचा "टप्पा' आल्यावर हा "पोटचा गोळा' विचित्रच वागायला लागतो. धड उत्तरं देत नाही, लग्न करायचं की नाही हे धड सांगत नाही, करायचं तर मग कसं, कधी, कुणाशी हे दस्तुरखुद्द त्या गोळ्यालाही माहीत नसतं. त्यामुळे पालक उत्तमपैकी अडचणीत येतात.
प्रसंग एक - "मुलगा क्लिक झाला नाही...'(यावर समस्त पालक वर्ग निरुत्तर आणि हताश... असं कोणी कोणाला अचानक, एका भेटीत नाही क्लिकब्लिक होत... सवयीनं आवडायला लागतं माणूस... आमचे नाही संसार झाले? आता तुझे बाबा, नव्हतेच क्लिक झाले मला... पण झाला ना संसार! तोही सुखाचा म्हणता येईल इतपत!)
प्रसंग दोन - "माझ्या अपेक्षेत बसत नाही...'(...पण आधी तुम्ही कसे आहात हे तपासलंय का? आणि अपेक्षा काय तुमच्या? गोरी, सुंदर, एलआयसीत नोकरी? की अमेरिकेत राहणारा, जबाबदारी नसणारा? या अपेक्षांना काही खोल अर्थ आहे असं वाटतं?)
प्रसंग तीन - "तुम्हाला माझ्यासाठी "चांगला' मुलगा-मुलगी बघता नाही येत? "काहीही स्थळं' आणता...' (या प्रश्नाला पालक काय उत्तर देणार... भले... मग तुम्हीच बघा ना तुमच्यासाठी सहचरी... ते नाही जमलं... आता आम्ही आणतो आहोत स्थळं, बसतो आहोत वही- पेन घेऊन प्रत्येक वधू-वर सूचक केंद्रात... आणि वर हे ऐकायचं...)
प्रसंग चार - माझं मी बघेन ! (कधी? तोवर अशा वाढत्या वयाची मुलगी, मुलगा आम्ही बघत राहायचं? हातावर हात टाकून? आणि तुमचं तुम्ही बघण्यासाठी काही प्रयत्न करताना दिसत नाही ...)
प्रसंग पाच - माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही (हे काय नवीन? मग आता तू काय करणार अख्ख्या आयुष्याचं आणि तोवर आम्ही काय करायचं?)
प्रसंग सहा - मला नाही आवडत ही "बघाबघी!' (मग आपापलं बघा...तेही नाही...मग प्रश्नाचं उत्तर काय? बघाबघीला पर्याय काय?)
प्रसंग सात - मला मुलं नको आहेत. मुलं नको असणारा मुलगा-मुलगी हवी आहे... (मुळात लग्नाचं प्रयोजन हे प्रजोत्पादन असतं अशी आपली आमची समजूत... म्हणजे आमच्या वेळी तरी असं होतं... समोर आलेला उपवर-वधू आपल्याला दोन-चार कच्चीबच्ची देणार अशी खात्रीच असायची.)
प्रसंग आठ - मला एकत्र राहायचं नाही... किंवा सासू सासऱ्यांबरोबर राहायचंच आहे... असंच "स्थळ' हवं. (या गोष्टी आपल्या हातात फार कमी वेळा असतात मुलांनो... माणसांना "डिलीट' करणं तसं अवघड असतं. विशेषतः त्याच्या-तिच्या आई वडिलांना... आणि त्यांच्याबरोबर राहणं... त्याचाही आग्रह कसा बरं धरता येईल? जरा "समजुतीनं' विचार करा...)
प्रसंग नऊ - मुलगा-मुलगी दिसायला आवडले नाही - (आपले केस पांढरे झालेत, चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यात... "लग्नाच्या बाजारात' आपण जुनी खोडं झालो... स्थळंही कमी यायला लागलीत... येतात ती अशीच... जरा मोठ्या वयाची... हेही जरा पाहिलं तर? बाळांनो, तुमचाही कोवळेपणा संपला आता... मग त्याची अपेक्षा ठेवून कसं चालेल? समोरच्यालाही तुमच्याकडून काही अपेक्षा असतीलच ना!)
प्रसंग दहा - वेव्हलेन्थ जुळेल असं वाटत नाही... (ती लग्नानंतर तशीही जुळत नाही... आधी जुळत असेल तर नंतर विशेष तुटते... त्यामुळे हा मुद्दा गौण आहे... गमतीचा भाग सोडा... पण कोणाही दोन माणसांचं सतत नाहीच जुळत... आणि त्या व्यक्तीला चार वेळा भेटून हे सांगितलंत तर जरा पटेल तरी... एकाच भेटीत... ठाम नकार?)
प्रसंग अकरा - अजून मी मानसिकरीत्या लग्नाला तयार झालो - झाले नाही - (कधी होणार? इतका मोठा झालास... बाकी सगळी अक्कल आली... पण जबाबदारी नकोय तुला? तुझं मानसिक वय मात्र... इथे पालक टोटल हताश... कारण आपल्या बालकाचं मानसिकरीत्या वय वाढण्यासाठी काय करायचं ते माहीत नाही...)
या साऱ्या प्रसंगात अजून एक पात्र असतं... त्याशिवाय लग्न ठरवणे या प्रक्रियेत नाट्यमयता येऊच शकत नाही. त्या पात्राचं नाव "पत्रिका!' याशिवाय लग्न ठरवणं, ठरणं जवळजवळ अशक्य. अरेन्ज्ड मॅरेजमध्ये अगदी नांदीपासून ते पडदा पडेपर्यंत पत्रिका मुख्य भूमिकेत असते. किती गुण जमले. वैवाहिक आयुष्य कसं जाईल... इथपासून ते पुत्र योग आहेत की नाही, काही अमंगल तर नाही ना होणार इथपर्यंत विविध विषयांवर भाष्य करता येतं, ते पत्रिकेच्या मदतीनंच. "बघण्याच्या कार्यक्रमात' मुलगी-मुलगा आवडला नाही, तर मग अचानक नंतर "त्या' नकार देणाऱ्या पार्टीला कारण मिळतं... पत्रिका जुळत नाही... आम्ही "आमच्या खास गुरुजींना' दाखवली... पण नाही जुळत... योग नाहीत आपले असं वाटतं... संपलं... पुढे काहीही सांगण्यासवरण्याची गरजच नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघेही समजून जातात. याउलट आवडलेल्या मुलीसाठी-मुलासाठी "जुळणारी' पत्रिका बनवून घेणारेही असतातच. तर मुद्दा हा, की अरेन्ज्ड मॅरेजसाठी "स्थळ' म्हणून "उभे' असाल तर या पत्रिकेचं तेवढं निभावून घ्यायला शिकायला हवं.
असे विनोदी वाटणारे; पण प्रत्यक्षात डोळ्यात पाणी आणणारे प्रसंग खूप आहेत. प्रत्येक घरातले निरनिराळे. पाल्याचं लग्न करणं म्हणजे पालकांची अक्षरशः लढाई. घरात पाल्याशी, आणि बाहेर..."अनुरूप!' निवडण्याची. अशा समस्त पालकांप्रति सहानुभूती आणि पाल्यांना "स्वओळख' व्हावी. लवकरात लवकर व्हावी ही सदिच्छा!
स्त्रोत : ई-पत्र
No comments:
Post a Comment