आपल्या काळात इमारतींची उंची वाढली
पण माणूसकीची कमी झाली का ?
रस्ते रूंद झाले पण दृष्टी अरूंद झाली का ?
खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली
घरं मोठी पण कुटुंब छोटी..
सुखसोयी पुष्कळ , पण वेळ दुर्मिळ झाला
पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग
माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले
तज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या
औषधं भरपूर पण आरोग्य कमी झालं
मालकीची भाषा वाढली ,मूल्यांची कमी झाली
आपण बोलतो फार...प्रेम क्वचित करतो.. आणि तिरस्कार सहज करतो
राहणीमान उंचावलं पण जगणं दळभद्री झालं
आपल्या जगण्यात वर्षांची भर पडली , पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही
आपण भले चंद्रावर आलो गेलो
पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही
बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत
पण आतल्या हरण्याचं काय ?
हवा शुद्ध करण्यासाठी आटापिटा
पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय ?
आपली आवक वाढली पण नियत कमी झाली
संख्या वाढली पण गुणवत्ता घसरली
हा काळ उंच माणसांचा पण खुज्या व्यक्तीमत्वांचा
उदंड फायद्याचा पण उथळ नात्यांचा
जागतीक शांततेच्या गप्पांचा
पण घरातल्या युद्धांचा
मोकळा वेळ हाताशी पण त्यातली गंमत गेलेली
विविध खाद्यप्रकार पण त्यातली सत्व गेलेली
दोन मिळवती माणसं पण त्यांचे घटस्फोट वाढलेले
घरं नटली पण घरकुलं दुभंगली
दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलं
पण कोठीची खोली रिकामीच
हे पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवणारं तंत्रज्ञान आज आहे
पण आज आहे तुमचं स्वातंत्र्यही
या पत्राकडे लक्ष
देण्याचं किंवा न देण्याचं
यातलं काही वाटलं तर बदला किंवा विसरून जा
कवी : दलाई लामा
अनुवाद : शोभा भागवत
No comments:
Post a Comment