आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Wednesday, July 04, 2007

आलिया भोगासी -

"जा आतं, डॉक्टरांनी बोलावलय."

अतिशय सुतकी अशा वातावरणाच्या डॉक्टरांच्या केबिनबाहेरच्या जागेत बसलेलं असताना आपल्याला हाक ऐकू येते। डॉक्टरांच्या केबिनबाहेरची जागा ही तिथे आलेल्या कोणत्याही व्यक्तिला चुकुनही प्रसन्न वाटू नये याची तंतोतंत काळजी घेऊन बनवलेली असते. तिथे नेहमी उदास-भकास असं वातावरण असतं. जागोजागी "शांतता राखा", "कृपया पादत्राणे येथे काढावी", "खुर्चीत बसण्याची योग्य पद्धत" असे कुठली ना कुठली शिस्त शिकवणारे फलक लावलेले असतात. उजेड, हवा असल्या गोष्टी तर निषिद्धच असतात. प्रकाशापेक्षा अंधाराची जाणिव करुन देणारे मंद असे दिवे असतात. वाचायला म्हणुन चार एक वर्षापूर्वीचे काही मासिकांचे अंक असतात. आपण जर १-२ वेळा आधी पण त्याच डॉक्टरकडे गेलो असलो तर ते सगळं आपलं आधिच वाचुन झालेलं असतं. त्याला कंटाळुन आपण इतरत्र भिंतीवर लावलेली पत्रकं जर वाचायला गेलो तर त्यावर कुठल्या कुठल्या महाभयंकर रोगांची "ठळक" लक्षणं लिहीलेली असतात. आजुबाजुच्या उदास वातावरणामुळे त्यातली काही लक्षणं आपल्याला झाली आहेत असं उगाचच आपल्याला वाटायला लागतं. अहो अशा ठिकाणी आजारी तर सोडाच, त्याला घेउन आलेल्या धडधाकट माणसालाही आपल्याला काहीतरी झालं आहे असं वाटायला लागतं. किंबहुना ही पत्रकं लावण्यामागे अजुन काही पेशंट मिळवण्याचं षङयंत्र असावं अशी माझी आपली एक शंका आहे. हे सगळं तर केबिनच्या बाहेर, केबिनच्या आत गेल्यावर कोणत्या दिव्यांतुन जावं लागेल हे मात्र आत कोणत्या प्रकारचा डॉक्टर आहे यावर अवलंबुन असतं.

आपण जर "जनरल फिजिशीयन" असं संबोधल्या जाणार्या व्यक्तिकडे गेलो तर त्यांचं वर्तन एखाद्या सरावलेल्या भटजीसारखं असतं. ठरलेले सोपस्कार पार पडल्याशिवाय ते मुख्य गोष्टीकडे वळतंच नाहीत. भटजी जसे कोणतंही कार्य असलं तरी चौरंग, तांब्या, नारळ, सुपारी, विड्याची पानं याची मनासारखी रचना केल्याशिवाय मुख्या कार्याकडे वळत नाहीत तसेच हे डॉक्टर. त्यांच्याकडे जाउन आपण सांगितलं की "डॉक्टर, जरा गुडघा दुखतो आहे."
आपल्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन त्यांचं सुरु होतं ...
"बसा. जीभ बघु (!!). मोठ्ठा आ करा थोडा अजुन. हं .. डोळे पाहू."
"अहो पण तो गुडघा .." आपण क्षीण आवाजात अजुन एकदा प्रयत्न केला तरी डॉक्टरांना ते ऐकू जात नाही कारण तोपर्यंत त्यांनी कानात स्टथोस्कोप घातलेला असतो. तो स्टथोस्कोप आपल्या पोटावर लावुन "श्वास घ्या....सोडा...परत घ्या.....मोठ्याने घ्या जरा" असे प्राणायामाचे धडे आपल्याला दिले जातात. पोटाने त्यांचं समाधान झालं नाही तर पाठीवर पुन्हा तेच. मग एक हात आपल्या पोटावर ठेवुन दुसर्या हाताने त्यावर गुद्दा मारुन काहीतरी ऐकल्यासारखं करतात. असं २-३ ठिकाणी करतात. या क्रियेतुन काय साध्य होतं ते मला आजतागायत कळलेलं नाही. त्यानंतर मग दोन्ही हातांनी आपलं पोट दाबुन घुसळल्यासारखं करतात "इथं दुखतंय ? ... इथं ?" असं विचारतात. पूर्वी एवढ्यावर सुटका व्हायची. आजकाल बी.पी. मोजायची पण फॅशन आहे. हे सगळं मनासारखं करुन झालं की मग विचारतात,
"हं, काय होतंय तुम्हाला?"
हे सुसह्यच म्हणावं लागेल, कारण हे डॉक्टर फक्त हात आणि स्टथोस्कोप या दोनच अवजारांचा वापर करतात। याउलट आपण जर डोळ्याच्या डॉक्टर कडे गेलो तर ते बाकी काहीही संभाषण न करता आधी आपल्या डोळ्यावर टॉर्च मारतात. आता मला सांगा, कोणाच्या डोळ्यावर टॉर्च मारणे हे किती असभ्य वर्तन मानलं जातं? पण इथे असं करण्यासाठीच आपण त्यांना पैसे देतो ! त्यानंतर औषधाच्या नावाखाली आपल्या डोळ्यात २-३ गार पाण्याचे थेंब टाकुन आपल्याला डोळे बंद करुन बसायला सांगतात. त्याने म्हणे डोळे स्वच्छ होतात. मला तर वाटतं, आपल्याला डोळे बंद करायला सांगुन ते हळुच चहा वगैरे पिउन येत असावेत. डोळे उघडल्यावर ते आपल्याला एका मोठ्या मशीनसमोर बसवुन, एक कसलासा स्टॅंड आणुन आपल्याला त्या स्टॅंडवर हनुवटी ठेवुन बसायला सांगतात. मला त्या स्टॅंडवर हनुवटी ठेवुन बसलेला माणुस आणि शिरच्छेदाची शिक्षा झाल्यावर गिलोटीन का काय त्यात मान अडकवुन बसलेला माणुस यात खुप साधर्म्य वाटतं. त्यांचं छोट्या टॉर्चनी समाधान झालेलं नसतं म्हणुन ते मशीन आपल्या डोळ्याजवळ आणुन त्यातुन असुन प्रखर टॉर्च डोळ्यावर मारतात. मग खुप वेळ बघत बसतात, अधुन मधुन "डाविकडे बघा ... उजवीकडे बघा" असं म्हणुन आपण काहीतरी करतो आहे असं भासवतात. "हलु नका, स्थिर रहा ॥ मान सरळ ठेवा .. डोळे नका मिटू" असलंही काहीतरी बोलत असतात. अरे हलू कसलं नका ? काय फोटोसेशन चालू आहे? आणि उठसूट डोळ्यावर असे वेगवेगळे टॉर्च मारले तर चांगले डोळे असलेला माणुसही पुढच्या वेळी आंधळा होउन येइल. हाच त्याचा प्लॅन असणार. मला वाटतं लहानपणी ज्या मुलांना इतरांच्या डोळ्यावर टॉर्च मारुन विकृत आनंद मिळतो तिच मुलं पुढे जाउन डोळ्याचे डॉक्टर होत असतिल. स्वतःच्या छंदाचाच प्रोफेशन म्हणुन वापर करण्याचं याहुन चांगलं उदाहरण शोधुन सापडणार नाही.

आता याऐवजी जर तुम्ही "कांन-नाक-घसा" तज्ञ अशी पाटी असलेल्या खोलित शिरलात तर तिथं तिसरच काहीतरी चालु असतं. इशंही अपल्या नशिबातुन टॉर्च सुटत नाहीच. हे डॉक्टर सगळ्यात आधी आपल्या नाकाचा शेंडा पकडुन वर करतात. म्हणजे साधारणपणे वराह जातिच्या प्राण्याप्रमाणे आपलं नाक केल्यावर मग त्यात टॉर्च मारतात. नंतर मग घसा पहायच्या निमित्ताने ते जीभ बाहेर काढुन आपल्याला "आ" वासायला सांगतात.
"मोठा करा आ ... अजुन मोठा ... जीभ काढा अजुन बाहेर"
आपण जीभ अगदी मुळापासुन निघायच्या बेताला येईबर्यंत बाहेर काढली की मग परत टॉर्च मारतात. त्यांच्या एका डोळ्यावर आरसासदृश गोष्टही असते. अगदी त्यांचा डोळा आपल्या तोंडात जाईपर्यंत जवळ येउन काहीतरी निरीक्षण करतात. मग एक लोखंडाची लांब पट्टी आपल्या घशापर्यंत आत घालुन जीभ अजुन खाली दाबतात. या अनपेक्षित प्रकाराने आपण "ऑक-व्यॅक" असले काहीतरी आवाज काढले की त्यांचं समाधान होतं. मग लगेच "झालं झालं" असं आपलं सांत्वन करतात.

एकदा मी दुपारी "अगदी ओ येईपर्यंत" म्हणतात तसं जेवण केल्यावर या ENT कडे गेलो होतो। नेहमाचे सोपस्कार सुरु झाले. आधीच माझ्या खुप घशाशी येत होतं. त्यातुन तो डॉक्टर माझ्या अगदी समोर बसुन या कसल्या कसल्या लोखंडी पट्ट्या माझ्या घशात घालंत होता. खरं तर त्यावेळी त्याचे सगळे दात त्याच्याच घशात घालायची इतकी तीव्र इच्छा झाली होती की काय सांगु. या सगळ्या गोंधळात माझ्या घशातल्या अन्नावरचा ताबा सुटला असता म्हणजे!!?? पण नाही ! त्याला माझ्या पडजीभेची काळजी "पडलेली"! माझी पडजीभ मनसोक्त पाहुन होईपर्यंत त्याने काही मला सोडलं नाही. बाका प्रसंग थोडक्यात निभावला म्हणायचं.

यानंतर उरतो कान, तिकडे यांचा मोर्चा वळतो. त्याचं पण टॉर्चनी निरीक्षण करुन झालं की त्यात काय काय द्रव्य ओततात, का? तर म्हणे कान साफ करायला. एकदा तर एका पेशंटचा कान साफ करायत्या बहाण्याने त्या डॉक्टरनी एक छोटाशी पिचकारी घेउन चक्क कानात पाण्याचा फवाराच मारला! उगाच काहीतरी क्लिष्ट नाव असलं तरी ती मुळात होती पिचकारीच. अरे माणसाच्या कानाचे अंतरंग म्हणजे काय रंगपंचमी खेळायची जागा आहे का?!

एखाद्याच्या खाजगी बाबतीत इतरांनी लक्ष घालु नये असा साघा सर्वमान्य शिष्टाचार आहे. माणसाचे कान-नाक-घशाचे अंतर्गत ही किती खाजगी गोष्ट आहे. पण हे लोक अगदी टॉर्च मारुन मारुन त्यात बघतात. इतकं "उच्च" शिक्षण घेउनही यांना इतके साधे शिष्टाचार माहित नसावेत ही फार लज्जस्पद गोष्ट आहे.

देव न करो पण कधी तुम्हाला दंतवैद्यक शास्त्राचं शिक्षण घेतलेल्या व्यक्तिकडे जायची वेळ आलीच तर तयारी असावी म्हणुन सांगतो। तिथे गेल्यावर आपल्याला एक मोठ्ठी आरामखुर्चीसारखी खु्र्ची दिसते. आपल्याला वाटतं "व्वा! आपल्या आरामाची केवढी सोय!" पण प्रत्यक्षात ती खु्र्ची म्हणजे आपल्याला अडकवण्यासाठी रचलेला एक सुंदर सापळा असतो. त्यावर आपण बसलो रे बसलो की वरुन एक मोठ्ठा प्रकाशाचा झोत आपल्या तोंडावर पडतो. मग चहोबाजुंनी असख्य ट्रे बाहेर येतात. त्यावर हातोडी(!), पक्कड (!?), ड्रिल (!!!) अशी वाट्टेल ती अवजारं (आणि हत्यारं) असतात. दात काढायचा असेल तर एक माणूस आपलं डोकं पकडुन ठेवणार आणि डॉक्टर भिंतितुन खिळा उपटावा तसा पक्कडिने आपला दात उपटणार असलं महाभयंकर दृश्य बघायला मिळते. दर दोन मिनिटांनी कसल्याशा पिचकारीने तोंडात पाणि मारुन आपल्याला चुळ भरायला सांगतात. इथे प्रसग काय, हे सांगतात काय, काही विचारू नका. दातातल्या फटी बुजवायला ते ज्या कौशल्याने सिमेंट भरतात की त्याची तुलना एखाद्या गवंड्याशीच होऊ शकते. फरक एवढाच की सिमेंट सरळ बसले आहे की नाही ते बघायला हे आपल्या तोंडात कोळंबा सोडत नाहीत.

या सगळ्याव्यतिरीक्त आजकाल एक नवीन प्रकार प्रचारात आहे, Overall Checkup, किंवा संपू्र्ण तपासणी. त्यात हजारेक प्रकारच्या चाचण्या असतात, आणि प्रत्येक चाचणासाठी हे लोक आपलं रक्त शोषतात, अक्षरशः !
त्या रक्तपिपासु लोकांचा तर कथाच निराळी. मी एकदा अशा चाचणीसाठी एका ठिकाणी गेलो होतो. तिथल्या माणसाने फार उत्साहाने एक इंजेक्शन माझ्या दंडाच्या खालच्या भागात खुपसलं. बराच वेळ त्यात काही येईचना.

तो - "काय हो, तुमच्या शरिरात रक्ताची फारच कमतरता दिसते! .. हॅ हॅ हॅ"

मी - "तुमच्यासारख्या ड्रॅक्युलाकडे सारखं जाउन दुसरं काय होणार? अजुन फार तर एक-दोन वेळा टिकेन, त्यानंतर भुसा भरुन प्राणिसंग्रहालयातच ठेवायची वेळ येणार आहे."

माझ्याकडुन अशा उत्तराची अपेक्षा नसल्याने तो थोडा वरमला. चौकशीअंती असं कळलं की तो डॉक्टर नविन होता आणि त्याला माझी नसंच सापडत नव्हती. ते ऐकल्यावर शेजारच्या सिनियर डॉक्टरनी त्याला शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या ह्या प्रयोगाचा गिनीपीग मीच! त्या गुरू-शिष्यांचा प्रेमळ संवाद चालु असेपर्य़ंत सुई साझ्या अंगात खुपसलेलीच होती. त्यानंतर, पलंगाखाली गेलेली गोष्ट काढायला त्याखाली हात घतल्यावर काहीही दिसत नसतांना आपण ज्या प्रकारे वाट्टेल तसा हात फिरवुन चाचपडुन बघतो, तसा तो त्या इंजेक्शनची सुई माझ्या अंगात इकडे तिकडे खुपसुन बघत होता. माझ्या नशीबाने ती नस एकदाची सापडली आणि माझं वजन थोडं कमी करुन तो निघुन गेला.

हे सगळे अनुभव घेतल्यावर तर हाडाचे, मेंदुचे, ह्रदयाचे मोठमोठे डॉक्टर काय करत असतिल याची कल्पनाही न केलेली बरी. या सगळ्यातुन तारुन न्यायला देवाने एकच गोष्ट आपल्याला दिली आहे, ती म्हणजे संयम आणि कदाचित त्यामुळेच रुग्णाला इंग्रजीत पेशंट असं म्हणत असावेत. नुसती लक्षणं ऐकुन आणि नाडी तपासुन योग्य औषघ देणारे, हलक्या हाताने इंजेख्शन देणारे डॉक्टर पत्रिकेतच असाबे लागतात. हे भाग्य फार थोड्या पुण्यावानांना मिळतं. बाकी आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी संतांनी भविष्य जाणुन आधीच सोय करुन ठेवलेली आहे,

आलिया भोगासी, असावे सादर!

--प्रतीक्षा

No comments: