आजचा विशेष

श्री स्वामी समर्थ

आजचा सुविचार : जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण....

मराठी साहित्य संग्रहाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

देवा एकच मागणी
तिची पापणी भरु दे
माझ्या नावाचा एकच थेंब
तिच्या नयनी तरु दे

-- आनंद काळे


बालभारतीच्या कविता आनंदक्षणवर वाचण्यास मिळाव्यात, या वाचकांच्या विनंतीला मान देऊन पुढील काही पोस्ट या बालभारतीच्या निवडक आणि आवडत्या कवितांच्या असतिल.

Tuesday, March 23, 2010

आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...


आयपीएल, पुणे टीम आणि पुणेरी पाट्या ...

शेवटी येणार येणार म्हणता पुण्याची 'आय पी एल टीम' आली.
आता आम्ही वाट पहातो आहे ती टीमच्या नावाची आणि त्यातल्या खेळाडुंची.
ते येईल तेव्हा येईल पण एक (भविष्यातले) पुणेकर ह्या नात्याने आम्ही काही "पुणेरी पाट्या" लागोलाग तयार करुन ठेवत आहोत, पुढे त्याची अर्थातच गरज पडेल ह्याविषयी आमच्या मनात अजिबात संदेह नाही.

*
ह्या पाट्या आहेत त्या 'मैदानावरच्या' .....
. सामन्याची वेळ तुमच्या तिकिटावर छापलेली आहे, उगाच कधीही येऊन गर्दी करु नये.
. सामन्याच्या वेळेच्या आधी ३० मिनिटे मैदानात प्रवेश दिला जाईल, तुम्ही गडबड केल्याने सामना लवकर सुरु होणार नाही.
. खुर्चीचा वापर फक्त बसण्यासाठीच करावा ... एका खुर्चीवर एकच !
. मैदानात पिण्यासाठी (साध्या) पाण्याची व्यवस्था केली आहे, थंड तसेच फिल्टर्ड पाणी आपण दिलेल्या तिकिटाच्या पैशात मिळणार नाही, उगाचच आयोजकांकडे हट्ट धरु नये.
. मैदानावरचे कॅमेरे हे सामन्याच्या हालचाली टिपण्यासाठी आहेत, उगाच हिडीस चाळे करुन त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करु नये.
. आपण पुण्यासारख्या एका सुसंस्कृत शहरात एका सार्वजनिक ठिकाणी सामना पहात आहोत ह्याचे भान ठेऊन चियरलिडर्सना खाणाखुणा करु नये किंवा त्यांच्याकडे डोळे फाडुन बघुन लाज आणु नये. अश्लील चाळे कराल तर नुसतीच पोलीस कारवाई नाही तर धिंड काढण्यात येईल.
. फुंके ( सिगारेट, बिड्या, चिलीम ), थुंके ( तंबाखु, गुटका, मावा, पान ) आणि शिंके ( तपकीर आणि स्वाईन फ्ल्युग्रस्त ) ह्यांना मैदानात मज्जाव.
. मैदानात दारु विक्री केली जात नाही, मैदानात दारु पिऊ दिली जात नाही, मैदानात बाहेरुन दारु पिऊन आल्यास प्रवेश मिळणार नाही.
. मैदानात विकत मिळणार्या खाद्यपदार्थांची आवरणे, पिशव्या तसेच पाणी किंवा शितपेयाच्या बाटल्या मैदानात फेकु नयेत, बाटलीवरुन खेळाडु घसरुन पडुन जखमी होऊ शकतो ह्याची किमान जाण ठेवावी.
१०. सामन्याच्या वेळी खेळाडुंना पाठिंबा देताना हळु आवाजात आरडाओरड करावी. हा क्रिकेटचा सामना आहे, तमाशाचा फड नव्हे !
११. अनोळखी वस्तुंना स्पर्श करु नये ... व्यक्तींसह !
१२. मैदानातील मोठ्ठे पंखे फक्त दुपारी आणि गर्दी असलेल्या ठिकाणीच लावण्यात येतील. पंख्याखाली बसण्यासाठी मोठ्ठ्या आवाजात भांडण करुन आयोजकांना त्रास देऊ नये.
१३. स्त्रियांचे स्वच्छतागॄह, खेळाडूंचे पॅव्हेलियन, चियरलिडर्स पोडियम, व्हीआयपी गॅलरी, पत्रकार कक्ष इत्यादी ठिकाणी उगाच जास्त घुटमळु नये.
14. सामन्यातील कसल्याही घटनेचा ( सामना हरणे, षटकार मारणे, धावबाद होणे, झेल टाकुन देणे वगैरे ) राग खुर्च्यांवर काढु नये.
15. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांचे खेडाळु, चियरलिडर्स, व्हीआयपी यांच्याबरोबर अथवा खेळपट्टी, पत्रकारकक्ष, समालोचन खोली, पॅव्हेलियन, व्हीआयपे बॉक्स इथे 'फोटु काढुन मिळणार नाहीत' किंवा त्याला परवानगी दिली जाणार नाही.
16. सामन्याच्या वेळेदरम्यान तुटलेल्या चपला, कापलेले खिसे, मोडलेला चष्मा, हरवलेली पर्स, गायब झालेला मोबाईल ह्यांची जबाबदारी आयोजकांकडे राहणार नाही. समोरच पोलीस स्टेशन आहे, तिकडे जाऊन तक्रार करावी.
17. हे पुणं आहे, शिमला नव्हे, उन्हाळ्यात गरम होणारच, पण म्हणुन मैदानात सामना पहायला शर्ट काढुन बसु नव्हे. अशा निर्लज्ज प्रेक्षकांना बाहेर काढले जाईल.
18. पाऊस पडल्यास पैसे परत मिळणार नाहीत, कॄपया हवामानखात्याशी सल्लामसलत करुन मगच तिकिट काढावे.
19. परदेशी खेळाडुंच्या अंगचटीला जाऊ नये तसेच त्यांना स्थानिक भाषेत गलिच्छ आणि अश्लील शिव्या देऊन वेडावुन दाखवु नयेत. ते आपले अतिथी आहेत, आपण घरात पाहुण्यांशी असे वागतो का ?
20. राजकीय नेते, सरकारी अधिकारी, स्थानिक दादा ह्यांचा वशिला लाऊन फुकट पास मागु नये. परवडत नसल्यास झाडावर चढुन सामना पहावा.
21. वरील सुचना ह्या चेष्टेचा विषय नव्हे ह्याची नोंद घ्यावी, ह्याची चेष्टा करणार्या प्रेक्षकांना संपुर्ण सामना संपोस्तोवर अंधार्या खोलीत बळजबरीने बसवुन ठेवले जाईल.

***
ह्या पाट्या आहेत त्या ' आयपीएल-पुणे संघाच्या कार्यालयातल्या" ....
. फक्त दिवसाचे सामने खेळले जातील, त्यातही दुपारी - असा विश्रांतीचा वेळ राखुन ठेवावा लागेल.
. रात्रीच्या सामन्याचा चार्ज वेगळा पडेल, कुठल्याही परिस्थीत रात्री वाजता सामना संपवण्याची जबाबदारी आयोजकांची राहिल, सवड मिळाल्यास उरलेला सामना दुसर्या दिवशी खेळता येईल.
. सोमवारी सुट्टी घेतली जाईल.
4. सर्व लोकांना जाहीर निवेदन देण्यात येते की "आयपीएल-पुणे संघ ( पुण्याचा अभिमान, महाराष्ट्राची शान ) " ही आमचा पुर्णपणे स्वतंत्र संघ असुन "मुंबई इंडियन्स, महाराष्ट्र" ह्या संघाशी आमचा कसलाही संबंध नाही. त्या संघाशी केलेल्या व्यवहाराची जबाबदारी केवळ तो मराठी आहे ह्या कारणाने घेतली जाणार नाही. तसेच त्या संघाच्याविषयी आमच्याकडे कसलीच चौकशी करु नये.
5. हा क्रिकेटचा संघ आहे. उगाच गाण्याच्या स्पर्धा, नाचकामाचे कार्यक्रम, पाणपोईचे उद्घाटन, नव्या दुकानाची चित्रफीत कापणे ह्या आणि अशाच इतर कामांसाठी खेळाडुंची चौकशी अथवा मागणी करु नये.
6. क्रिकेट हा एक खेळ आहे ह्याचे भान ठेवावे, आम्ही मॅचफिक्सींग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही.
7. देणग्या मागणारे, गौरवनिधी सामने आयोजीत करणारे, सर्व्हे करणारे, फुकटात जाहीरातीसाठी कार्यक्रमाला हजरी लावण्याची विनंती करण्याची शिष्ठमंडळे आदी तत्सम व्यक्ती किंवा संस्था ह्यांना सक्त प्रवेश बंदी आहे, ह्यात कोणत्याही कारणास्तव बदल होणार नाही.
8. आमचे प्रतिस्पर्धी संघ कमी किमतीत खेळत असल्याच्या बढाया आमच्यासमोर मानु नये. आमचे इथे क्वालिटीला प्राधान्य असल्याने कमी किमतीत सामना खेळवण्याचा विचार केला जाणार नाही.
9. आपण आमच्या खेळाबद्दल समाधानी असताल तर इतरांना सांगा, नसताल तर योग्य आणि सभ्य शब्दात आम्हाला सांगा, योग्य दखल घेतली जाईल.
10. आमचेकडे शाळकरी संघांना ट्रेनिंग दिले जात नाही
11. आमच्याशी ठरलेल्या करारानुसार सामना झाल्यावर आमच्याकडुन सदिच्छा म्हणुन खेळाडुंचे टी-शर्ट्स, ट्रॅक सुट्स, टोप्या, बॅटी, चेंडु अथवा तत्सम कुठलेही किमती सामान भेट मिळणार नाही. उगाच हावरटपणा करु नये.

स्त्रोत : विरोप आणि http://chhota-don.blogspot.com/2010/03/blog-post_22.html
लेखक : छोटा डॉन


Monday, January 25, 2010

दहाची नोट



ती दहाची नोट तेवढीच त्याची संपत्ती
दप्तराचा कप्पा
कप्प्यातली कंपास
कंपासमधलं कोनमापक
आणि कोनमापकाच्या खाली बंदोबस्तात घडी करून ठेवलेली दहाची नोट

शाळेला उशीर झालाच होता
घिसाडघाईत जेवण झालं
अर्धमुर्ध भरलं पोट
बॅगेत भरली दहाची नोट

प्रार्थना सुरू असतांना
धापा टाकत आला
मान खाली प्रश्नाला
आज उशीर का झाला?

अंदाज होताच त्याला कदाचित होईल आज शिक्षा
उर फुटेस्तोर धावत आला पण केली नाही रिक्षा

शिक्षा पूर्ण झाल्यावर
बसला जाऊन बाकावर
ना अपराधी वाटलं त्याला
ना राग होता नाकावर

पाठ चांगलीच दुखत होती ओणवं उभं राहून
कंपासमधली नोट तेवढ्यात हळूच घेतली पाहून

यांत्रिकतेने फळ्यावरचं वहीत उतरलं थोडं
मनात मात्र दौडत होतं दहा रुपयाचं घोडं

एका मागून एक तास सरत गेले
मधली सुट्टी झाली
नोटेपुढे भूकही विसरून गेली स्वारी

बाकाबाकावर दिसू लागले नानारंगी डबे
फेरीवाले, आईसफ्रूटवाले शाळेबाहेर उभे
पैसे होते खाऊचे लागेल ते घ्यायला
पण शेवटी शाळेतल्या नळाचंच थंड पाणी प्याला
भुकेलेल्या पोटात त्याच्या थंड पाण्याचा घोट
पण अजून शाबूत होती त्याची दहाची नोट

बाबांनीच सकाळी खाऊसाठी दिलेली
पाठोपाठ आईसुद्धा ऑफीसला गेलेली
कार्टून पाहून झालं आणि गृहपाठही झाला
नोट घट्ट मूठीत ठेवून तो झोपी गेला
इवल्याश्या पेंगुळलेल्या डोळ्यांनी पाहिलं घड्याळाला
उडाली झोप, गडबड झाली शाळेला उशीर झाला
धांदलीतच त्याचं मग आटोपलं सारं
तरीही काळजीपूर्वक त्याने लावून घेतली खिडक्यादारं
आठवणीने ठेवून चावी शेजारी आला
आणि धावतपळत धडपडत शाळेला निघता झाला

अशाप्रकारे आज
शिक्षा भोगली
भूक सोसली
बरेच काढले हाल
काय करणार अखेर सारा दहाच्या नोटेचा सवाल

मधली सुट्टी संपली पुन्हा तास झाले सुरू
चिमण्यांनी भरून गेले वर्गरूपी तरू
चिमण्याच त्या दिवसभर निरागस चिवचिवणार्‍या
कापसाच्या घरट्यातून अचानक आभाळात भिरभिरणार्‍या
त्याच्याही डोक्यात होताच की विचारांचा चिवचिवाट
तासाशेवटी लिहून दिला हातभर गृहपाठ
वर्गात मुलांचे आळोखेपिळोखे सुरू झाले
शेवटचे रटाळ तास संपल्याचे टोल आले

संपली एकदाची
वारूळ फुटलं
जणू माश्या उठल्या
पोळं फुटलं

मुलांचा गलका
पालकांची गडबड
हसरे चेहरे
छोट्यांची बडबड

कुणी शाळेच्या भिंतीवर चढलेला
कुणाला मोठ्या दादांनी घेरलेला
कुणी मधल्या सुट्टीतली शिलकीतली लिमलेट गुपचूप घेतली खाऊन
कुणी चिंतातूर दमलेला आईची वाट पाहून

या गडबडीत मित्रांना चुकवून हा भरभर चालत सुटला
मित्र म्हणले असतील कदाचित "भावखाऊ कुठला"

नेहमीचा रस्ता
सवयीचा रस्ता
मंदिर आलं
दवाखाना आला
ते मैदानही मागे पडलं
वडापावच्या गाडीजवळून उजवीकडे वळला

पण ही नवी वाट
नजरेत शोधाशोध
बहुतेक वाट चुकला
बसस्टॉपवरती पाहिलं
आणि मनाशीच हसला

थोडं चालत पुढे गेला
त्याच्या ओळखीचा चेहरा
नावं नव्हतं माहित
म्हणून हाका मारली "ए मुला"

दिसतोस तू मला पैसे मागतांना
रोज लोकांकडून ओरडा खातांना

काल बाजारात त्या काकांनी तुला बेदम मारलं
मी बघत होतो उभा
आईने मला ओढत घरी आणलं

माझ्याकडे तेव्हा पैसे असते
तर तुला पक्का दिले असते

ए मला सांग तू पैसे का मागतोस?
तुला घरातून खाऊसाठी कोणी पैसे देतं का?
तुला सुट्टीच्या दिवशी बागेत फिरायला कोणी नेतं का?

पण सुट्टी ... तुला .. अं ..
बाबांना सांगून तू नवे कपडे का नाही घेत?
आमच्यासारखा तू शाळेत का नाही येत?

रडू नकोस
रडतोस का असा?
आजही कुणी मारलं का रे?
आईला नाव सांग त्यांचं .. ती ओरडेल
आईला सगळं सांगत जा रे ....

आई बाबा शाळा कपडे याची बडबड होती सुरू
रस्त्यावरचा तो भणंग भटका
ढोरासारखा लागला रडू

याला काही कळेना पण चेहरा पडला
वाटलं आपल्याच हातून काही मोठा गुन्हा घडला

रडू नकोस एक गंमत आणलीय मी
अरे बघ तरी
दप्तर उघडलं
कप्पा उघडला
कंपास उघडली
कोनमापक उचलला
बंदोबस्तातली दहाची नोट हलकेच बाहेर काढली

हे ठेव खाऊला
आज तुला कुणी मारणार नाही
हस आता तरी
चल चल उशिर झालाय जायला हवं घरी

आजच्यापुरतीची त्याची सारी संपत्ती देऊन तो गर्दीत शिरला
पुढल्याच क्षणी त्याच्या संपत्तीत एक कृतज्ञ अश्रू जिरला

-साद
http://churapaav.blogspot.com/2009/12/blog-post_26.html
- प्रसाद साळुंखे
(कवीची पुर्वपरवानगी न घेता आवडले म्हणून पोस्ट करत आहे , क्षमस्व )