Thursday, August 23, 2007

चंद्र-तारे खूप झाले...!

चंद्र-तारे खूप झाले;
आता 'कोसळलेल्या उल्कांवर' लिही!
पाने-फुले नेहमीचीच;
आता 'उन्मळलेल्या मुळांवर' लिही!

प्रेमभंग नित्याचा;
आता 'रोजच्या' विनयभंगावर लिही!
तुलसी-महात्म्य पुरे ;
आता 'बाटवलेल्या गंगांवर' लिही!

हिरवा मळा छानच;
आता काटेरी कुंपणावर लिही!
भाटगिरी सोडून आणि,
राजाच्या माजोरेपणावर लिही!

माझे, मी , खूप आता,
आतल्या 'कमी'पणावर लिही!
आणि सिरीयल्सचा 'आत्मा' असलेल्या,
छद्मीपणावर लिही!

'जीवघेणे' कटाक्ष बस;
रोजच्या 'जीव देण्यावर' लिही!
अन हुंडा घे‌उनही 'सावित्रीचा',
'जीव घेण्यावर' लिही!

'कर्माचे ओझे' जाणतो;
अता पुस्तकांच्या ओझ्यावर लिही!
आणि सौभाग्य लेणे विस्कटणाऱ्या,
कर्जाच्या बोज्यावर लिही!

हिरवा‌ईचे वर्णन 'वाचले' मी;
'न वाचणाऱ्या' वनरा‌ईवर लिही!
नि आपण स्वत:लाच लोटतोय,ना वेड्या ;
त्या भयाण खा‌ईवर लिही!

-- तुषार मराठे

No comments:

Post a Comment