वणवा
जोगवा मी वेदनेचा मागतो आहे
जीव पाषाणावरी मी लावतो आहे
होय, सर्वांशी जरी ती बोलते हसुनी
स्वर्ग सूताने तरीही गाठतो आहे
तीच फुंकर घालते अन् तीच मग पुसते
"रात्रभर वणवा कशाने पेटतो आहे?"
वाहते निष्ठाफुले चरणी दुज्याच्या ती
अन् उरी निर्माल्य मी कवटाळतो आहे
व्यसन दु:खाचे मला आहे असे जडले
भंगण्यासाठीच हृदया सांधतो आहे
काय त्या हृदयास जपणे ती जिथे नाही?
रिक्त गाभारा जणू सांभाळतो आहे
मार्ग जेव्हा वेगळे झालेत दोघांचे
पारिजाताचा सडा का सांडतो आहे?
कोरडे डोळे निरोपाच्या जरी वेळी
चेहऱ्याला मेघ पण आच्छादतो आहे
विखुरलेले स्वप्नमोती वेचुनी काही
आठवांच्या 'भृंग' माळा ओवतो आहे
No comments:
Post a Comment