Wednesday, December 26, 2007

पाथरवट

भरलेल्या धुळीत खेळतात,
पाथरवटाच्या पोरी...
सारखेच झगे दोघींचे,
बनवलेले...फाडून नऊवारी !

बापाच्या दंडाचा ताईत,
फुगलेली नस जपतो...
घावावर बसती घाव,
घाम् पाप्ण्यांनी टिपतो !

सुकलेली कारभारीण,
ओटित वंशाचा दिवा...
लव्कर पेटली वात...
लई उपकार टुझे देवा !

वाहणारे, डोळे - प्यासे ओठ,
पदराशी झगडतो तान्हा...
फुटंलया नशिब तर,
कसा फुटावा पान्हा !

रस्त्याच्या पल्ल्याड एक ,
चिंचा, बोरं, कैरीचा ठेला...
तापलेल्या उन्हात....भैय्या,
विकतो ...'बरफ का गोला ' !

पोरी लागल्या रडू,
काही खायला मागती...
बापाचं त्वांड बी कडू,
महिना अखेरीला -- का.........पैकं झाडाला लागती !

दोन - पाच रुपये मोजत,
बाप गेला पलिकडे...
येताना जोरात,
एक येस्टी त्याला भिडे !

आक्रोश आकांत फक्त,
विखुरल्या बोरं अन् चिंचा...
सर्वत्र पसरले रक्त,
यात पोरींचा बा कंचा ?

मालकाच्या बंगल्या बाहेर,
उकिडव्या तिघी बसल्या त्या...
हिशोब साडे सत्तावीस दिवसांचा,
"मुकादम्............. बाईचा अंगठा घ्या !!!"

-- मंदार

No comments:

Post a Comment