Tuesday, December 11, 2007

गुंजलेच होते नाद आठवांचे
की समोर ही सांज आली
छेडतच होतो सुर सावल्यांचे
की समोर ही सांज आली

मनाच्या अथांग सरोवरातल्या
तरंगांचा आकार मोडीत
विसरत तुला निघालोच होतो
की समोर ही सांज आली

किरणांच्या मागोमाग जाताना
घरटी विसरली काही पाखरं
मार्ग त्यांस दावितच होतो
की समोर ही सांज आली

क्षितीजाच्या भयाने जडलेली
अबोल नजर ही पावलावरी
बोलण्यास ती सरसावतच होती
की समोर ही सांज आली

एकटाच पडलेला सखे
कालचा प्याला हा शब्दांचा
विसळुनी त्यास घेतच होतो
की समोर ही सांज आली

-- सचिन काकडे

No comments:

Post a Comment